
हटके : डोळसपणे घ्या निर्णय
- प्रणव मंत्री
मुळात दहावी आणि बारावीच्या वयात पाल्याला आपल्याला काय आवडते याची पूर्ण कल्पना आलेली नसते. फक्त एवढे कळते की कोणता विषय आपल्याला आवडतो. त्यामुळे शिक्षणाच्या या टप्प्यावर अनुभवांचा आधार घ्यावा लागतो. सध्या इतक्या काही संधी उपलब्ध असतात की पालक आणि पाल्य यांचा मनाचा गोंधळ उडू शकतो. यासाठी आपल्याला कोणत्या विषयात रुची आहे किंवा त्या विषयात काय काय शिकता येऊ शकते याचा थोडा आढावा पालकांनी घेऊन आपल्या पाल्याला मदत करावी.
कोणत्याही प्रकारचे शिक्षण वाईट नाही किंवा सध्याच्या काळात कोणतेही शिक्षण कमी दर्जाचे नाही. ज्या मार्गावर आपण जाऊ तिथे खडतर कष्ट, भरपूर अभ्यास करावा लागणार आहे. आपण त्या क्षेत्रात यशस्वी होऊ हे पालकांनी आपल्या मुलांना समजावून दिलेच पाहिजे.
हल्ली प्रत्येक ठिकाणी प्रवेश परीक्षा असतात. त्याचा अभ्यासही कसून करावा लागतो. त्याची तयारी पाल्यांनी ठेवली पाहिजे. काही कोर्ससाठी घरापासून दूर राहावे लागते किंवा काहींसाठी घराजवळ असले तरी प्रचंड शिक्षण शुल्क असते. पालकांनी याचा विचार करणे खूप आवश्यक आहे की खरोखर एवढा खर्च करून हाच कोर्स करणे महत्त्वाचे आहे का किंवा माझा पाल्य त्यासाठी योग्य आहे का? शिक्षणासाठी कर्ज अत्यंत व्यवस्थित पद्धतीने मिळू शकते पण हा प्राथमिक विचारही सुजाण पालक म्हणून करावा.
काय विचार कराल?
एखादे शिक्षण किंवा एखादी परीक्षा देण्यासाठी आपण आपल्या आयुष्याची काही वर्षे वेचणार आहोत, त्याचे गणित, आयुष्यात स्थिरवणे याचाही थोडा आराखडा मनाशी बांधला की मार्ग सुकर होतो. काही शिक्षणातून अर्थार्जनासाठी वेळ लागू शकतो त्याची मानसिक तयारी आपली आहे का हा विचार महत्त्वाचा ठरतो. विद्यार्थी नेहमी लोकप्रिय कोर्सकडे धाव घेतात. मग त्या कोर्समधून हजारो मुलं शिक्षण घेतात. त्यातली अनेक बेरोजगारच राहतात. आपण विशिष्ट अभ्यासक्रम निवडण्याचे फायदे पाहिले पाहिजेत. विशिष्ट अभ्यासक्रमाच्या दीर्घकालीन फायद्याचे कसून विश्लेषण करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये आधी शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मताचाही उपयोग करून घ्यावा. करिअर समुपदेशकाचे मार्गदर्शन उपयोगी ठरू शकते. या सगळ्यांसाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकमेकांशी सुसंवाद. आपले पालक, एखादी अनुभवी मोठी व्यक्ती किंवा कोणी समुपदेशक यांच्याशी मोकळेपणाने संवाद ठेऊन पूर्ण माहिती घेतल्यास योग्य त्या प्रकारच्या करिअरची निवड करून आयुष्य यशस्वी आणि सुखकर बनवता येते. एखाद्याचा चुकून मार्ग वेगळा निवडला गेला असेल तरी निराश न होता, योग्य मार्गदर्शनाखाली सोपी वाटचाल करता येते.
रुची कशात ते शोधा
तुमच्यासाठी अनुकूल आणि रूची असलेले करिअर शोधण्यासाठी, तुम्हाला तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे हे ओळखणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. तुमच्या मूळ मूल्यांचा आढावा घेणे, तुमच्या वृत्ती आणि कृतींचे मार्गदर्शन आणि प्रेरणा देणाऱ्या मूलभूत विश्वास तुमच्यासाठी नेमके काय महत्त्वाचे आहे हे समजून घेण्यास मदत करेल. तुमच्यासाठी कोणते करिअर योग्य आहे हे शोधण्यासाठी तुम्ही या माहितीचा वापर करू शकता.
एकदा तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी आणि तुमच्या सामर्थ्याची सामान्य कल्पना आल्यावर, संभाव्य करिअरची यादी तयार करा जे यासह संरेखित होते. उदाहरणार्थ, तुम्हाला पाककलेत नैपुण्य असेल आणि तुम्ही दडपणाखाली चांगले काम करत असाल, तर तुम्ही तुमच्या यादीत शेफ समावेश करण्याचा विचार करू शकता. तुमच्या सूचीमध्ये आणि नंतर प्रत्येकाचे तपशीलवार संशोधन सुरू करा. नोकरीमध्ये कोणती दैनंदिन कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचा समावेश होतो? भूमिकेत यशस्वी होण्यासाठी कोणती कौशल्ये आणि गुण आवश्यक आहेत? कामाचे सामान्य वातावरण आणि वेतन कसे आहे? कोणते शिक्षण, प्रशिक्षण आणि पात्रता आवश्यक आहेत? प्रत्येक करिअरबद्दल शक्य तितक्या अधिक माहितीसह स्वत:ला परिपूर्ण केल्याने आपण हे काहीतरी करताना पाहू शकता की नाही हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. आणि प्रभावीपणे आपले पर्याय कमी कमी होत जातील. त्यामुळे तुमचे करिअर निवडण्यापूर्वी सुज्ञपणे विचार करा. तुमच्या पुढील उज्ज्वल कारकिर्दीसाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.
(लेखक सीए, कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)
Web Title: Pranav Mantri Writes Ssc Hsc Students Guardian Decision Education
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..