परदेशी शिकताना : परदेशी शिक्षण आणि व्यक्तित्व विकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

studying-abroad

महत्त्वाकांक्षी व्यक्ती, चांगला विद्यार्थी बनण्यासाठी आपला जास्तीत जास्त वेळ ज्ञान मिळवण्यासाठी आणि इच्छित क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये प्राप्त करण्यासाठी गुंतवणे आवश्यक आहे.

परदेशी शिकताना : परदेशी शिक्षण आणि व्यक्तित्व विकास

- ॲड. प्रवीण निकम

महत्त्वाकांक्षी व्यक्ती, चांगला विद्यार्थी बनण्यासाठी आपला जास्तीत जास्त वेळ ज्ञान मिळवण्यासाठी आणि इच्छित क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये प्राप्त करण्यासाठी गुंतवणे आवश्यक आहे. वेगवान बदलत जाणाऱ्या करिअर संधी प्राप्त करण्यासाठी आपण अधिक कार्यक्षम असावं. यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात मिळणाऱ्या वेळेचा प्रत्येक क्षण कौशल्य सुधारण्यासाठी देणे अपेक्षित आहे. जागतिकीकरणाच्या बहुआयामी विश्वात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी, आपल्याला ‘जग कसे कार्य करते’ हे समजून घेणे आवश्यक आहे. आपण बनवलेल्या स्वतःच्या परिमितीच्या बाहेर विचार करणे आणि वेगवेगळी मूल्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकतेच्या लोकांना समजून घेणे आवश्यक आहे. परदेशात भिन्न संस्कृतीतील विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेणार असल्याने बहुआयामी दृष्टी परदेशी शिक्षण घेण्यासाठी महत्त्वाची आहे.

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यावरच आपली क्षमता आणि गतिमानतेची भूक वाढते. परदेशात शिक्षणासाठी गेल्याने नवीन भाषा, संस्कृती शिकण्याची संधी मिळते. स्थानिक भाषा किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षण भाषा म्हणून इंग्रजीचे ज्ञान वाढवू शकतो. अशा प्रकारे ज्ञात भाषेच्या व्यतिरिक्त भाषा समजून घेत असताना, त्या नवीन भाषेची अक्षरे किंवा चिन्हे आणि त्यातून निघणारे विविध अर्थ आपल्यासाठी बौद्धिक समृद्धीचे नवीन जग उघडे करते. आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षण घेत असताना तुमचे सहकारी विद्यार्थी वेगवेगळ्या देशांतील असण्याची शक्यता असते. त्यांच्याशी तुमची मैत्री होते, तुम्ही विविध प्रकारच्या नवीन चालीरीती, परंपरा आणि दृष्टिकोन यांच्या संपर्कात येऊन नवीन दृष्टी मिळते. या अशा संस्कृतीत आपली जागरूकता वाढते आणि याआधी असणाऱ्या आपल्या पूर्वकल्पनांबद्दल अधिक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन देण्यासाठी आणि विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्न, प्राधान्यक्रम विचारात घेऊन, सूज्ञपणे निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचे ठरते. जागतिक वातावरणात काम करू पाहणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे कौशल्य आहे.

विद्यार्थी म्हणून शैक्षणिक कामगिरी महत्त्वपूर्ण आहेच. परदेशातील शिक्षणासाठी गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्तीच्या पात्रतेसाठी आपल्यामध्ये असणारे शैक्षणिक गुणवत्तेसोबतचे इतर कौशल्ये जमेची बाजू असू शकतात. तुमच्या व्यावसायिक प्रोफाइलच्या संदर्भात, हे दोन प्रकारे कार्य करेल. एक म्हणजे तुमच्या सीव्हीवर परदेशात अभ्यास केल्याचा उल्लेख दिसतो, तेव्हा ते असे सूचित करते की तुमच्यात कंफोर्टझोनच्या बाहेर पाऊल टाकण्याचे धैर्य होते. दुसरी गोष्ट म्हणजे, परदेशात अभ्यास केल्याने तुमची प्रोफाइल विविध कौशल्ये आणि गुण वाढवून समृद्ध होते. परदेशात शिकत असताना आपली मैत्री विविध देशातील मित्रांसोबत होऊन आंतरराष्ट्रीय संपर्काच्या नेटवर्कसाठी परिपूर्ण भक्कम पाय बनतो. परदेशात अभ्यास घेत असताना आपण कोण आहात? हे समजून घेता येते. परदेशात अभ्यास केल्याने तुम्हाला स्वतःची स्वतंत्र, संसाधनपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आवृत्ती बनण्याचे महत्त्वाची संधी मिळते.