संपन्न भाषेच्या उजळवाटा

इतर सजीवांच्या तुलनेत मानवाच्या अस्तित्वामध्ये भाषेचा वापर हा उन्नत प्रकार मानला जातो. आपली मराठी ही सर्व समकालीन भाषांमध्ये वैभवशाली परंपरा असलेली भाषा आहे. आजची ही व्यावहारिक भाषादेखील आहे.
संपन्न भाषेच्या उजळवाटा
संपन्न भाषेच्या उजळवाटाsakal
Updated on

करिअर अपडेट

प्रा. विजय नवले,करिअरतज्ज्ञ

इतर सजीवांच्या तुलनेत मानवाच्या अस्तित्वामध्ये भाषेचा वापर हा उन्नत प्रकार मानला जातो. आपली मराठी ही सर्व समकालीन भाषांमध्ये वैभवशाली परंपरा असलेली भाषा आहे. आजची ही व्यावहारिक भाषादेखील आहे. त्यामुळे मराठी भाषा हाच करिअरचा विषय मानला, तर आगळे-वेगळे करिअर होऊ शकते. विविध अभिव्यक्ती क्षेत्रांमध्ये उत्तम भाषाविषयक ज्ञान असल्यास त्याद्वारे करिअरच्या मार्गावर मोठे करिअर उभे राहू शकते. यातील शिक्षण आहे बी.ए.- मराठी.

कालावधी व पात्रता

बारावी कला (तसेच सायन्स, कॉमर्सदेखील) उत्तीर्ण विद्यार्थी बी.ए. प्रथम वर्षास प्रवेश घेऊ शकतो. बारावीतील गुणांच्या मेरिटनुसार प्रवेश मिळतो. सध्या तरी प्रत्येक महाविद्यालय स्वतंत्रपणे प्रवेशप्रक्रिया राबविते. विशेष म्हणजे, अनिवार्य स्वरूपाची प्रवेशपरीक्षा नाही.

स्वरूप

व्याकरण, भाषेचा इतिहास, कविता, गद्य, भाषेचा इत्थंभूत अभ्यास, भाषेचे विविध प्रकार, लेखक, कवी, कथा, गोष्टी, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, महत्त्वाची पुस्तके आदी सर्व अभ्यास करवून घेतला जातो. मराठी साहित्याचा अभ्यास या अभ्यासक्रमात होतो. थिअरी लेक्चर्समधून ज्ञानप्राप्ती चांगल्या प्रकारे होते. काही उत्तम शिक्षक तासांमध्ये हा मराठी विषय विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचवतात. वाचन, लेखन, विश्लेषण, मांडणी आदी अध्यापनाच्या काही चांगल्या पद्धती आहेत. संदर्भग्रंथांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मराठी भाषा केंद्रस्थानी ठेवून अनेक उपक्रम राबविले जातात, विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.

अभ्यासक्रमातून अपेक्षित ज्ञानप्राप्ती

  • मराठी भाषेचे आकलन विविध अंगांनी वाढणे.

  • मराठी व्याकरणाचे सौंदर्य अनुभवता येणे.

  • भाषेतील गद्य, पद्य, ग्रामीण साहित्य, प्राचीन ते अर्वाचीन काळातील साहित्य आदी अनेक भाषाविष्कार यांचे आकलन होणे.

  • भाषेवर प्रभुत्व मिळणे.

  • व्यावहारिक जगात भाषेच्या माध्यमातून यश मिळविण्याचे कौशल्य अवगत होणे.

  • मराठीतून लिहिता आणि प्रभावीपणे बोलता येणे.

पदे आणि कार्यक्षेत्रे

शिक्षण क्षेत्रात प्राथमिक, माध्यमिक, ज्युनिअर, सिनिअर आदी स्तरांवर शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांमध्ये शिक्षक, प्राध्यापक, प्रशिक्षक अशा अध्यापनाच्या संधी आहेत. प्रकाशनविश्वात लेखक, प्रूफ रीडर, भाषांतरतज्ज्ञ, टायपिस्ट आदींना संधी आहेत. वर्तमानपत्रे, नियतकालिकांमध्ये लेखक, पत्रकार, संपादक आदींना संधी आहेत. वकिली क्षेत्रात वकील, न्यायाधीश यांसोबतच क्लार्क, टंकलेखक आदी संधी आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळाल्यावर अधिकारी बनता येईल. कला, चित्रपट, नाट्यक्षेत्रात लेखक, गीतकार, गायक, अभिनेता, संवादलेखक होण्याच्या संधी आहेत. वक्ते, सूत्रसंचालक, प्रशिक्षक, प्रेरणादायी वक्ते हे भाषेच्या माध्यमातून समाजमनात सन्मानाचे स्थान मिळवतात. ग्रंथालयांमध्ये भाषिक ज्ञानाचा वापर करणारे ग्रंथपाल कार्यरत असलेले दिसतात.

उच्च शिक्षण

बी.ए. मराठीनंतर एम.ए. मराठी करता येते. त्यानंतर पीएचडी हे सर्वोच्च शिक्षण घेणे शक्य आहे. बीएनंतरही ‘एमबीए’ला प्रवेश घेता येतो. लायब्ररी शिक्षणासंदर्भात बी.लिब. हे शिक्षण घेणे शक्य असते. चित्रपट/नाट्य/कला क्षेत्रातील उच्च शिक्षण बी.ए.नंतर घेता येते. वकिलीचे शिक्षण घेणे शक्य असते. शिक्षक होण्यासाठीचे बीएड/सेट/नेट/डीएड करण्यासाठी बीए मराठी पात्र आहे.

स्कोप

मराठी भाषिकदृष्ट्या ऐश्वर्यसंपन्नता आहे. मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. व्यावहारिक आणि आधुनिक जगातदेखील मराठी भाषा टिकून आहे आणि तिच्या अस्तित्वाला अजिबात धोका नाही. मराठी साहित्य, नाटक, कविता, गीते, चित्रपट, विनोद, पुस्तके, लेख, वर्तमानपत्रे या सर्वांना पुढील काळात न संपणारा आवाका आहे. इंग्रजीचे आव्हान स्वीकारून ही भाषा तशीच दिमाखात उभी आहे. अध्यापन, प्रशासन, लेखन, सादरीकरण, संशोधन, संभाषण, साहित्य, रंगभूमी, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे, कला आदींमध्ये भाषेच्या प्रकटीकरणाचे प्रमाण कमी होणार नाही. यातील संधी लक्षात घेऊन संबंधितांना या क्षेत्रात पुढील काळात वाव राहू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.