Reading Strategies & Tips: टिप्स - वाचन अनिवार्यच..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reading Strategies & Tips

Reading Strategies & Tips: टिप्स - वाचन अनिवार्यच..!

Reading Strategies & Tips: अभ्यास उत्तम करून आपण करिअर चांगले करू शकतो, हे ठीक आहे; परंतु मुळात पालकांनी लहानपणीच मुलांचे आयुष्य किती गंभीरपणे घेतले आहे, यावरही करिअर तुम्ही उत्तम करता की नाही, हे ठरते. चांगले करिअर करण्यासाठी उत्तम वाचन अनिवार्यच आहे.

काय वाचावे?

मराठीत आणि इंग्रजीतही असंख्य पुस्तके आहेत. फक्‍त मार्गदर्शन, तत्त्वज्ञान यासाठीच पुस्तके वाचायला हवीत, असे नाही. नेहमीच्या कथा-कादंबऱ्याही आपल्याला काही ना काही शिकवून, देऊन जातातच.

आपले आयुष्य मर्यादित, त्यातला अनुभव मर्यादित. प्रत्येक माणूस जगातल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव कसा घेणार? म्हणूनच वेगवेगळे अनुभव घेतलेल्या व्यक्‍तींचे लेखन वाचावे.

अनेक घरांत पालकांना वाचनाची आवड नसते. परिणामी पाल्याला वाचनाची आवड निर्माण होत नाही. बदलत्या काळात पाल्याला माहितीपूर्ण पुस्तके उपलब्ध होण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत.

आपण उत्तम वाचन न करता करिअर निश्‍चित करू शकतो, परंतु चांगले करिअर मात्र करू शकत नाही.

विधी, अभियांत्रिकी, वैद्यक शाखेकडे कल असणाऱ्यांना वाचन आवश्यकच आहे.

वाचन कमी असेल व उत्तम मराठी, इंग्रजी साहित्य, भाषा, सामान्य ज्ञान, समाजशास्त्राची पुस्तके वाचलेली नसल्यास अनपेक्षित अडचणींना तोंड देणे शक्‍य होणार नाही.

काय करावे?

आपल्याला नेमके काय काम करायचे आहे? आपली आवड काय आहे? आपला कल काय आहे? याचा विचार करूनच करिअरची निवड करावी. असा विचार करण्याची क्षमता वाचनातूनच निर्माण होते.

राजकारण, समाजकारण, भाषा, जाहिरात, पत्रकारिता, खेळ, अभियांत्रिकी, एमबीए, मार्केटिंग... क्षेत्रे अनेक आहे. कोणी समाजसेवक होऊ शकते, तर कोणी संशोधन परंतु त्यासाठी पाया पक्का असणे क्रमप्राप्त आहे.

पालक अभ्यासासाठी मुलांच्या मागे लागतात. केवळ गुणांच्या मागे लागून त्यांना भंडावून सोडतात. त्याऐवजी त्याच्याशी बोला. त्याची आवड लक्षात घेऊन त्याला पूरक अशी पुस्तके आणून द्या. त्यातून पाल्याला विचार करायला वाव राहील.

पालक आणि पाल्याने एकत्रितपणे पुस्तके वाचल्यास त्यांच्या ज्ञानात भर पडेल. लोक काय पद्धतीने जगतात, त्यासाठी काय करतात, हे कळेल. पुस्तके म्हणजे ज्ञानाचा खजिनाच आहे. तो न वाचता करिअरची निवड करू नका. आयुष्य गांभीर्याने घेतले तर, तरच चांगली करिअर करता येईल.

मला काय समजते? अशी पालकांनी भूमिका न ठेवता. पाल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे समजून घेऊन त्याबाबत अधिक माहिती मिळवावी.