नोकरी, बाजारपेठ : सज्ज व्हा, संधीचे सोने करायला ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jobs

कोरोनानंतर सर्वच क्षेत्रांचे आयाम पूर्णपणे बदलले असून, अनेक नकारात्मक परिणाम दिसून आले. त्याचबरोबर अनेक नव्या संधीही निर्माण झाल्या.

नोकरी, बाजारपेठ : सज्ज व्हा, संधीचे सोने करायला !

- प्रशांत लिखिते

कोरोनानंतर सर्वच क्षेत्रांचे आयाम पूर्णपणे बदलले असून, अनेक नकारात्मक परिणाम दिसून आले. त्याचबरोबर अनेक नव्या संधीही निर्माण झाल्या. त्या अचूक हेरून स्वतःला अपग्रेड केल्यास कोणत्याही आव्हानांचा सहज मुकाबला करता येईल. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातही हेच घडत आहे.

कोरोनाकाळात आयटी क्षेत्रातही नैराश्याचे मळभ दाटले होते. ते २०२० आणि २०२१ या दोन वर्षात टिकले. मात्र, ही परिस्थिती आता बदलली आहे. याकाळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला (आयटी) अनपेक्षित वाढही मिळाली. २०२०मध्ये १३१ अब्ज डॉलरचा हा उद्योग २०२५पर्यंत २९५ अब्ज डॉलरचा होतो आहे. लॉकडाउनच्या काळात वाढलेली सॉफ्टवेअर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची मागणी यासाठी कारणीभूत आहे. गुगल हँगआऊट, व्हाट्सॲप व्हिडिओ कॉल्स, झूम आणि मायक्रोसॉफ्ट टीम्ससारख्या ॲप्लिकेशन्सची उपयुक्तता जगाला कळाली आणि त्यातून आयटीची वाढ झाली.

नवी क्षेत्रे खुणावतील...

कोरोनाच्या काळात अनेक देशांनी नागरी सुविधांसाठी मोठ्या गुंतवणुकी केल्या. भारतात आरोग्य सेतूने केलेले काम आपण अनुभवले आहे. ‘५ जी’च्या वाढत्या मागणीमुळे आयटी उद्योगासाठी बऱ्याच संधी उपलब्ध होतील. भविष्यात टेलीहेल्थ झपाट्याने वाढणारा उद्योग असेल. यासाठी आयटी व्यवसायिकांना अनेक नव्या स्किल्समध्ये पारंगत व्हावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन, सायबर सिक्युरिटी, ब्लॉक चेन, क्लाऊड कॉम्पुटिंग, डेटा सायन्स, व्हर्चुअल रिअॅलिटी, रोबोटिक्ससारखी स्किल्स करिअरसाठी आवश्यक ठरू लागली आहेत. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी हवी. २०२५पर्यंत ५० अब्ज उपकरणे (कॉम्प्युटरशिवाय इतर इलेक्ट्रॉनिक आयुधे) औद्योगिक इंटरनेट ऑफ थिंग्जने जोडली जातील. आयटी उद्योग नजीकच्या भविष्यात इंटरनेट ऑफ बिहेव्हियरमध्ये मोठी प्रगती करेल. इंटरनेट ऑफ बिहेव्हियर हे इंटरनेट ऑफ थिंग्जचे एक्स्टेंशन असेल. हे सारे करण्यासाठी कुशल मनुष्यबळ लागेल. शैक्षणिक संस्थांनी उद्योगाची ही गरज ओळखून अभ्यासक्रम तयार करावे लागतील.

सकारात्मक वृत्ती, नैसर्गिक कल आणि लवचिकता ही त्रिसूत्री विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. सॉफ्टवेअर टेकनॉलॉजीच्या कामाची नैसर्गिक आवड, काम एकाग्रतेने करण्याची कुवत आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचे काम वेगवेगळ्या ग्राहकांसाठी विविध शहरातून करण्याची तयारी हे गुण महत्त्वाचे ठरतील. नवनवीन प्रकारची कामे भराभर शिकून घेण्याची वृत्ती उमेदवारांमध्ये आहे का, याचा नोकरी देताना नेहमीच विचार होतो. आयटी कंपन्या कॅम्पसमध्ये रिक्रुटमेंटसाठी येताना विद्यार्थ्याला त्याच्या क्षेत्रातील सखोल ज्ञान असावे, अशी अपेक्षा करतात. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात विद्यार्थ्याला आयटी कंपनीत इंटर्नशिप करावी लागते. बऱ्याच ठिकाणी हा काळ ३ ते ६ महिने असतो. अनेकदा या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्याला मानधन दिले जाते. प्रत्यक्ष कंपनीचे काम आणि त्यापासून स्वतःच्या कारकिर्दीची पायाभरणी करण्याची ही वेळ असते. कामाची सखोल माहिती आणि नवीन शिकण्याची तयारी, याच अपेक्षा कंपनी या विद्यार्थ्यांकडून करते.

नोकरीसाठी सज्ज होताना...

  • तुमच्या शाखेचे सखोल ज्ञान हवे.

  • नव्या तंत्रज्ञानाविषयी पारंगत नसलात, तरी त्याविषयी अपडेट राहा.

  • नवीन शिकण्याची तयारी, नव्या विषयीची उत्सुकता हवी.

  • इंजिनिअरिंगनंतरची इंटर्नशिप मन लावून करा.

(लेखक टीसीएसमध्ये सरव्यवस्थापक (एच.आर.) असून आयटी क्षेत्रात २५ वर्षे कार्यरत आहेत.)

टॅग्स :educationjobOpportunity