
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मुख्य परीक्षा वर्णनात्मक केली. विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागतही केले.
MPSC : नवीन अभ्यासक्रम अन्यायकारक; विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका
पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मुख्य परीक्षा वर्णनात्मक केली. विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागतही केले. मात्र या नुकत्याच घोषित अभ्यासक्रमाविरुद्ध विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अतिरिक्त दीड हजार गुणांचा अभ्यासक्रम आणि तयारीसाठी मिळणारे अवघे काही महिने, यामुळे हा अभ्यासक्रम अन्यायकारक आहे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
एमपीएससीने २०२३ पासून मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्याचे निश्चित केले आहे. मात्र, नव्या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी दिलेली वेळ अपुरी असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. राजेश जाधव (नाव बदलले आहे) म्हणतात, ‘यूपीएससीचा अभ्यासक्रम एमपीएससीने जसाच्या तसा कॉपीपेस्ट केला आहे. पर्यायाने आम्ही आजवर केलेला ७० टक्के अभ्यास आणि पुस्तके यांचा यापुढे काही उपयोग नाही. त्यामुळे फक्त एमपीएससी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. याचा फायदा मात्र यूपीएससी करणाऱ्या दिल्लीतील मराठी विद्यार्थ्यांना होणार आहे.’ आयोगाच्या या निर्णयाविरोधात एमपीएससीचे विद्यार्थी सोमवारी (ता. २५) पुण्यात आंदोलन करणार आहे. शास्त्री रस्त्यावरील इंदुलाल कॉम्प्लेक्सजवळ विद्यार्थी जमणार आहेत.
विद्यार्थी म्हणतात...
नव्या अभ्यासक्रमाबद्दल
जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमात ९० टक्के फरक
वैकल्पिक विषय, निबंध, नीतिशास्त्र असा एक हजार गुणांचा अतिरिक्त अभ्यासक्रम
९०० गुणांची परीक्षा आता २०२५ गुणांची झाली आहे.
महाराष्ट्र केंद्रित अभ्यासक्रम आता जगाभोवती झाला आहे.
जगाचा भूगोल आणि इतिहासाच्या अभ्यासक्रमात वाढ
अडचणींबद्दल
नव्या अभ्यासक्रमाची संदर्भ पुस्तके उपलब्ध नाही
दीड हजार गुणांच्या अभ्यासासाठी किमान दोन ते तीन वर्षे लागतात
आजवर केलेला अभ्यास विसरून नव्याने तयारी करावी लागेल
लिखाणाची सवय नाही, तयारीसाठी अपुरा वेळ
एमपीएससीऐवजी यूपीएससीच्याच विद्यार्थ्यांना फायदा
२०२० पासून एमपीएससी मुख्य परीक्षेत सातत्याने बदल करत आहेत. आता केलेल्या बदलाला आमचा विरोध नाही. मात्र तयारीसाठी अपुरा वेळ दिल्याने एमपीएससीचे मूळ विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. आयोगाने नवा अभ्यासक्रम २०२५ नंतर लागू करावा.
- विक्रम गोटे (नाव बदलले आहे)
एमपीएससीने घोषित केलेल्या नव्या अभ्यासक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटते? याबाबत आम्हाला आपल्या प्रतिक्रिया ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.
Web Title: Mpsc New Syllabus Unfair Aggressive Role Of Students Education
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..