गोष्ट पहिल्या पावलाची... 

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर 
Thursday, 27 August 2020

काहीवेळा आपण आठवणींत अडकतो. मात्र, त्यातून क्षणभरात बाहेर येऊ शकतो. या तरुणाने पहिले कोणते पाऊल उचलले असेल, तर त्याने आपल्याला त्रास होतोय याचा स्वीकार केला, असे मला वाटते.

ही डिसेंबर २०१३ची गोष्ट. पुण्यातील मॉलमध्ये मी एका तरुणासोबत कॉफी घेत होतो. मी त्याला विचारले. ‘‘तू मला सांग तरी, तुझ्यात नेमका कोणता बदल झाला आणि त्यामुळे तू आत्मविश्वास गमावलास?’’ 

‘‘सांगतो सर, मला वाटते या सर्वांची सुरवात मी नववीत असताना झाली. एकेदिवशी अख्ख्या वर्गानेच तास बुडविण्याचे ठरविले. मात्र, मला माझ्यातील मूल्ये नियमांविरुद्ध वागण्याची परवानगी देत नव्हती. त्यामुळे, मी त्यावर आक्षेप घेतला. माझ्या वर्गमित्रांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. मधल्या सुट्टीनंतर पुढील दोन तास वर्गात परतायचे नाही. मैदानावरच थांबायचे, असे त्यांचे नियोजन होते.’’ त्याने त्याच कहाणी सांगण्यास सुरुवात केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तो पुढे म्हणाला, ‘‘मी एकटाच वर्गात परतलो. शिक्षक आले. कुणीच नसल्यामुळे नाराज झाले. मात्र, त्यादिवशी कोणत्यातरी अन्य कारणांमुळे त्यांनी मला शिकविले नाही. त्यानंतर, अपेक्षेप्रमाणे माझ्या वर्गमित्रांनी माझ्यावर बहिष्कार टाकला. पुढील काही दिवस त्यांनी माझा सतत अपमानही केला. त्याचप्रमाणे, दोनतीन आठवडे वर्गातील माझे जवळचे मित्रही माझ्याबद्दल बोलत होते. सतत होणाऱ्या निंदानालस्तीमुळे माझ्यावर परिणाम होऊ लागला. ते मला भित्रा म्हणू लागले. नेमके तेव्हापासूनच सर्व गोष्टी बदलल्या.’’ तो दु:खी स्वरात बोलत होता. त्याचे बोलणे संपले असे वाटल्यावर मी त्याला विचारले, ‘‘मला एक सांग, कोणत्या गोष्टींमुळे तू वर्गातील ३० विद्यार्थ्यांविरुद्ध एकटा उभा  राहिला.’’

हेही वाचा  : गोष्ट आत्म्याच्या वयाची

तो म्हणाला,‘‘सर, माझ्यातील आत्मविश्वास, मूल्ये, स्पष्ट भूमिकेमुळे मी हे करू शकलो.’’ 

मी त्यात आणखी भर टाकत पुढे विचारले, ‘‘आणि धैर्य, होय ना? त्या दिवशी तू भित्रा म्हणून वागलास की धाडसी, आत्मविश्वासू बनून?’’ 

‘‘धाडसी बनून,’’ त्याने हसत उत्तर दिले. त्यानंतर काही क्षण त्याचे डोळे तेजाने चमकू लागले. त्याची अचानक बदललेली ऊर्जाही मला जाणवली. 

काहीवेळा आपण आठवणींत अडकतो. मात्र, त्यातून क्षणभरात बाहेर येऊ शकतो. या तरुणाने पहिले कोणते पाऊल उचलले असेल, तर त्याने आपल्याला त्रास होतोय याचा स्वीकार केला, असे मला वाटते. त्यानंतर स्वत:मध्ये आधीपासूनच असणाऱ्या धैर्याचा अंश त्याने घेतला. तुम्हीही असे पाऊल उचलताय ना? 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh sud article about improve u r self article

Tags
टॉपिकस
Topic Tags: