लॉकडाउनमुळे अनेक पुरुषांची पंचायत झाली

लॉकडाउनमुळे अनेक पुरुषांची पंचायत झाली

लॉकडाउनमुळे माझ्यासारख्या अनेक पुरोगामी पुरुषांची पंचायत झाली आहे. स्त्री पुरुष समानता आम्ही मानतो आणि वेळ पडल्यावर घरातली सगळी कामं करू, असं अनेक वर्ष आम्ही म्हणत आलो आहे. वेळ कधीच येणार नाही, म्हणून आम्ही निश्‍चिंतपणे अशी विधानं करत होतो. नाईलाजानं मीही घरी हातभार लावायला लागलोय. त्याचा हा अंतरिम अहवाल. 

कामवाल्या मावशींना पाणी कमी वापरा असं म्हणत पर्यावरणाचे धडे देणे सोपं आहे, पण स्वतः करणं अत्यंत अवघड. घासणीचे अनेक प्रकार आहेत, क्वालिट्या आहेत. एवढ्या छोट्या वस्तूचाही दर्जा महत्त्वाचा असतो, याचा विचार मी कधी केला नव्हता. भांडी घासता घासता, घरातल्या कोणी किती आणि कसला घास वाया घालवलाय, हे लक्षात येतं. काचेचा एकही ग्लास न फोडता भांडी धुवून झाल्यास माझा जीव भांड्यात पडतो. 

ग्लॅमरस लोकांच्या बेडवरचे किस्से ऐकायला अनेकांना आवडतात. आपण त्यांच्या जागी असतो तर काय केलं असतं, अशी स्वप्न देखील काही लोक पाहतात. मला मात्र बेडच्या खाली काय होत असेल, याचं कुतूहल आहे. लहानपणी पलंगाखाली भूत आहे याच्यावर माझा ठाम विश्‍वास होता. बुद्धिप्रामाण्यवादी झाल्यापासून पलंगाखालच्या भुताची भीती कमी झालेली नाही, फरक एवढाच की आता ती चारचौघात व्यक्त करता येत नाही! लॉकडाउनच्या निमित्तानं झाडू करता-करता बेडखालच्या विश्‍वात अनेक वर्षांनी प्रवेश केला. इथं अनेक डबे, कार्डबोर्डचे बॉक्स, प्लॅस्टिकच्या पिशव्या चादरी आणि इतर घबाड दिसलं. चार-पाच दिवस ते रोज साफ करूनही दरवेळी धूळ आणि केस याचा साक्षात्कार होतच राहिला. अजूनही सुरूच आहे, स्रोत काही सापडत नाहीये. या सगळ्या डब्या आणि बॉक्समध्ये नेमकं काय आहे, हे घरातल्या कुणालाच माहीत नाहीय. 

झाडू आणि सुपली हे काश्मीरमधल्या भाजप आणि पीडीपी सरकारसारखं वाटतं. अनेक वर्षे रात्री उशिरा टीव्ही बघत असताना शॉपिंग नेटवर्कवर लागणाऱ्या जाहिराती बघून, ‘काय वेडेपणा आहे, कोण घेणारे असली उपकरणे? झाडू आणि पोछामध्ये काय लेटेस्ट शोध लावत बसलीत हे लोक?’ असं वाटायचं. पण आता अनुभवानं मी हुशार झालोय आणि रोज रात्री दोनचा गजर लावून या सगळ्या जाहिराती बघायला लागलोय. 

अब्जाधीश उद्योगपतींचा पत्नींना घर कामात मदत करणारा व्हिडिओ मी फेसबुकवर टाकलाय. ते बघून अनेकांना अत्यानंद झाला. ‘आम्हाला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण बघा या बड्या लोकांची कशी मस्त जिरवली,’ यात धन्यता मानणारे लोक आपण बघितले होते. 

माझी नजर चुकवून बायको सगळी भांडी धुऊन टाकते. वर्षातून दोनदा मी पीएमपीचा प्रवास करतो आणि दर आठवड्याला ‘माझ्यासारखा सार्वजनिक वाहतुकीनेच प्रवास करा,' वगैरे रेडिओवर बोलतो, म्हणजे हे २१ दिवस धुतलेल्या भांड्यांच्या भांडवलावर मी पुढची २१ वर्ष स्वावलंबनाच्या गप्पा मारणार, अशी तिला भीती असावी. आणि दर वर्षी त्या कथेत थोडीशी भर पडत जाईल आणि काही वर्षांनी ‘मी घरचीच काय अख्या बिल्डिंगची भांडी धुतली, अनेक वृद्ध आणि आजारी लोकांच्या घरी जाऊन त्यांची भांडी धुतली, त्यांना खायला घातलं, डेक्कन परिसर सगळा धुवून पुसून काढला, त्या २०२०च्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस,’ असा लौकिक निर्माण करेन - हे सगळं तिला आत्ताच दिसतंय. आपल्या जोडीदाराला आतून बाहेरून ओळखून असणं, हीच यशस्वी संसाराची गुरुकिल्ली आहे. 

बायकोला या सदरच्या माध्यमातून सांगू इच्छितो, अगं एकदा का लॉकडाऊन संपला आणि शांताबाई परत कामावर आल्या, की तुझा हा फेमिनिस्ट, पुरोगामी नवरा पुन्हा कधीच घरातलं काम करणार नाही, काळजी नसावी. उरले काही दिवस तरी माझ्या ‘सदरा’मध्ये हे काम केल्याचे पॉइंट्स जमा होऊ दे की! तसंही संसाराच्या खेळात तू अब्जावधीच्या स्कोअरनं पुढेच आहेस! मी - आणि बहुतेक पुरुष हे गाळातच आहोत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com