esakal | ‘निकाल’ दहावीचा की शिक्षणाचा?
sakal

बोलून बातमी शोधा

10th result

‘निकाल’ दहावीचा की शिक्षणाचा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-डॉ. विजय पांढरीपांडे

राज्याच्या शालान्त परीक्षा मंडळाने एकदाचा निकाल लावला. पण तो दहावीचा की एकूणच शिक्षण व्यवस्थेचा, हा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. काही जखमा या तात्पुरत्या असतात. कालांतराने त्या भरून निघतात; पण शिक्षण खात्याचे जे काही धरसोड धोरण चालले आहे, ते दूरवर परिणाम करणारे आहे. शेकडो विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत. गुणांची किती अन् कशी खैरात करावी, यालाही मर्यादा हव्यात. खेळ, कला यातील प्रवीण्यासाठी गुणांची उधळण करण्यात आली आहे! करोना काळात ते कुणी, कसे, कुठे मिळवले? देव जाणे!

ज्या परीक्षा झाल्या, त्या विद्यार्थ्यानी घरी बसून दिल्या.या संदर्भात मी काही विद्यार्थ्याशी मनमोकळी चर्चा केली. या परीक्षेत नेहेमीच्या परीक्षेसारखे गांभीर्य नव्हते. कॉपीला वाव होता. बोर्डाच्या नियमित परीक्षेतदेखील विद्यार्थी कसे कॉपी करतात, त्यांना पर्यवेक्षकांची, शिक्षकाची कशी साथ असते, हे आपण टीव्हीवरील बातम्यात प्रत्यक्ष बघतो. मग या ऑनलाईन परीक्षेत किती गांभीर्य, किती खरेपणा असेल? कोरोना स्थितीचे गांभीर्य जगभर सर्वश्रुत आहे. भारतातील किंवा महाराष्ट्रातील कुणा शिक्षण तज्ज्ञाने, अधिकाऱ्याने, मंत्र्याने या बाबतीत इतर देशात काय चालले आहे, तिथले शिक्षण, परीक्षा, मूल्यमापन कसे केले जाते, याचा अभ्यास केला आहे का? शंका आहे.

हेही वाचा: ड्रोनच्या धोक्यावर अत्याधुनिक यंत्रणांचा उतारा

एरवी प्रत्येक वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, समिती नेमली आहे, अहवाल मिळाला आहे, त्याचा आम्ही अभ्यास करीत आहोत,अशी छापील, ठोकळेबाज उत्तरं अधिकारी, मंत्री देतात. पण ही मंडळी नेमका काय अन कशाचा अभ्यास करतात हे शेवटपर्यंत कळत नाही!कारण त्यांना स्वतःला परीक्षेला बसायचे नसते. आता दहावीनंतर पुढील प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेण्यात येणार आहे. जर ‘सीईटी’ घेण्याचा निर्णय झालाच होता तर त्याच पद्धतीत थोडे फेरफार करून बोर्डाची परीक्षाही सहज घेता आली असती. पण लक्षात कोण घेतो?

हेही वाचा: ‘स्वच्छंद ॲडव्हेंचर’ची स्पिती व्हॅलीतील शिखरावर यशस्वी चढाई

एरवी पुढील शिक्षणासाठी म्हणा, करीअरसाठी म्हणा, दहावी, बारावी, बोर्डाचे गुण पाहिले जातात. बोर्डाच्या गुणांचे महत्त्व पूर्वी तरी अधोरेखित होते.आता अशी गुणांची उधळण झाल्यामुळे या बोर्डाच्या निकालाकडे जाणकार ढुंकुनही बघणार नाहीत! ते नव्वद किंवा शंभरचे दर्शनीय आकडे म्हणून कागदावरच राहतील. हे सगळे शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांनाही कळते, सरकारला, अधिकाऱ्यांनाही कळते; पण वळत नाही! अन्यथा फी वाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या पालकांनी ही गुण उधळण नको म्हणून मोर्चे काढले असते. सध्याची स्थिती ‘न भूतो न भविष्यती’ अशी आहे, हे मान्य केले तरी, प्रत्येक समस्येला उत्तर असतेच.

हेही वाचा: पैलवान झाला बिझनेसमन; 'हेल्दी' व्यवसायाची अनोखी कहाणी

त्यासाठी सर्व तज्ज्ञांनी एकत्र येण्याची गरज आहे. वेगवेगळे पर्याय शोधणे, प्रत्येक पर्यायाची चिकित्सक छाननी करून त्यातील बऱ्या-वाईट परिणामांवर चर्चा करणे, उत्तम पर्यायाचा शोध घेणे, निर्णयावर ठाम राहणे,अन सरतेशेवटी बऱ्यावाईट परिणामांसाठी सर्वांनी तयार राहणे, रिस्क घेणे, अशा मार्गानी समस्या सोडविणे हाच एकमेव उपाय दिसतो. त्यासाठी लागणाऱ्या तज्ज्ञांची, मनुष्यबळाची आपल्याकडे कमी नाही.असे निर्णय घ्यायला धैर्य, इच्छाशक्ती लागते.गुणांची उधळण करून ,कसेतरी एकदाचे निकाल लावून प्रश्न सुटणार नाहीत.

loading image
go to top