esakal | संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात संधी; ‘AICTE’ने सुरु केला ‘M. Tech’चा अभ्यासक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

‘AICTE’ने सुरु केला ‘M. Tech’चा अभ्यासक्रम

‘AICTE’ने सुरु केला ‘M. Tech’चा अभ्यासक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आवश्यक सैद्धांतिक व प्रयोगात्मक ज्ञान, कौशल्य आणि योग्यता प्रदान करण्यासाठी एम. टेक अभ्यासक्रम (पदव्युत्तर) सुरू केला आहे. यातून महत्त्वाकांक्षी अभियंत्यांना संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सहकार्याने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

दिल्ली येथे झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी आणि एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थिती या अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना कॉम्बॅट टेक्नॉलॉजी, एरो टेक्नॉलॉजी, नेव्हल टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन सिस्टम ॲण्ड सेन्सर, डायरेक्टेड एनर्जी टेक्नॉलॉजी आणि हाय एनर्जी मटेरिअल तंत्रज्ञान सारख्या सहा प्रमुख विषयांमध्ये प्रशिक्षण घेता येईल.

हेही वाचा: लस अपुरी; पुण्यात फक्त ६८ केंद्रांवर आज लसीकरण

हा अभ्यासक्रम एआयसीटीईशी संलग्न असलेले संस्था, महाविद्यालये तसेच आयआयटीच्या शाखा, एनआयटी किंवा खासगी अभियांत्रिकी संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात तो आयोजित करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायंटिस्ट ॲण्ड टेक्नॉलॉजिस्ट (आयडीएसटी) विविध संस्थांना मदत करणार आहे. विद्यार्थ्यांना डीआरडीओ प्रयोगशाळा, डिफेन्स पीएसयू आणि इंडस्ट्रीजमध्ये त्यांचे मुख्य प्रबंध कार्य करण्याची संधी सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

डॉ. रेड्डी म्हणाले,‘‘ अभ्यासक्रमामुळे संरक्षण क्षेत्रासाठी प्रतिभावान कर्मचाऱ्यांना तयार होण्यास मदत होईल. उद्योग क्षेत्रांनी यासाठी सहकार्य करावे आणि विद्यार्थ्यांना संधी द्यावी.’’

या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब नीलकंठ कल्याणी यांनी डीआरडीओ व एआयसीटीई यांचे अभिनंदन केले. संरक्षण तंत्रज्ञानासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करणे आणि आत्मनिर्भर भारताच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाचा वापर करण्याविषयी या वेळी माहिती देण्यात आली.

''हा अभ्यासक्रम संरक्षण तंत्रज्ञानामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासोबतच नवनवीन संरक्षण स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी संधी उपलब्ध करून देईल. तसेच विविध प्रकारचे संशोधन हे दररोजच्या जीवनाशी जोडले गेले पाहिजे. हे मानवी विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.''

- डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, एआयसीटीई

loading image