खेलेगा इंडिया... : व्हिज्युअलायझेशनचे सामर्थ्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sports

आधुनिक काळातील क्रीडा मानसशास्त्रामध्ये व्हिज्युअलायझेशन म्हणजे प्रसंग घडतो आहे अशी कल्पना करणे. या तंत्राला महत्त्व असून खेळात यशस्वी होण्याची तंत्राची ताकद खूप मोठी आहे.

खेलेगा इंडिया... : व्हिज्युअलायझेशनचे सामर्थ्य

- महेंद्र गोखले

आधुनिक काळातील क्रीडा मानसशास्त्रामध्ये व्हिज्युअलायझेशन म्हणजे प्रसंग घडतो आहे अशी कल्पना करणे. या तंत्राला महत्त्व असून खेळात यशस्वी होण्याची तंत्राची ताकद खूप मोठी आहे.

व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय?

तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींची मानसिक प्रतिमा तयार करण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. या तंत्रात कल्पकता वापरून स्वत:ला विविध परिस्थितींमध्ये बघायला शिकायचे असते. हे तंत्र म्हणजे केवळ आपले डोळे बंद करून आपल्यासाठी जे काही महत्त्वाचे आहे ते ‘पाहणे’ नव्हे तर ते ‘अनुभवणे’ देखील आहे.

व्हिज्युअलायझेशनचे कार्य

आपल्या रोजच्या जीवनातील आव्हाने लक्षात घेऊन आपली योग्य मानसिकता राखत त्यावर मात करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन हे तंत्र कार्य करते. मेडिटेशन किंवा ध्यानाप्रमाणेच, व्हिज्युअलायझेशन हा एक मानसिक व्यायाम आहे. नियमितपणे सराव केल्यास तो प्रभावी ठरतो. हे तंत्र यशस्वी होते कारण मनाला काय खरे आणि काय नाही यामधील फरक सांगता येत नाही. आपली पाचही इंद्रिये व्हिज्युअलायझेशनमध्ये वापरली जातात तेव्हा ती परिणामकारक ठरतात. मूलतः तुम्ही मेंदूला फसवू शकता की तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे आधीच आहे किंवा तुम्ही आधीच एखाद्या समस्येचे सर्व अडथळे दूर केले आहेत, त्यामध्ये वाढलेला आत्मविश्वास असो किंवा शालेय परीक्षेत चांगले गुण असो. सोप्या भाषेत सांगायचे तर व्हिज्युअलायझेशन हे सकारात्मक वर्तणुकीतील बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी अॅम्प्लिफायर म्हणून काम करते ज्यामुळे यश मिळू शकते.

प्रतिथयश अॅथलीट वाईट परिस्थितींवर मात करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन हे तंत्र वापरतात. पडणे, वेदना होणे, उपकरणातील बिघाड आणि यासारख्या गोष्टींना सामोरे जाण्याची ते कल्पना करतात, जेणेकरून घटना वास्तविक जीवनात घडल्यास ते तयार असतात. त्यांच्या मेंदूने आधीच समस्येचा सामना केला असल्यामुळे ते स्पर्धेदरम्यान एकही खेळ न गमावता स्पर्धा यशस्वीपणे हाताळू शकतात. तुम्ही स्वत:ला तुमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करताना पाहता तेव्हा प्रत्यक्षात परफॉर्मन्स करण्यासाठी खूप आत्मविश्वास मिळतो आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.

व्हिज्युअलायझेशनचे फायदे

व्हिज्युअलायझेशन या तंत्राचे अनेक फायदे आहेत. योग्य पद्धतीने या तंत्राचा वापर केल्यास, नियमित व्हिज्युअलायझेशन सराव तुम्हाला खालील प्रकारे मदत करू शकतो :

 • आत्मविश्वास कमावणे

 • चिंता कमी करणे

 • कामगिरी वाढवणे

 • तुमची प्रेरणा वाढवणे

 • आरोग्यदायी सवयी लावून घेणे

 • स्नायूंची ताकद वाढवणे

 • वेदना कमी करणे

 • तणाव कमी करणे

 • दुखापत भरून काढणे

 • मूड सुधारणे

 • तुम्हाला काय हवे आहे ते ठरवणे

व्हिज्युअलायझेशन कसे करावे?

कोणीही व्यक्ती व्हिज्युअलायझेशनच्या सामर्थ्याचा उपयोग करू शकते. व्हिज्युअलायझेशनची अनेक तंत्रे असतात. काही मूलभूत पायऱ्या खालील प्रमाणे :

 • एक स्पष्ट ध्येय निश्चित करा. उदा. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचणे

 • खेळाच्या सुरुवातीची तयारी करता आहात अशी कल्पना करत तुम्हाला ठरवून दिलेल्या जागेवर तुम्ही बसला आहात आणि तुमचे नाव पुकारले जात आहे अशी कल्पना करा.

 • स्पर्धेच्या बाबतीतल्या प्रत्येक घटकांचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा, स्पर्धेत प्रवेश करण्यापासून ते स्पर्धेत यशस्वी होईपर्यंत प्रत्येक क्षण ‘अनुभवण्याचा’ प्रयत्न करा.

 • तुमच्या मनावरच्या पडद्यावर सर्व घटना तपशीलवार पहा.

अशा प्रकारे नवनवीन तंत्रे शिकून, ती आत्मसात करून खेळाडू म्हणून आपली कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू या!

Web Title: Mahendra Gokhale Writes Power Of Visualization

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top