महाविद्यालयाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थी मुकले प्रवेशाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Admissions

सीईटी संकेतस्थळावर वेळेत कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे अनेकांचे प्रवेश रद्द.

Students Admission : महाविद्यालयाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थी मुकले प्रवेशाला

पुणे - राज्य सामाईक प्रवेश फेरीद्वारे (सीईटी) सोनालीचा दुसऱ्या फेरीत ‘एमबीए’ला क्रमांक लागतो. अन् पुण्याजवळील एक महाविद्यालय ‘अलॉट’ होते. मात्र, ऑनलाइन कागदपत्रे जोडताना ‘नॉन-क्रिमीलीयर’ नसल्यामुळे ती पोचपावती जोडते. पुढे १७ नोव्हेंबरला प्रवेशाची शेवटची मुदत असल्यामुळे १२ तारखेलाच सोनाली महाविद्यालयात जाऊन ‘नॉन-क्रिमीलीयर’सह सर्व कागदपत्रे जमा करते. मात्र, मुदतीपूर्वी संबंधित महाविद्यालयाने नॉन-क्रिमीलीयर अपलोड न केल्यामुळे सोनालीचा प्रवेश सीईटीसेलकडून रद्द करण्यात येतो. सोनालीसारखे अनेक विद्यार्थी सध्या अशा कारणांमुळे प्रवेशाला मुकले आहे.

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया प्रचंड लांबली असून, समन्वयाचा अभाव आणि नियमित संवादाच्या अभावामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रवेश निश्चित झाल्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना हा मनस्ताप सहन करावा लागतोय. राहुलचे पालक सांगतात, ‘‘माझ्या मुलाला पुण्यातील एका नामांकित संस्थेत अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळतो. कागदपत्रे अपलोड करताना ‘जात पडताळणी’ प्रमाणपत्र जवळ नसताना पोचपावती अपलोड केली. पुढच्या प्रवेशफेरी आधीच प्रमाणपत्र जमा करतो. मात्र काही दिवसांत माझ्या मुलाचा प्रवेश रद्द झाल्याचे सांगण्यात आले. कारण असेच कागदपत्रांचे देण्यात आले.’’ महाविद्यालयांकडून वेळेत जमा केलेली कागदपत्रे मुदतीपूर्वी अपलोड न केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाला मुकावे लागत आहे. पर्यायाने खुल्या प्रवर्गात प्रवेश घेण्याचे सांगण्यात येते. ज्याचे शुल्क काही लाखांत असते.

नियम काय सांगतो..

सरकारी परिपत्रकानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडे नॉन-क्रिमीलीयर किंवा जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास, त्याने पोचपावती अपलोड करावी. मात्र, पुढची प्रवेश फेरी सुरू होण्याच्या आत संबंधित महाविद्यालयाकडे संबंधित प्रमाणपत्र जमा करावे. अन्यथा प्रवेश रद्द करण्यात येतो. विद्यार्थी व संबंधित महाविद्यालयाकडे ऑनलाइन प्रमाणपत्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध असते.

खुल्या गटातून प्रवेशाची सक्ती?

आमच्या निदर्शनास आलेल्या बहुतेक घटना या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांशी निगडित आहे. कागदपत्र जमा न झाल्यास विद्यार्थ्याला शेवटच्या फेरीत खुल्या प्रवर्गात प्रवेश घ्यावा लागतो. अशा वेळी महाविद्यालये लाखो रुपयांचे शुल्क आकारतात. त्यामुळे महाविद्यालयांकडे कागदपत्रे जमा करूनही, त्यांनी वेळेत अपलोड न करण्याकडे, संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.

सीईटी सेल काय म्हणतो..

एखाद्या कागदपत्रांची पोचपावती जोडल्यास विद्यार्थ्याने दुसऱ्या फेरीपूर्वी संबंधित महाविद्यालयाकडे मुळ कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे. अशा विद्यार्थ्यांना आठवण करण्यासाठी मोबाईल आणि ई-मेलवर संदेशही पाठविण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही कागदपत्रे अपलोड झाली का नाही, याची मुदतीपूर्वीच खात्री करावी. शक्यतो प्रवेश प्रक्रियेत आधीच सर्वच कागदपत्रे तयार ठेवावीत.