पुणे विद्यापीठाचे अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांशी पाच सामंजस्य करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

अमेरिकेतील नामांकित विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांसमवेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पाच सामंजस्य करार केले आहेत.

पुणे विद्यापीठाचे अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांशी पाच सामंजस्य करार

पुणे - अमेरिकेतील नामांकित विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांसमवेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पाच सामंजस्य करार केले आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे करार करण्यात आले आहेत. यात सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क या विद्यापीठाशी केलेल्या करारानुसार तेथे ‘भारतीय केंद्रा’ची स्थापना करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या शिष्टमंडळाने ४ ते १८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अमेरिकेत दौरा केला. यात पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, रूसा समन्वयक तसेच विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांचा शिष्टमंडळात सहभाग होता. दौऱ्यादरम्यान विद्यापीठाने केलेल्या करारातून भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक नवीन शैक्षणिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास डॉ. काळे यांनी व्यक्त केला आहे. न्यूयॉर्कमधील विद्यापीठात भारतीय केंद्र स्थापन करण्यासाठी पुणे विद्यापीठासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठानेही करार केला आहे.

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या धर्तीवर विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत. याला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या भेटीचे आयोजन केले होते. नामांकित विद्यापीठाशी सबंध प्रस्थापित करण्याचे आदेश राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा २.०) देण्यात आले आहेत. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने १३ विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या.

पुणे विद्यापीठाने केला या विद्यापीठांशी सामंजस्य करार

- सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क या विद्यापीठात भारतीय केंद्राची स्थापना करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

- ब्राँनक्स कम्युनिटी कॉलेज, बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज यांच्यासमवेत करार केले आहेत.

- ड्रेक्सेल युनिव्हर्सिटीसमवेत केलेल्या करारातून जैव विज्ञानशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम अधिक सक्षम करण्यात येईल, यात संशोधन करणाऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे.

- केलिकॉर्निया युनिव्हर्सिटीसोबत केलेल्या करारात उद्योजकता विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान याबाबत काम करण्यात येईल.

- ‘स्टुडंट्स सपोर्टिंग इस्राईल सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्यासमवेतही करार केला आहे.

‘अमेरिकेतील विविध विद्यापीठांसमवेत झालेल्या सामंजस्य करारातून भविष्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये आदान प्रदान, द्विलक्षी अभ्यासक्रम, कार्यशाळा, परिषद, संशोधन प्रकल्प याचे आयोजन करण्यात येईल. अनेक परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय कला, संगीत, योग आणि आयुर्वेद यात रस आहे. परंतु त्यांना चांगले शिक्षक उपलब्ध नाहीत. या कराराद्वारे परदेशी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील.’

- डॉ. कारभारी काळे, प्रभारी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Pune University Has Five Memorandum Of Understanding With Reputed Universities In America

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :americaPune University