
पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते.विद्यार्थ्यांनी काही ठराविक गोष्टींचा विचार पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठ निवडताना करावा. याबाबत आजच्या लेखात थोडीशी नजर टाकू.
परदेशी शिकताना : विद्यापीठ निवडतानाची खबरदारी
- ॲड. प्रवीण निकम
पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते.विद्यार्थ्यांनी काही ठराविक गोष्टींचा विचार पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठ निवडताना करावा. याबाबत आजच्या लेखात थोडीशी नजर टाकू.
अभ्यासक्रम आणि कोर्सचा आराखडा
शिक्षणानंतर पुढील करिअरच्या उद्दिष्टांशी संलग्नित असणारा अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने कोर्सच्या आराखड्यात काय समावेश केला आहे? तो निवडलेला कोर्स आपल्याला अपेक्षित कौशल्ये आणि ज्ञान समाविष्ट करणारा आहे का? या गोष्टी बारकाईने पहाव्यात.
प्रतिष्ठा आणि मान्यता
विद्यापीठाची प्रतिष्ठा आणि त्या विद्यापीठाला आवश्यक त्या मान्यता आहेत का? हे तपासून घ्यावे. विद्यापीठाची प्रतिष्ठा पाहण्यासाठी भारताचा विचार केल्यास त्या विद्यापीठाचा नॅक मानांकन दर्जा काय आहे? हे पाहणे आवश्यक ठरेल. याच बरोबर परदेशी विद्यापीठाचा विचार केल्यास, त्या विद्यापीठाचा जागतिक ‘क्यूएस’ मानांकन क्रमांक किती आहे? हे पाहणे आवश्यक ठरते. आपण कोणत्या विद्यापीठातून शिक्षण घेतले, त्या विद्यापीठाचे मूल्यांकन काय होते? या गोष्टींचा विचार नोकरीच्या बाजारपेठेत काही वेळेस केला जातो. या गोष्टी तपासाव्यात.
विद्याशाखा आणि संसाधने
विद्यापीठातील विशिष्ट विद्याशाखेची गुणवत्ता काय आहे?, त्या विद्याशाखेत अनुभवी शिक्षक आहेत का? याचबरोबर त्या विद्याशाखेत संशोधन सुविधा, सुसज्ज ग्रंथालय आणि त्या विद्याशाखेची उद्योग भागीदारी कशी आहे? यासारख्या संसाधनांची उपलब्धता यांचा विचार बारकाईने करावा.
स्थान आणि वातावरण
ते विद्यापीठ कुठे आहे? त्या सभोवतालचे वातावरण कसे आहे? त्याचा जीवनाच्या गुणवत्तेवर काही परिणाम होतो आहे का? इंटर्नशिपची उपलब्धता कशी आहे?, त्यासभोवताली भविष्यातील नोकरीच्या संधी आहेत का? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
खर्च आणि आर्थिक मदत
विद्यापीठाची निवड करताना तेथे शिक्षणासाठी, राहण्याचा-खाण्याचा खर्च किती येऊ शकतो? आणि आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार किती खर्च करू शकतो, शिक्षण घेत असताना आपल्यासाठी काही आर्थिक मदत पर्यायांची उपलब्धता आहे का? कोणती शिष्यवृत्ती मिळू शकते. त्या मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतून आपला खर्च आणि विद्यापीठाची शैक्षणिक फी आपण भरू शकतो का या गोष्टींचं ढोबळ गणित मांडणे महत्त्वाचे आहे.
माजी विद्यार्थी नेटवर्क
आपण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यापीठातील माजी विद्यार्थी कुठे आहेत आणि काय करीत आहेत याची थोडी कल्पना ठेवणेही महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी विविधता आणि समावेशनाला प्राधान्य देणारी विद्यापीठे शोधावीत.
अभ्यासेतर उपक्रम - विद्यापीठाचे विद्यार्थी जीवन आणि अभ्यासक्रमेतर क्रियाकलाप विद्यार्थ्याच्या एकूण अनुभवामध्ये, वैयक्तिक वाढीसाठी आणि नेटवर्किंगच्या संधींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
शाळा किंवा विद्यापीठ किंवा पदवीनंतर नोकरी निवडणे असो, योग्य निर्णय घेतल्याने विद्यार्थ्याच्या भविष्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. जीवनाचे असे महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना, एखाद्याने माहितीपूर्ण निवड करणे आवश्यक आहे. म्हणूनच, उच्च शिक्षण संस्था निवडताना अधिक माहिती गोळा करण्याचा कोणताही प्रयत्न महत्त्वाची भूमिका बजावतो. अशी माहिती शोधण्यासाठी इंटरनेटच्या मायाजालाचा प्रभावी वापर आपण नक्कीच केला पाहिजे. आपल्या आजूबाजूला असे शिक्षण घेतलेले कोणी आहे का? याचा शोध घेऊन, त्या व्यक्तीकडून प्रत्यक्ष अनुभव जाणून घेऊ शकतो. कोणी उपलब्ध नसेल तर, इंटरनेट अपना दोस्त तो है ही. भेटू पुढच्या भागात...
(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत.)