वेगळ्या वाटा : सलून व्यवसाय सुरू करताना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salon Business

सध्या महिला व पुरुषांचा कल सुंदर दिसण्याकडे आहे. या धर्तीवर सलून व्यवसाय हा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित व्यवसाय आहे.

वेगळ्या वाटा : सलून व्यवसाय सुरू करताना...

- रत्ना कुलकर्णी

सध्या महिला व पुरुषांचा कल सुंदर दिसण्याकडे आहे. या धर्तीवर सलून व्यवसाय हा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित व्यवसाय आहे. साधारण आढावा घेतल्यास ब्युटी किंवा सौंदर्य उद्योग हा २८ टक्के इतकी प्रतिवर्ष वृद्धी दाखवत असून २०२५ पर्यंत हा उद्योग १.८९ कोटीची उलाढाल करेल असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

केवळ प्रमाणपत्र घेतल्याने किंवा कोर्स केल्याने हा व्यवसाय सुरू करता येईल असे नाही. मुळात, कुठलीही नवीन गोष्ट सुरू करणे सुरुवातीला कठीण असते, परंतु योग्य तयारी आणि नियोजन केल्यास आपण सहजरित्या ती करू शकतो. सलून व्यवसाय तुम्हाला एका मोठ्या उंचीवर नेऊ शकतो. हा व्यवसाय चालवताना कुठल्या बाबींवर लक्ष द्यावे? चला पाहूया.

व्यावसायिक आराखडा बनवा

सलूनचा व्यावसायिक आराखडा बनवताना महत्त्वाचे घटक म्हणजे भांडवल, प्रति महिना जागेचे भाडे व इतर खर्च, तुमचे प्रत्यक्ष ग्राहक कोणते? त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्केटिंगचा खर्च इ. लक्षात घ्या.

सलूनची जागा

तुम्हाला सोईस्कर आहे म्हणून घरातूनच सुरू करू नका. एखादे खूप गर्दीचे ठिकाण किंवा मुख्य बाजारपेठेतील मोक्याची जागा पाहून सुरू करा. तिथे पार्किंगची व्यवस्था असेल असे ठिकाण निश्चित करा.

कार्यप्रणालीचे व्यवस्थापन

मदतनीस असेल तरी ग्राहकांना येणारा अनुभव सारखाच असला पाहिजे. यासाठी मदतनिसांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कामाचे व्यवस्थापन योग्य रीतीने करणे आवश्यक आहे. मागच्या महिन्यात किती हेअरकट्स घेण्यात आले, त्या तुलनेत हेअर स्पा झाले का? पुढच्या महिन्यात हा आकडा वाढवण्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार करून त्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत. दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, दर वर्षी आपल्या कामाचे सिंहावलोकन करण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक ग्राहकाची तपशीलवार संगणकीकृत नोंद करून ठेवल्यास आढावा घेणे सोपे जाते.

बजेटचे व्यवस्थापन

मागील तिमाहीत साहित्यासाठी किती खर्च आला यावरून बजेटचा अंदाज लावता येतो. बजेटमध्ये मदतनीसांसाठी तरतूद असावी. कधीतरी त्यांना भेटवस्तू देणे, त्यांच्यामार्फत आलेल्या ग्राहकांसाठी त्यांना प्रोत्साहनपर मानधन देणे इ. गोष्टी समाविष्ट करणे गरजेचे आहे. वर सांगितल्याप्रमाणे संगणकीकृत नोंदींचा जीएसटी व टीडीएस भरताना उपयोग होऊ शकेल आणि त्याप्रमाणे खर्च वजा करता निव्वळ नफा मिळवण्यासाठी नियोजन करता येईल.

मार्केटिंगच्या खर्चाची तरतूद

मार्केटिंगकडे गुंतवणूक म्हणून पहा. उत्तम मार्केटिंग प्लॅन आणि जुने ग्राहक टिकवण्यासाठीचा चांगला प्लॅन तुमच्याकडे असलाच पाहिजे. कारण व्यवसायामध्ये कुठल्याही क्षणी, तुमचे २० टक्के ग्राहक तुम्हाला सोडून जातात. मार्केटिंग ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येते. ऑफलाइन मार्केटिंगमध्ये एखाद्या ग्राहकाने तुमच्या सलूनमध्ये अन्य एखाद्या ग्राहकाला पाठवले तर त्यानिमित्त विशेष सवलत, तीन ते चार सेवांवर एक सेवा मोफत, नियमितपणे दर महिन्याला तुमच्याकडून एखादी सेवा घेणाऱ्या ग्राहकाला वर्षाला एक सेवा मोफत अशा साध्या वाटणाऱ्या परंतु महत्त्वपूर्ण बाबींचा कल्पकतेने वापर करता येईल.

सलून बंद करण्याचे नियोजन

तुम्हाला निवृत्त होताना किती रकमेची आवश्यकता आहे हे आधीच निश्चित करून त्याप्रमाणे नियोजन करा. निवृत्त होण्याचे नियोजन हा यशस्वी उद्योग मॉडेलचा महत्त्वाचा भाग आहे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एखाद्या सलून व्यावसायिक मार्गदर्शकाचा सल्ला घेणे नक्कीच फायद्याचे ठरेल.

(लेखिका सलून प्रॉफिटॅबिलिटी कोच आहेत.)

Web Title: Ratna Kulkarni Writes Starting A Salon Business

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationjobBusiness