परदेशात शिकताना... : ॲप इंडस्ट्रीतील करिअरसाठी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

app Industry
परदेशात शिकताना... : ॲप इंडस्ट्रीतील करिअरसाठी...

परदेशात शिकताना... : ॲप इंडस्ट्रीतील करिअरसाठी...

sakal_logo
By
राजीव बोस

मागील दशक संपर्क क्रांतीचे होते, असे म्हणता येईल. या काळात आपण आपले मित्र, कुटुंबीय किंवा व्यावसायिक कारणांसाठी एकमेकांच्या कशाप्रकारे संपर्कात राहतो आहोत, याला मोठे महत्त्व आले आहे. पूर्वी केवळ फोन करून समोरच्याशी संवाद साधणे एवढाच फोनचा उपयोग होता, मात्र स्मार्ट फोन आल्यानंतर कनेक्टिव्हिटी अतिशय सोपी झाली आहे व फोन करणे या गोष्टीला अनेक नवे परिमाण प्राप्त झाले आहेत. मोबाईल फोनचा प्राथमिक उपयोग केवळ जाहिरात, मार्केटिंग आणि विविध सेवा क्षेत्रांत प्राधान्याने होत असे. मात्र, नंतरच्या काळात त्याचा अनेकविध क्षेत्रांत विकास झालेला पाहायला मिळाला आहे. यामध्ये आरोग्य आणि इन्शुअरन्ससारख्या अनेक क्षेत्रांचा समावेश असून, मोबाईल फोनने कोणताही उद्योग किंवा संस्था यामधून वगळलेली नाही. सध्या जगभरात लाखो प्रकारचे मोबाईल ॲप्स वापरले जात आहेत.

ॲप इंडस्ट्री ही विकासाचा विचार करता जगातील सर्वांत प्रभावशाली आणि महत्त्वाची इंडस्ट्री आहे, याबद्दल कोणीही शंका उपस्थित करणार नाही. ॲपची संपूर्ण इंडस्ट्री ॲपल आणि गुगल या दोन महाकाय कंपन्यांमध्ये चालणाऱ्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधील संशोधनांच्या जोरावर चालते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ॲप विकसित होण्याचा प्रचंड वेग पाहून संशोधकांनाही या क्षेत्रातील सर्व कार्यप्रणाली जाणून घेण्याची इच्छा निर्माण होत आहे. सध्या विकसित झालेल्या सॉफ्टवेअर तंत्रज्ञानातील सर्वांत आधुनिक, मोठे उपयोग असलेले, आर्थिक फायदे मिळवून देणारे व त्यामुळेच सर्वाधिक वापरात असलेले तंत्रज्ञान आहे मशिन लर्निंग. या तंत्रज्ञानाच्या मदतीने इमेज रेकग्निशन, सेंटिमेंट क्लासिफिकेशन, लॅग्वेज ट्रान्सलेशन, जनरल पॅटर्न रेकग्निशन अशा अनेक गोष्टी करणे सहज शक्य होते. त्याच्या जोडीला ॲग्युमेंटेड रिॲलिटी या क्षेत्राचीही मोठी मदत होत असून, त्याद्वारे मोबाईल गेम्स, शिक्षण, इ-कॉमर्स व इतर अनेक उद्योगांना भरारी घेण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते आहे.

ही दोन्ही क्षेत्रे वेगाने विकसित झाली आहे व आता विविध पातळ्यांवर या क्षेत्रातील तज्ज्ञांना असलेली मागणी वाढत चालली आहे. या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवला जात असल्याने अनेक पातळ्यांवर संशोधनांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. इंडस्ट्रीची हीच गरज ओळखून भारतासह परदेशातील अनेक विद्यापीठांनी मोबाईल ॲप डेव्हलपमेंट या क्षेत्रासाठी सर्वव्यापी व नियोजनबद्ध अभ्यासक्रम विकसित केले आहेत. या क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरमधील मोठे नैपुण्य आवश्‍यक असतेच, त्याच्या जोडीला ॲप लोकांच्या पसंतीस उतरावे यासाठीची उपजत सर्जनशीलताही अंगी असणे गरजचे ठरते. या क्षेत्रात भविष्यात करिअरच्या व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या अनेक संधी आहेत. इंडस्ट्रीची गरज व स्वतःचे नैपुण्य याचा संगम साधत अभ्यासक्रम पूर्ण करीत या क्षेत्रात प्रवेश करणे विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

loading image
go to top