विपुल विकल्पांना पर्याय नाही

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात अभ्यासक्रमातील वैकल्पिक विषयांना खूपच महत्त्व दिले असून अकरावी-बारावीसाठी वैकल्पिक विषयांचे भरपूर आणि वैविध्यपूर्ण पर्याय सुचवले आहेत.
विपुल विकल्पांना पर्याय नाही
विपुल विकल्पांना पर्याय नाही Sakal

- डॉ. वसंत काळपांडे

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात अभ्यासक्रमातील वैकल्पिक विषयांना खूपच महत्त्व दिले असून अकरावी-बारावीसाठी वैकल्पिक विषयांचे भरपूर आणि वैविध्यपूर्ण पर्याय सुचवले आहेत. येत्या दहा वर्षांत नववीपासूनच वैकल्पिक विषयांचे पर्याय उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

सीबीएसईने सहावीपासूनच कला आणि व्यवसायशिक्षण या क्षेत्रांत वैकल्पिक विषयांची छोटी मोड्यूल उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप लवकर आपली आवड आणि क्षमता लक्षात यांचा अंदाज येईल आणि हे विषय माध्यमिक स्तरावर घ्यावेत की नाही, याबद्दल निर्णय घेणे सोपे होईल.

अकरावी-बारावीत सर्वसाधारणत: अपेक्षित चार वैकल्पिक विषयांखेरीज आणखी एक किंवा दोन अतिरिक्त वैकल्पिक विषय निवडण्याची मुभा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात दिलेली आहे. उच्च दर्जाच्या क्षमता असलेले काही विद्यार्थी अतिरिक्त विषयांची निवड केवळ आवड म्हणून किंवा आव्हानात्मक असे शिकायला मिळेल म्हणून करतील,

तर काहीजण या विषयांची पुढील करिअरमध्ये असलेली उपयुक्तता पाहून किंवा हे विषय पुढच्या अभ्यासक्रमांना कितपत पूरक ठरतील हे पाहून करतील. हे विषय शिकल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या जादा श्रेयांकांमुळे त्यांना हव्या त्या महाविद्यालयांत आणि हव्या त्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणे सोपे जाईल. मुख्य म्हणजे हे जादा वैकल्पिक विषय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या करिअरसाठीही आयुष्यभर उपयोगी होतील.

महाराष्ट्राच्या सध्याच्या अभ्यासक्रमात कितपत लवचिकता आहे? नववी-दहावीसाठी हिंदी किंवा सामाजिक शास्त्रे या विषयांऐवजी व्यवसायशिक्षण हा पर्याय उपलब्ध आहे. महाराष्ट्राची भाषाविषयक योजना खूपच व्यापक आणि लवचीक आहे.

भाषांचे संयुक्त अभ्यासक्रम हे केवळ महाराष्ट्राचेच वैशिष्ट्य आहे. दहावी किंवा बारावीचे अगदी एक-दोन किंवा दहा-वीस विद्यार्थी जरी बोर्डाच्या भाषायोजनेत असलेल्या भाषांच्या परीक्षेला बसले, तरी एसएससी बोर्ड त्यांची परीक्षा घेते.

कन्नड, तमिळ, सिंधी, फ्रेंच, स्पॅनिश, चिनी या भाषांची उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. मात्र महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमात भरपूर लवचिकता असली तरी अनेकदा प्रत्यक्षात तेवढ्या प्रमाणात तिचा वापर होत नाही. कला, वाणिज्य किंवा विज्ञान या शाखांच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेसाठी इंग्रजी आणि आणखी एक,

अशा दोन भाषा आणि चार वैकल्पिक विषय निवडायचे असतात, हे सर्वांना माहीत आहे. पण विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, संस्कृत, इंग्रजी वाङ्मय असे वैकल्पिक विषयही घेता येतात, असे सांगितले तर कितीजणांचा विश्वास बसेल? पण हे वास्तव आहे. असे असूनही बहुसंख्य विद्यार्थी चारही विषय विज्ञान शाखेचेच निवडतात.

काही ठिकाणी जीवशास्त्र किंवा गणित यांच्याऐवजी भूगोलासारखा एखादा विषय शिकवण्याची सोय असते. मात्र इतर वैकल्पिक विषयांचे पर्याय बहुतेक ठिकाणी शक्य असूनही विद्यार्थ्याना उपलब्ध करून दिले जात नाहीत.

विद्यार्थ्यांसाठी थोडेही जास्त किंवा वेगळे प्रयत्न करण्याची बहुतेक संस्थाचालकांची तयारी नसते. पालकांची मानसिकतासुद्धा अशा अडथळ्यांना पूरकच ठरते. या पार्श्वभूमीवर आणखी वेगळे घडू तरी काय शकेल? नवीन शैक्षणिक धोरणातील शिफारशीनुसार कला, वाणिज्य, विज्ञान अशा शाखा किंवा विद्याविषयक विषय आणि व्यवसाय शिक्षण, कलाशिक्षण,

शारीरिक शिक्षण या विषयांतील विभाजन हटवायचे असेल तर शिक्षणव्यवस्थेपुढे अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेपेक्षाही संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांची मानसिकता बदलणे हे मोठे आव्हान असणार आहे.

श्रेयांक पद्धतीमुळे विविध शैक्षणिक अर्हतांमधील समकक्षता ठरवणे आणि त्यामुळे सामान्य, व्यवसाय किंवा अभियांत्रिकी या तिन्ही शाखांच्या अभ्यासक्रमांतील लवचिकता वाढून एका अभ्यासक्रमातून दुसऱ्या कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेणे या बाबी सुकर होतील.

नवीन अभ्यासक्रमात दिलेले सर्व वैकल्पिक विषय शिकण्यासाठी शक्यतो शाळांमध्येच आवश्यक सुविधा आणि शिक्षक उपलब्ध करून द्याव्यात. ते शक्य नसेल तर इतर शाळांची आणि शिक्षकांची मदत घ्यावी.

परिसरातील माध्यमिक शाळांनी एकत्र येऊन समूह तयार केले, तर अनेक सुविधा सामाईकरीत्या वापरता येतील. परिसरातील इतर शैक्षणिक संस्था आणि उद्योगही मदत करू शकतील. ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायही वापरता येईल.  हे घडवायचे असेल तर आतापासूनच मानसिकतेतील बदलाच्या दिशेने पूर्वतयारी सुरू करायला हवी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com