esakal | व्यवस्थापन कोट्यातील जागा महाविद्यालयांनी केल्या प्रत्यार्पित
sakal

बोलून बातमी शोधा

admissions

व्यवस्थापन कोट्यातील जागा महाविद्यालयांनी केल्या प्रत्यार्पित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरू असताना शहरातील २४ कनिष्ठ महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यांतर्गत प्रवेशाच्या एकूण जवळपास ७१९ ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी प्रत्यार्पित केल्या आहेत. त्यामुळे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील जागा आता वाढणार असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळू शकणार आहे.

केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश दुसऱ्या नियमित फेरीत सध्या सुरू आहेत. दरम्यान, फर्ग्युसन महाविद्यालय, बीएमसीसी, नौरोसजी वाडिया महाविद्यालय, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, आबासाहेब गरवारे महाविद्यालय अशा नामांकित महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील व्यवस्थापन कोट्यांतर्गत प्रवेशाच्या जागा नियमित ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी प्रत्यार्पित केल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील २४ नामांकित महाविद्यालयांमधील व्यवस्थापन कोट्यांतर्गत असणाऱ्या ७८८ जागांपैकी ७१९ जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी प्रत्यार्पित केल्याची माहिती अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया समितीच्या सदस्य सचिव मीना शेंडकर यांनी दिली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातील जागा प्रत्यार्पित केल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेतील प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. प्रवेशासाठी आता ८१ हजार ६७० जागा रिक्त राहिल्या आहेत.

दुसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी शनिवारी होणार जाहीर

प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीतंर्गत नव्याने अर्ज करणे आणि सबमिट करणे, नवीन अर्ज नोंदणी करून अर्जाचा भाग एक व्हेरिफाय करणे, अर्ज सबमिट करणे आणि लॉक करणे, तसेच अर्जातील भाग दोन भरून अर्ज दुसऱ्या फेरीसाठी लॉक करणे, यासाठी दिलेली मुदत गुरुवारी संपली आहे. या फेरीसाठी आलेल्या अर्ज डेटा प्रोसेसिंग आणि गुणवत्ता यादी तयारी करण्याचे कामकाज शुक्रवारी (ता.३) करण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या नियमित फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी येत्या शनिवारी (ता.४) सकाळी दहा वाजता जाहीर होणार आहे.

आतापर्यंत झालेल्या प्रवेशाची आकडेवारी :

- एकूण प्रवेश क्षमता : १,१२, ४८५

- झालेले प्रवेश : ३०, ८१५

- रिक्त जागा : ८१,६७०

केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेले विद्यार्थी :

- नोंदणी केलेले विद्यार्थी : ८३,७७९

- अर्ज लॉक झालेले विद्यार्थी : ७५,८६५

- व्हेरीफाय झालेले अर्ज : ७५,४५०

- पर्याय नोंदविलेले विद्यार्थी : ६८,६६५

loading image
go to top