
JEE Main Exam : बारावीत ७५ टक्के आवश्यक असण्याच्या नियमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
पुणे : देशभरात नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) ‘जेईई मेन’ची पहिली सत्र परीक्षा जानेवारीत होत आहे. परंतु जेईई मेन परीक्षा दिल्यानंतरही एनआयटी, ट्रीपलआयटी यांसह अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये बी.ई आणि बी.टेक अभ्यासक्रमाच्या प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीत कमीत कमी ७५ टक्के गुण आवश्यक असल्याचा नियम समाविष्ट करण्यात आला आहे. या बारावीत ७५ टक्के गुण असावेत, ही अट पुन्हा एकदा लागू केल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. एनटीएने जानेवारी आणि एप्रिलमध्ये अशा दोन सत्रात होणाऱ्या ‘जेईई मेन’ परीक्षेचा तपशील जाहीर केला आहे.
गुण असणाऱ्याच विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल, असे एनटीएमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच बारावीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांना जेईई मेनमध्ये पात्र चांगली रॅंक मिळाली, तरीही अशा विद्यार्थ्यांना एनआयटी, आयआयटी, ट्रिपल आयटी अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळणार नाही. संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७५ टक्के गुण असण्याचा नियम यापूर्वीही होता. परंतु कोरोनाच्या काळात परीक्षा न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या निकालावर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतून दोन वर्षे हा नियम काढून टाकण्यात आला होता, आता तो पुन्हा लागू करण्यात आला आहे. दरम्यान, ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असणारे असंख्य विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून जेईई मेनच्या परीक्षेची तयारी करत आहेत. परंतु राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जेईई परीक्षेला अतिशय कमी वेळ राहिला असताना, नियम जाहीर केल्यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
‘‘एनटीएने परीक्षेला अल्पावधी राहिला असताना, ‘जेईई मेन परीक्षे’ची घोषणा करत नियम देखील जाहीर केले आहेत. या अंतर्गत देशातील नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी बारावीत ७५ टक्के गुण आवश्यक असतील, हा नियम ‘एनटीए’ने वर्षभरापूर्वीच विद्यार्थ्यांपर्यंत पोचविणे आवश्यक होते. यापूर्वीच ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवून बारावी उत्तीर्ण झालेले आणि गेल्या वर्षभरापासून जेईई मेन परीक्षेची तयारी करणारे असंख्य विद्यार्थी हे आता पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी नाराज झाले आहेत.’’
- अनुभा सहाय, अध्यक्षा, इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशन
७५ टक्के गुणांची अट मागे घ्या..
जेईई मेन परीक्षेतील स्कोअरद्वारे देशातील संबंधित शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाच्या प्रक्रियेतील ‘बारावीत ७५ टक्के गुण आवश्यक’ ही अट मागे घ्यावी, अशा मागणी विद्यार्थी सोशल मिडियाद्वारे करत आहे. या अंतर्गत ट्विटरवर ‘#75GoBack’ हा हॅशटॅग वापरून विद्यार्थ्यांनी ही मागणी लावून धरली आहे.