संवाद : श्रीमंती बहुभाषिकत्वाची

एक तरी भाषा चांगली येण्याचं महत्त्व आणि त्याचे फायदे आहेतच. परंतु दोन किंवा अधिक भाषा अवगत असणं ही माझ्या मते एक प्रकारची श्रीमंती, समृद्धी आहे.
Multilingualism
Multilingualismsakal
Summary

एक तरी भाषा चांगली येण्याचं महत्त्व आणि त्याचे फायदे आहेतच. परंतु दोन किंवा अधिक भाषा अवगत असणं ही माझ्या मते एक प्रकारची श्रीमंती, समृद्धी आहे.

एक तरी भाषा चांगली येण्याचं महत्त्व आणि त्याचे फायदे आहेतच. परंतु दोन किंवा अधिक भाषा अवगत असणं ही माझ्या मते एक प्रकारची श्रीमंती, समृद्धी आहे. जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो तेव्हा केवळ तिची लिपी (वेगळी असेल तर), शब्द, व्याकरण, चलन एवढंच शिकत नाही तर ती भाषा बोलणाऱ्या लोकांची, प्रांताची संस्कृती, चालीरीती, नीतिमूल्ये या सर्वांबद्दलच्या माहितीची भर आपल्या ज्ञानात पडत असते, आपली क्षितिजे विस्तारत जातात.

बहुतांश देशांमध्ये सर्वसाधारणपणे देशभर एकच भाषा बोलली जाते. त्यातील विविध प्रांतांतील बोलींमध्ये थोडाफार फरक असू शकतो, भारतात मात्र भाषांचं ऐश्वर्य दृष्ट लागण्याजोगं आहे. जितक्या भाषा शिकू तेवढ्या कमीच आहेत. हीच गोष्ट परदेशी भाषांची.

भाषा, बोली आणि लिपी यांमध्ये बरेचदा गल्लत केली जाते. दर बारा मैलांवर ‘भाषा बदलते’ असं म्हटलं जातं. वास्तविक भाषा तीच असते, फक्त बोली बदलते, हेल बदलतो. विदर्भात किंवा सांगली-कोल्हापुरात भाषा मराठीच बोलली जाते पण विदर्भात थोडा हिंदीचा प्रभाव, तर सांगली-कोल्हापूर भागात जरा कानडी हेल असलेली बोली असते. आपण ज्या भागात जन्मलो, वाढलो, तिथल्या बोलीचा आपल्यावर प्रभाव असणं हे अगदी स्वाभाविक आहे. विविध बोली जपल्या, टिकल्या पाहिजेत हेही तितकंच खरं आहे, भाषेच्या क्षेत्रात मोठ्या पातळीवर काम करायचं असेल तर प्रमाण भाषा शिकणं आवश्यक आहे असं मला वाटतं. काहींचा असा प्रश्न असतो ‘का म्हणून आम्ही आमची बोली सोडून प्रमाण भाषा शिकायची?’ अरे, तुम्हाला तुमची बोली सोडायला, विसरायला कोण सांगतंय? आपल्या मेंदूची क्षमता भरपूर आहे. मग वेगवेगळ्या भाषा, बोली आत्मसात करायला काय हरकत आहे? एखादा परप्रांतीय किंवा परदेशी माणूस भेटल्यावर त्याच्याशी आपण त्याच्या भाषेत, मोडकं तोडकं का होईना बोलू शकलो, तर क्षणार्धात आपुलकीचे बंध जुळतात.

तसेच आम्ही ‘मराठीत’ किंवा ‘इंग्रजीत’ लिहितो हे म्हणणं बरोबर नाही. मराठी भाषेची अधिकृत लिपी देवनागरी आहे, परंतु व्हॉटसॲपवर ‘udya sakali bhetuya’ असं लिहिताना आपण मराठी भाषा रोमन लिपीत लिहितो. आणि ‘आय लाइक रीडिंग’ हे इंग्रजी भाषेतील वाक्य आपण देवनागरी लिपीत लिहितो. अलीकडे तर म्हणे बऱ्याच (की सर्वच?) मराठी, हिंदी चित्रपट मालिकांच्या संहिता संवाद रोमन लिपीतच लिहिलेले असतात.

दोन किंवा अधिक भाषा उत्तम शिकल्यास व्यवसायाची अनेक क्षेत्रं उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही होऊ शकता.

1) भाषांतरकार (याची व्याप्ती खूप मोठी आहे)

2) दुभाष्या (इंटरप्रिटर)

3) भाषा शिक्षक/प्रशिक्षक

4) सबटायटलर

5) परदेशी किंवा परप्रांतातील पर्यटकांसाठी टूर गाइड

6) अभिनेते, गायक यांना इतर भाषांतील नाटक-चित्रपट-मालिकांमध्ये वाव मिळतो इत्यादी

खरंतर कोणत्याही क्षेत्रात काम करताना, बहुभाषिकत्व ही तुमची जमेची बाजू ठरते. विविध भाषांतील उत्तमोत्तम साहित्य, काव्य, नाटकं, चित्रपट यांचा आस्वाद घेताना वर्णनातीत आनंद मिळतो. शिवाय, डॉक्टरांच्या मते, नवनवीन भाषा शिकणे, हा स्मृतिभ्रंशासारखे आजार टाळण्याचा एक उत्तम उपाय ठरू शकतो.

तर वाचकहो, तुम्हा सर्वांना उदंड भाषासमृद्धी लाभो या सदिच्छेसह निरोप घेते. नमस्कार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com