esakal | पुणे विद्यापीठाची परीक्षा होतेय अधिक पारदर्शक
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

पुणे विद्यापीठाची परीक्षा होतेय अधिक पारदर्शक

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला कोरोनामुळे आॅनलाइन परीक्षा घ्यावी लागली, पण आता अनुभवातून एकएक पाऊल पुढे टाकत या परीक्षा अधिक पारदर्शक व गैरप्रकार रोखण्यासाठी बंदोबस्त केला जात आहे. प्रथम सत्र परिक्षेत प्रॉक्टर्ड मेथडचा वापर सुरू केला, त्यामध्ये आणखी सुधारणा करत कॅमेऱ्यातून फोटो घेण्यासह आता आवाज देखील रेकॉर्ड केला जाणार असल्याने कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चाप बसणार आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाची पहिला लाट सुरू झाल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. त्यामळे केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सुमारे अडीच लाख जणांची आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली, नियोजन व अनुभवाचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर देऊनही तो सबमीट न होणे, परीक्षा बंद पडली, प्रश्‍नसंचात चुका असणे यामुळे गोंधळ माजला होता. तसेच विद्यार्थ्यांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने विद्यार्थ्यांनी सामुहिक कॉपी केली, गुगलवर उत्तरे शोधली, त्यामुळे निकालात सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली होती. या सर्व परिस्थितीचा विचार करून विद्यापीठाने आॅनलाइन परीक्षा पद्धतीत बदल करण्यास सुरवात केली.

विद्यापीठाने एप्रिल-मे महिन्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा घेताना त्यात प्रोक्टॅर्ड पद्धतीचा वापर सुरू केला. विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, टॅबचा फ्रंट कॅमेरा सुरू ठेऊन परीक्षा द्यावी लागली. त्यामध्ये मोबाईलमध्ये दुसरी विंडो सुरू केली, इंटरनेट बंद केले किंवा संशयास्पद हालचाली केल्यास त्यास इशारा दिला जात होता. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आपोआप बंद होत असल्याने त्यावर गैरप्रकार केल्याची कारवाई केली जात आहे. परीक्षा पद्धती कडक केल्याने परीक्षेतील तांत्रिक प्रश्‍न देखील कमी झाले आहेत. त्यामुळे ५ लाख ७९ हजार ९२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन देखील गोंधळ झाला नाही. या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या ३५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

१२जुलै पासून विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा सुरू होत आहे. यामध्ये २८४ अभ्यासक्रमाचे ६ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यावेळी परीक्षेत कॅमेरा असणार आहेच, पण त्याचसोबत व्हाइस रेकॉर्डिंग देखील केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि इतर कोणाचा परीक्षेसंदर्भातील संवाद रेकॉर्ड झाल्यास कॉपी पकडली जाणार आहे. त्यामुळे पारदर्शक परीक्षेच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.

हेही वाचा: PERA CET 2021 : अर्ज भरण्यासाठी १२ जुलैपर्यत मुदतवाढ

‘‘कोरोनामुळे आॅनलाइन परीक्षा होत असली तरी त्यात सतत सुधारणा करण्यात येत आहे. प्रोक्टर्ड मेथडचा वापर करताना आता फोटो घेण्यासह आवाज देखील रेकॉर्ड केला जाईल. त्यामुळे गैरप्रकार करण्याचे प्रमाण टळेल. विनाकारण कोणत्याही विद्यार्थ्यांना याचा त्रास होणार नाही.’’

-डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

प्रथम सत्र परीक्षेचा तपशील

  • परीक्षेचा कालावधी - एप्रिल- मे

  • एकूण अभ्यासक्रम - २८४

  • परीक्षार्थी - ५.७९ लाख

  • गैरप्रकार करणारे परीक्षार्थी - ३५०

loading image