
आपण खेळाचा विचार करतो तेव्हा लक्षात घेतले पाहिजे की कोणत्याही स्पर्धेदरम्यान खेळाडूंना त्यांच्या सर्वोच्च पातळीवरची कामगिरी करण्यासाठी उत्कृष्ट लवचिकता, मोबिलिटी आणि स्थिरता हे आवश्यक घटक असतात.
- महेंद्र गोखले
आपण खेळाचा विचार करतो तेव्हा लक्षात घेतले पाहिजे की कोणत्याही स्पर्धेदरम्यान खेळाडूंना त्यांच्या सर्वोच्च पातळीवरची कामगिरी करण्यासाठी उत्कृष्ट लवचिकता, मोबिलिटी आणि स्थिरता हे आवश्यक घटक असतात. खेळाडूंनी या हालचाली स्वतःच्या स्वतः करण्याची क्षमता निर्माण करावी. यावरून आपल्याला हे समजते की खेळाडूची कामगिरी सुधारण्यासाठी लवचिकता विकसित केली पाहिजे. अशा उपलब्ध लवचिकतेच्या साह्याने शरीराच्या हालचालींद्वारे हे साध्य केले जाऊ शकते. अपुऱ्या लवचिकतेमुळे स्नायूंचा ताण आणि इतर प्रकारच्या दुखापती होऊ शकतात. शिवाय, दुखापती टाळण्यासाठी खेळाडूंमध्ये विविध खेळांनुसार भिन्न लवचिकता प्रोफाइल असणे आवश्यक आहे.
असे दिसून आले आहे की बहुतेक प्रशिक्षक आणि खेळाडू वॉर्म अपमध्ये स्टॅटिक स्ट्रेच करतात जे प्रत्यक्षात डायनॅमिक वॉर्मअप थेअरीच्या विरोधात आहे. डायनॅमिक स्पोर्ट्स हालचाली फोर्स निर्माण करण्यासाठी फायदेशीर आहेत, कारण स्टॅटिक हालचाली स्नायूंची लांबी वाढवितात तर खेळाच्या कृती स्नायू संकुचित करतात. दर्जेदार किंवा उत्तम हालचाली करण्यासाठी आणि दुखापती टाळण्यासाठी वॉर्मिंग अप प्रक्रियेमध्ये खेळाला अनुसरून डायनॅमिक कृती करणे अत्यंत आवश्यक आहे, उदा. क्रिकेटसाठीचा वॉर्म अप, बेस बॉल, बॅडमिंटन, टेनिस, पोहणे यासाठी रोटेटर कफ डायनॅमिक हालचाली.
वजन उचलणे असो किंवा स्पर्धा, खेळाडू कायमच शरीराकडून जास्त अपेक्षा करतात. चांगली मोबिलिटी नसेल तर, शरीराची हानी होऊ लागते आणि ॲथलेटिक कामगिरी खालावते. एखाद्या व्यक्तीची मोबिलिटी कार्यक्षमता आणि हालचालींची लयबद्धता ठरवते. तसेच, ॲथलेटिक कामगिरीमध्ये ही मोबिलिटीही महत्त्वाची भूमिका बजावते. जॉईन्ट मोबिलिटी ही शरीराची सामान्य गरज आहे. प्रमुख क्षेत्रांमध्ये खांदे, मान आणि पाठ, नितंब, गुडघे, घोटे आणि मनगट यांचा समावेश होतो.
स्टॅबलिटीसह ॲथलेटिक्समधील आणखी एक प्रमुख घटक म्हणजे एखाद्या व्यक्तीची मूळ किंवा कोअर शक्ती. अशी शक्तीदेखील खेळाडूंच्या मोबिलिटी आणि स्टॅबिलिटीला मदत करते. अनेक खेळाडू त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कोअर स्टॅबिलिटी आणि कोअर स्ट्रेंग्थ ट्रेनिंग करतात. या क्षमता मोजण्याचे कोणतीही ‘सुवर्ण-मानक’ पद्धती नाही. वास्तविक मुख्य कोअर म्हणजे मणके, नितंब, पेल्वीस, शरीराचा खालचा भाग आणि पोटाच्या रचनेचा समावेश असलेल्या डिप स्नायूंचा समावेश होतो. ६ पॅक ॲब्ज म्हणजे मुख्य कोअर असा अनेकांचा गैरसमज आहे. अॅथलिटच्या कोअरची ताकद त्यांना जास्तीत जास्त पॉवर आऊटपुट देण्यास मदत करते, तर स्टॅबिलिटी त्यांना संपूर्ण ॲथलेटिक हालचाली करण्याची क्षमता निर्माण करते. यासर्व कृतींसाठी समन्वय, संतुलन आणि तांत्रिक कौशल्ये आवश्यक असतात. लवचिकता, मोबिलिटी आणि विशिष्ट स्नायू यांची कार्यक्षमता स्पष्टपणे समजल्यानंतर शरीराच्या हालचाली पूर्ण कार्यक्षमतेने करण्यास मदत होते. अशा कौशल्याचा खेळाडू प्रत्यक्ष क्रीडा स्पर्धेमध्ये अधिक कार्यक्षमतेने वापर करू शकतात. या सर्व घटकांचा एकत्रितपणे वापर एखाद्या खेळाडूसाठी शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी आणि दुखापतींची शक्यता कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो.
कामगिरीत सुधारणा
चांगली मोबिलिटी ॲथलिट्सना शरीरातील वेदना आणि दुखणे काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे दुखापतीबद्दल मेंदूला संदेश मिळतो. शरीरातील अंतर्गत ऊर्जेमुळे सांध्यांना वंगण मिळते आणि त्यामुळेच सांधे बरे होण्यास आणि रिकव्हरी करण्यास मदत होते, पोश्चर सुधारते आणि मज्जासंस्थेवर नियंत्रण मजबूत केल्यामुळे हालचाली सुधारते. शिवाय, स्पर्धेत असताना चांगली मोबिलिटी कामगिरीमध्ये लक्षणीय वाढ करू शकते आणि शरीर लवचिक असल्यास चुकीच्या हालचाली टाळून दीर्घ कालावधीसाठी स्नायू चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात.