खेलेगा इंडिया... : वजन कमी करताय का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weight Loss

चाळिशी ते पन्नाशीच्या आसपासच्या स्त्री-पुरुषांना आपण तरुण दिसावं, आपल्या कॉलेजमधले कपडे आपल्याला घालता यावेत याचा अट्टहास असतो.

खेलेगा इंडिया... : वजन कमी करताय का?

- महेंद्र गोखले

प्रत्येक व्यक्तीला हे वाटत असतं की आपण चांगलं दिसावं, आपला प्रेझेंस चांगला असावा. हे उत्तम आहे. बारीक दिसण्यासाठी किंवा होण्यासाठी ते करत असलेल्या उपाययोजना कदाचित त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये घातक ठरण्याची शक्यता आहे.

चाळिशी ते पन्नाशीच्या आसपासच्या स्त्री-पुरुषांना आपण तरुण दिसावं, आपल्या कॉलेजमधले कपडे आपल्याला घालता यावेत याचा अट्टहास असतो. त्यासाठी ते करत असलेले प्रयत्न आणि उपाय पाहून सांगावंसं वाटतं की, एवढे वर्ष साचून ठेवलेलं किंवा राहिलेली चरबी काही दिवसात कमी करायचे मागे लागलेले आहेत. त्याचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर, मनावर होताना दिसतात. खूप वर्षे साचलेली चरबी अशी एकदम कशी निघेल? त्याच्यासाठी प्रयत्नपूर्वक कष्ट करणे गरजेचे आहे.

कुठल्या प्रकारे प्रयत्न करताय यालाही महत्त्व आहे. अनेक लोक उपासतापास करतात. फॅट डाएट करतात. परंतु याचे घातक परिणाम शरीरावर दिसतात. तुमच्या मेटाबॉलिक रेटवर परिणाम होतो. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चरबी किंवा शरीराचे वजन कमी होण्याचे प्रमाण काहीवेळा जास्त तर काहीवेळा कमी असतं. वजन सस्टेनेबल कमी होण्याची मानसिकता ठेवल्यास त्याचा फायदा होईल. वजन आणि चरबी करण्याबाबतचा आहार व व्यायाम याचा संबंध तज्ज्ञांकडून समजून घ्या. नुसतं वजन कमी करायचं असल्यास व्यायाम करायची गरज नाही. ते डाएटमुळे होऊ शकतं. योग्य आहारामुळं आपलं वजन संतुलित राहतं. नुसतं वजन कमी करणं हे मुळात चुकीचे उद्दिष्ट आहे. वजन कमी होण्याबरोबर मसल लॉस, बोन लॉस आणि मिनरल लॉस होत असतो. यापेक्षा फॅट लॉस आणि मसल गेन करण्याचे उद्दिष्ट्य ठेवावं. मसल लॉस, बोन लॉस, झाल्यामुळे दुखापतीचे प्रमाण वाढते. त्याचे दुष्परिणाम चाळिशी, पन्नाशीनंतर दिसायला लागतात. तुमची हाड ठिसूळ व्हायला लागतात. स्त्रियांना मेनोपॉजमध्ये हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे नुसते वजन कमी करणार असल्यास तुमचं काहीतरी चुकतंय. तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

‘मी दहा किलो वजन कमी केलं’, ‘माझं वजन वीस किलो कमी झालं’, ‘तीन महिन्यात माझं एवढे वजन कमी झालं’, या भंपक कल्पना आहेत. मला माहीत आहे की मी हे खूपच धाडसी विधान करत आहे. परंतु मी व्यावसायिक म्हणून अतिशय जबाबदारीने बोलत आहे.

वजनाचं ओब्सेशन लोकांमध्ये इतकं आहे की जिममध्ये प्रवेश केल्या-केल्या पहिली गोष्ट म्हणजे वजनाच्या काट्यावर उभे राहतात. व्यायाम करून झाल्यावर वजनाच्या काट्यावर उभे राहतात, काहीतरी खाल्लं की, प्यायलं की वजनाच्या काट्यावर उभे राहतात, खरंतर ही मानसिकता घातक आहे. कारण वजन ही केवळ शारीरिक समस्या न राहता मानसिक बनलेली आहे याची त्या व्यक्तीला जाणीवही नसते. सगळ्या आजारांपासून तुम्हाला दूर राहायचं असल्यास चरबी कमी करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे वजन सस्टेनेबल कमी होईल. त्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहार याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. आपण इतके इतके आळशी आहोत की सगळ्या गोष्टी लवकरात लवकर मिळवायच्या मागे आहोत. ते शक्य नाही याची आपल्याला जाणीव होणे गरजेचे आहे. वास्तवाकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या अविचाराचे दुष्परिणाम आपण आपल्या शरीरावर आणि मनावर करून घेतो. प्रत्येकानं या गोष्टींचा विचार करावा आणि योग्य मार्गदर्शन घ्यावं.

Web Title: Mahendra Gokhale Writes Weight Loss

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..