esakal | रि-स्किलिंग : महत्त्व सादरीकरणाचे...। Re-Skilling
sakal

बोलून बातमी शोधा

रि-स्किलिंग

रि-स्किलिंग : महत्त्व सादरीकरणाचे...

sakal_logo
By
विनोद बिडवाईक

मी माझे करिअर सुरू केले, तेव्हा एखादा अहवाल, प्रस्ताव वरिष्ठांना सादर करायचा असेल, खूप मोठे काम असायचे. पॉवर पॉइंट स्लाइडऐवजी, तो लिहावा लागत असे. टाइप करून नंतर तो सादर करावा लागत असे, त्यांनतर वरिष्ठ तो अहवाल अथवा प्रस्ताव वाचत असत, सुधारणा असल्यास त्या सांगत असत. त्या अहवालावर प्रतिक्रिया अथवा प्रस्तावाचे उत्तर काही महिन्यांनंतर आरामात येत असे.

कमी वेळेत प्रभावासाठी

आता मुळातच आपला सर्वांचाच लक्षाचा कालावधी (span of attention) कमालीचा कमी झाला आहे. मोठमोठी मेल्स आता कोणी लिहीत नाहीत, व्यवसायाचे प्रस्ताव, पॉवर पॉइंट स्लाइडमध्ये तयार करून चर्चा केल्या जातात. विषयाचा आशय कमी शब्दांत सांगावा लागतो. चर्चा करताना, मुद्देसूद मांडणी करावी लागते, योग्य शब्दांचा वापर करावा लागतो. ग्राहकांना आपले उत्पादन विकत असताना, त्याचे फायदे हे योग्य उदाहरण आणि डेटाचा आधार घेऊन सांगावे लागतात. संस्थेमध्ये सर्व जण आपापल्या कामात व्यग्र असताना, त्यांचा वेळ सांभाळावा लागतो. आणि हे सर्व करत असताना त्यांना आपले काम करण्यासाठी प्रभावितही करावे लागते.

संप्रेरण आणि कालावधी

समजा तुम्ही कार्यालयात जात असताना, तुम्ही अचानक तुमच्या एखाद्या वरिष्ठ अधिकारी (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अथवा व्यवस्थापकीय संचालक) यांना लिफ्टमध्ये बघता. ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी ३० ते ६० सेकंदांचा वेळ असतो. अशावेळेस तुम्ही स्वतःची कशी ओळख करून देणार? ह्यालाच ‘एलेव्हेटर पीच’ असे म्हणतात. तुम्ही कोण आहेत, कशासाठी आलात आणि तुमचा उद्देश काय आहे हे सर्व ३० ते ६० सेकंदात तुम्हाला सांगता आले, की तुमचे संप्रेरण कमालीचे व्यावसायिक आहे असे मी म्हणेल.

आता तुमचे संप्रेरण फक्त संस्थेमधील मेल्स, अहवाल आणि प्रस्तावापुरते मर्यादित राहिले नाही. सोशल मीडियाचा प्रभाव आपल्या कामाच्या पद्धतीवरही पडत आहे. संस्थेमध्ये तरुण आणि सळसळत्या रक्ताची मंडळी येत आहेत. त्यांच्या स्वतःच्या बॉसबद्दल आणि एकूण कामाबद्दल वेगळ्या अपेक्षा आहेत. त्यांना प्रेरित करून त्यांच्याकडून काम करून घ्यायचे असल्यास त्यांची भाषा आपल्याला बोलावी लागेल.

ही भाषा वेगळी आहे. ही नवीन भाषा, ती सादर करण्याची पद्धत शिकून घ्यावी लागेल. एखाद्या प्रकल्पाची माहिती वेगवेगळ्या सामाजिक माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने सादर करावी लागते. संस्थेमधील एखादा अतिशय महत्त्वाचा संदेश, सर्वांना कसा समजेल असे सादरीकरण करणे ही खरी परीक्षा असते.

जो विषय तुम्हाला सांगायचा आहे, त्याची तयारी करा, त्या विषयांबद्दल सर्व माहिती लिहून काढा.

जर तुम्ही एखाद्या लहान मुलाला एखादी संकल्पना शिकवू शकला, तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. तुमचा विषय हा लहान मुलाला समजावून सांगायचा आहे, असे समजून तो अजून सोपा करा. हे करत असताना, आपले ज्ञान खरेच संपूर्ण आहे का, ह्याचा विचार करा, आणि काही अंतर असेल तर त्याचा अभ्यास करा, तो सोपा करा आणि परत तो लहान मुलाला समजून सांगता येईल, का हे बघा. स्टोरी टेलिंग (Story telling) हा व्यावसायिक संप्रेरणाचा, संस्थेतील संवाद वाढवण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे गोष्टी सांगायला शिका.

loading image
go to top