एनआयएफटी २०२० चे अर्ज उपलब्ध

हेमचंद्र शिंदे
Tuesday, 26 November 2019

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधील (एनआयएफटी) देशभरातील नामांकित १६ संस्थांतील बॅचलर ऑफ डिझाइन व बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे ऑनलाइन अर्ज www.nift.ac.in संकेतस्थळावर ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहेत.

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधील (एनआयएफटी) देशभरातील नामांकित १६ संस्थांतील बॅचलर ऑफ डिझाइन व बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे ऑनलाइन अर्ज www.nift.ac.in संकेतस्थळावर ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहेत. 

फॉर्ममधील दुरुस्ती १ ते ४ जानेवारी, अॅडमिट कार्ड १० जानेवारी २०२० पासून संकेतस्थळावर उपलब्ध होतील. परीक्षा १९ जानेवारी २०२० रोजी देशभरातील ३२ शहरात होणार असून राज्यातील पुणे, नागपूर व मुंबई शहरांचा परीक्षा केंद्रात समावेश आहे. 

संस्थांची माहिती -
एनआयएफटी संस्थेची स्थापना १९८६मध्ये, फॅशन उद्योगातील डिझाइन व्यवस्थापन व तंत्रज्ञान विभागासाठी कुशल मनुष्यबळ घडविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे झाली. या संस्थेची मुंबई, बंगळूर, भोपाळ, भुवनेश्‍वर, चेन्नई, गांधीनगर, हैदराबाद, जोधपूर, कांग्रा, कन्नार, कोलकाता, नवी दिल्ली, पाटणा, रायबरेली, शिलाँग व श्रीनगर अशी सोळा केंद्रे आहेत. जागतिक स्तरावरील अत्यंत नामांकित या संस्थांमध्ये बॅचलर ऑफ डिझाइन व बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या चार वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमासबरोबरच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचीही सोय आहे. 

उपलब्ध जागा व पात्रता -
    बॅचलर ऑफ डिझाइनअंतर्गत फॅशन डिझाइन ४८७, लेदर डिझाइन १४८, अॅक्सेसरी डिझाइन ५००, टेक्स्टाइल डिझाइन ४६३, नीटवेअर डिझाइन २५३, फॅशन कम्युनिकेशन ४९० जागा उपलब्ध आहेत. यासाठी कोणत्याही शाखेतील बारावी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. 
    बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ॲपरल प्रॉडक्शन ४३३ जागा उपलब्ध असून, त्यासाठी मात्र बारावी विज्ञान शाखेतून पीसीएम विषयासह उत्तीर्ण तसेच अभियांत्रिकी शाखेतील कोणताही डिप्लोमाधारक यासाठी पात्र आहे. 
    पदव्युतरमध्ये दोन वर्षे कालावधीचा मास्टर ऑफ फॅशन डिझाइन १४६ जागा, मास्टर ऑफ फॅशन मॅनेजमेंट ५०६ जागा, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी १२४ जागा उपलब्ध असून, यासाठी बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अथवा इंजिनिअरिंगमधील पदवीधर विद्यार्थी पात्र आहेत. 

परीक्षा पद्धत व प्रवेश प्रक्रिया -
    बॅचलर ऑफ डिझाइनसाठी पहिला टप्पा कॅट-क्रिएटिव्ह अॅबिलिट टेस्ट ही तीन तासांची असते. या टेस्टमधून निरीक्षण क्षमता, डिझाइन क्षमता, नावीन्यपूर्ण कल्पनाशक्ती तसेच कलादृष्टी अजमावली जाते. 
    दुसऱ्या टप्प्यांत दोन तासांची गॅट म्हणजेच जनरल अॅबिलिटी टेस्ट घेतली जाते. यातून संख्यात्मक क्षमता, इंग्रजी भाषेचे ज्ञान व समज, तार्किक क्षमता, सामान्यज्ञान व चालू घडामोडी याबाबत तपासणी होते. एकूण १०० प्रश्‍न चुकीच्या उत्तरास पॉइंट २५ गुण वजा होतात.
    जानेवारी २०२० मधील लेखी परीक्षेचा निकाल फेब्रुवारी मार्चमध्ये जाहीर झाल्यानंतर त्यामधून मेरिटनुसार विद्यार्थ्यांची निवड करून एप्रिल मे महिन्यात सिच्युएशन टेस्ट घेतली जाते. या टेस्टसाठी काही वस्तू दिल्या जातात, त्याचा वापर विद्यार्थी किती कल्पकतेने करतात ते तपासले जाते. त्या नंतर गटचर्चा, मुलाखत, त्यानंतर कॅटमधील ५० टक्के, गॅटमधील ३० टक्के व सिच्युएशन टेस्टमधील २० टक्के, असे भारांकन देऊन बॅचलर ऑफ डिझाइनसाठी अंतिम निवड केली जाते.
    बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधील प्रवेशासाठी मात्र गॅट परीक्षा तीन तासांची व १५० गुणांची असून, १०० टक्के गॅटमधील गुणांद्वारे निवड केली जाते. 

आरक्षण व शुल्क -
देश पातळीवरील नियमानुसार अनुसूचित जातींसाठी १५ टक्के, अनुसूचित जमाती ७.५ टक्के, ओबीसी-एनसीएल २७ टक्के व मागील वर्षापासून सुरू झालेले जनरल- ईडब्ल्यूएस १० टक्के, याच सोबत ५ टक्के ईडब्ल्यूडी आरक्षण समांतर पद्धतीने आहे. शैक्षणिक शुल्क सुमारे २.३६ लाख दरवर्षी असून, त्यात प्रत्येक पुढील वर्षासाठी १२ हजार वाढ आहे. वसतिगृह व खाणावळ इतर खर्च वेगळे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NIFT form available for 2020 year