विद्यापीठाकडून १६४ महाविद्यालयांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुणे, नगर, नाशिक, दादरा हवेली येथील १६४ महाविद्यालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Pune University : विद्यापीठाकडून १६४ महाविद्यालयांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी निधी

पुणे - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुणे, नगर, नाशिक, दादरा हवेली येथील १६४ महाविद्यालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुणे विद्यापीठाकडून ‘गुणवत्ता सुधार योजना’ सुरू करण्यात आली असून या योजनेंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ‘‘शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाविद्यालयांनी अर्ज केले होते. त्यापैकी १६४ महाविद्यालये या योजनेसाठी पात्र ठरली असून त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आयोजित करण्यासाठी पुणे शहरातील ४९, पुणे ग्रामीणमधील १६, नाशिकमधील १९, नगरमधील १५, दादरा हवेली येथील एक अशा अशा शंभर महाविद्यालयांचा समावेश आहे. यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी पुणे शहरातील २७, पुणे ग्रामीणमधील १७, नाशिकमधील १२ व नगरमधील ८ असे एकूण ६४ महाविद्यालयांचे अर्ज पात्र ठरले आहेत. या महाविद्यालयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले. पात्र ठरलेल्या महाविद्यालयांना १५ फेब्रुवारी २०२३ पूर्वी ही कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहे. तसेच मिळणारा निधी हा नियम व अटी नुसार खर्च करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे केवळ विद्यापीठ व वर्तुळाभोवती मर्यादित न राहता व्यापक स्वरूपात, ग्रामीण भागातही त्याची तेवढीच अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी या संधीचा लाभ घेत व्यापक स्वरूपात याची माहिती सर्वांना उपलब्ध करून द्यावी व योग्य अंमलबजावणी करावी.’

- डॉ. संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ