करिअरच्या वाटेवर : ड्राफ्ट्‌समन प्लस

अभियांत्रिकीच्या सर्व शाखांना ड्रॉइंग विषय हा मूलभूत व सामाईक असल्याने सर्व अभियंत्यांना ड्राईंगचे मूलभूत ज्ञान मिळते.
draftsman plus engineering
draftsman plus engineeringsakal
Summary

अभियांत्रिकीच्या सर्व शाखांना ड्रॉइंग विषय हा मूलभूत व सामाईक असल्याने सर्व अभियंत्यांना ड्राईंगचे मूलभूत ज्ञान मिळते.

- राजेश ओहोळ

अभियांत्रिकी डिझाईन शास्त्रानुसार रचना केलेल्या वस्तूचे आकारमान, आतील-बाहेरील रूप, महत्त्वाची मापे, भूमितीय संबंध, अपेक्षित उत्पादन प्रक्रिया, अचूकतेचा दर्जा अशा व इतर अनेक गोष्टी अभियांत्रिकी ड्राईंगमार्फत दाखविता येतात. अभियांत्रिकी ड्रॉइंग हे एक शास्त्र आहे. आयएसओ परिमाणांचे पालन करून काढलेले ड्रॉइंग हे शास्त्रशुद्ध व सर्वमान्य समजले जाते. ड्रॉइंग ही अभियांत्रिकीतील भाषा असून, कुठल्याही अभियांत्रिकी वस्तू उत्पादनामध्ये ड्रॉइंग पेपर अविभाज्य भाग असतो.

अभियांत्रिकीच्या सर्व शाखांना ड्रॉइंग विषय हा मूलभूत व सामाईक असल्याने सर्व अभियंत्यांना ड्राईंगचे मूलभूत ज्ञान मिळते. डिझाईन झालेल्या वस्तूचे कच्चे रेखाटन व नंतर उत्पादन किंवा निर्मितीसाठी सविस्तर पक्के अभियांत्रिकी ड्रॉइंग ड्राफ्ट्‌समन अभियंत्यांनी पुरविलेल्या माहितीआधारे तयार करतात.

ड्राफ्ट्‌समन हा पूर्वीपासून अस्तित्वात असलेला प्रमाणपत्र दर्जाचा अभ्यासक्रम आहे. बहुतांशी सर्व शासकीय आणि शासनमान्य आयटीआय संस्थांमध्ये ड्राफ्ट्‌समन प्रमाणपत्र अभ्यासक्रम दहावी/ बारावी उत्तीर्ण विद्यार्थी करू शकतात. अगदी व्होकेशनल अकरावी/बारावी अभ्यासक्रमांमध्येही हा विषय शिकविला जात आहे. ड्राफ्ट्‌समन हा ट्रेड स्वयंरोजगार व रोजगार या दोन्हींसाठी फायदेशीर ठरतो. सर्व वास्तुविशारद स्थापत्य अभियंते, स्थापत्य सल्लागार/कंत्राटदार यांना कुशल ड्राफ्ट्‌समनची मदत घ्यावी लागते. अभियांत्रिकी कंपन्या/उद्योग/प्रकल्प केंद्र व राज्य सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये यंत्र व स्थापत्य ड्राफ्ट्‌समन म्हणून नोकरी मिळवू शकतात.

ड्रॉइंग सॉफ्टवेअरच्या आगमनाने ड्रॉइंग हाताने काढण्याची परंपरा लुप्त होत आहे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या मदतीने काढलेल्या ड्राईंगची अचूकता, स्पष्टता, द्विमितीय व त्रिमितीय रचना व कधीही कुठलाही बदल करण्याची लवचिकता अशा व इतर बाबींमुळे कॉम्प्युटर एडेड डिझाईन (Auto CAD) या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरला सर्वत्र प्राधान्य दिले गेले आहे. ड्राईंगची ‘सॉफ्ट कॉपी’च्या आधारे ड्रॉइंग साठवून ठेवण्यास व हस्तांतर करण्यास अत्यंत सोईस्कर झाले आहे. त्यामुळे साहजिकच ऑटोकॅड सॉफ्टवेअर प्रशिक्षित ड्राफ्ट्‌समनची मागणी दिसत आहे.

जुन्या व नवीन ड्रॉइंग अभिलेख डिजिटलायझेशनमार्फत आहे तशा स्वरूपात तंतोतंत पुनर्निर्मिती करता येतात. व्हेक्‍टर व राश्‍टर ग्राफिक्‍सचा यासाठी आधार घ्यावा लागतो. या अभिलेखांचे सॉफ्ट कॉपीतील रूपांतर हे भविष्यातील संदर्भाकरिता किंवा सद्य गरजांसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे डिजिटलायझेशनचा वापर सध्या सर्वत्र सुरू झाला आहे.

तेव्हा व्यावसायिकता जोपासण्याकरिता ड्राफ्ट्‌समन उमेदवारांनी ड्राफ्ट्‌समन या मूलभूत पात्रतेखेरीज अशा नवीन सॉफ्टवेअर पॅकेजचे ज्ञान व कार्यानुभव घेणे जरुरीचे वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com