शारीरिक क्षमता वाढवण्याची गरज

कोणतंही मोठं काम करायचं असेल, मोठा पराक्रम करायचा असेल, तर शरीराने साथ द्यावी लागते. दीर्घ काळ काम करण्यासाठी निरोगी व सशक्त शरीराची आवश्यकता असते.
exercise
exercisesakal

कोणतंही मोठं काम करायचं असेल, मोठा पराक्रम करायचा असेल, तर शरीराने साथ द्यावी लागते. दीर्घ काळ काम करण्यासाठी निरोगी व सशक्त शरीराची आवश्यकता असते. मोठी मोठी कामे उभी करण्यासाठी समोर येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीमधे; मग तो मुसळधार पाऊस असो की, रणरणतं ऊन. रात्र-रात्र जागरण करणं असो वा दिवसेंदिवस उपाशी राहणं असो.

अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकलो नाही, तर नुसतं ‘खूप करावसं वाटतं, पण काय करू शरीर साथ देत नाही’ असं म्हणून कामापासून लांब राहावे लागेल. त्यामुळे कोणत्याही क्षेत्राची निवड करा. त्या क्षेत्रात उंच भरारी मारायची असेल, तर शरीराची साथ हवीच.

शरीर तंदुरुस्त करा

आपले मोठे अधिकारी, राजकीय नेते दिवसरात्र काम करत असतात. काही जण ‘लहानपणीच म्हातारे होतात. विशीतच उठता बसता येत नाही. तास - दोन तास काम केल्यानंतर थकल्यासाखं होतं. काही जण सारखे आजारी पडतात. अशा वेळी उच्च पदावर पोहोचण्याची शक्यता कमी होते. आपली स्वतःची शारीरिक क्षमता कशी आहे? ते ओळखा! किमान शारीरिक क्षमतेशिवाय काही करणे केवळ अशक्य आहे.

इतिहासात आणि वर्तमानातही अशी अनेक उदाहरणं सापडतात की, ज्यांनी शरीराचं महत्त्व ओळखून त्यासाठी आयुष्यातील महत्त्वाची वर्षे व्यायामात गुंतवली. समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक यांनी शारीरिक विकासासाठी विशेष प्रयत्न केले. तुमची स्वतःची परिस्थिती काय आहे? जन्मतःच काही दोष असतील तर ते आपल्या हातात नाही. मात्र, अन्यथा विशेष प्रयत्न करून शारीरिक तंदुरुस्ती मिळवायला हवी.

शरीरसंपदेची कार्यक्षेत्रे

काही कार्यक्षेत्रे अशी आहेत ज्या ठिकाणी मात्र शारीरिक सुदृढतेला पर्यायच नाही. सैन्यदल, पोलिस, अग्निशामक दल, जीवरक्षक, खेळाडू, सैन्यदलातील डॉक्टर अथवा इंजनीअर. या क्षेत्रात तुमची शारीरिक तंदुरुस्ती उत्तमच असावी लागते, तर मार्केटिंग एजंट्स, बांधकाम कर्मचारी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर्स, जीम इंस्ट्रक्टर्स, नर्तक, टुरिस्ट गाइड या सर्वांनाही बऱ्यापैकी चांगली शारीरिक क्षमता लागते.

स्नायूबल, वेग, लवचिकता, तोल, रग, दम, काटकपणा हे सर्व शारीरिक विकसनाचे पैलू आहेत. खेळाडूंना या सर्व विकसित पैलूंची गरज असते. खोखो, कबड्डी, बास्केटबॉल, फूटबॉल या खेळात वेग व चपळतेची, तर कबड्डी, वेट लिफ्टिंग, कुस्ती, ॲथलेटिक्सचे बरेच प्रकार यांना ताकदीचीही आवश्यकता असते. गिर्यारोहणासाठीही रग व दम या दोन पैलूंची विशेष गरज असते.

चेंडूच्या साह्याने खेळायच्या खेळांमध्ये जसे की, क्रिकेट, बेसबॉल, व्हॉलिबॉल, फुटबॉल यांत शारीरिक तंदुरुस्तीच्या क्षमतांबरोबरच स्नायू व ज्ञानेंद्रिये यांचा समन्वय साधता यावा लागतो. आपल्या ज्ञानेन्द्रियांद्वारे काही संवेदना मिळते. त्या प्रमाणे आपण स्नायूंना काम करण्याची आज्ञा देतो, पण स्नायू त्या प्रमाणे हालचाल करण्यास चुकतात अन् मग फुटबॉलमध्ये चेंडू जमिनीवरच, पण पाय हवेत, गोल एकीकडे असताना चेंडू मात्र दुसरीकडे मारला जातो!

क्षमतांचे निरीक्षण

सैन्यदलात अथवा पोलिसदलात या सर्व गोष्टी अगदी परीक्षा घेऊन मोजल्या जातात. जसे पोलिसदलात भरती व्हायचे असेल, तर १६०० मीटरचे अंतर साडेसहा मिनिटात पार करता यावे लागते. शारीरिक उंची, वजन, छाती, छाती फुगवून होणारा बदल, डोळे, दात यांची स्थिती अशा अनेक बाबी सैन्यदलात निवडताना बघितल्या जातात.

कला व वैद्यकीय क्षेत्रात कलाकुसरीचे अथवा शस्त्रक्रियेचे काम करावे लागते. ज्यासाठी हातावर अथवा शरीराच्या इतर अवयवांवर अतिशय चांगले नियंत्रण लागते. हा शारीरिक विकासाचा आणखी एक वेगळा प्रकार होय. सूक्ष्म गोष्टी अगदी हळूवारपणे करता यावे यासाठी स्नायूंवर नियंत्रण लागते.

आपल्या या प्रकारच्या शारीरिक क्षमतेचा कधी शोध घेतला आहे का? त्या तपासून बघा. शाळा व इतर क्रीडांगणावर त्या मुद्दाम तपासून मिळू शकतात. वयोमानाप्रमाणे निकष बदलत जातात. त्यामुळे आपल्या वयानुसार आपली स्थिती काय आहे याबाबत स्वतःचे परीक्षण करा. काही गोष्टी सरावाने वाढवता येतात. तसाही प्रयत्न करत राहा. जीवनकार्य निवडताना आपल्याला या क्षमतेचा उपयोग होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com