RTE Admission 2024 : यंदा चार हजार जागांवर होणार प्रवेश; आरटीईमध्ये जिल्ह्यातील ५७३ शाळांचा राहणार सहभाग

यंदा शासनाने आरटीई कायद्यात बदल केल्यामुळे केवळ मराठी माध्यमाच्या शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जात होता.
RTE Admission 2024
RTE Admission 2024Sakal

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास सुरवात केली आहे. पोर्टलवर जिल्हानिहाय सुधारित शाळांची संख्या आणि प्रवेश क्षमता प्रसिद्ध केली आहे.

त्यानुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५७३ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील ४ हजार ४४१ जागांवर लवकरच प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

यंदा शासनाने आरटीई कायद्यात बदल केल्यामुळे केवळ मराठी माध्यमाच्या शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जात होता. विद्यार्थ्यांच्या घरापासून एक कि.मी. अंतरावर इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहायित शाळा असूनही या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली नव्हती.

त्यामुळे शासनाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सरकारच्या ९ फेब्रुवारी २०२४ च्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता जुन्या पद्धतीनेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आपल्या पाल्यांना पुन्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळणार असल्याने पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सुधारित प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार? याकडे पालकवर्गाचे लक्ष लागले आहे; तसेच शिक्षण विभागानेसुद्धा नव्याने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत एनआयसीला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एनआयसीने आरटीई प्रवेशास पात्र शाळांची संख्या आणि उपलब्ध जागा यांची यादी आरटीई पोर्टलावर प्रसिद्ध केली आहे.

आधी कमी प्रतिसाद

सध्या आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची लिंक बंद आहे. मात्र, पालकांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. पूर्वी जिल्ह्यातील २ हजार आठशे शाळांमधील आरटीईच्या ३६ हजार ४११ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.

मात्र, पालकांकडून सरकारी शाळांच्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी केवळ चार हजार पालकांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याने अर्जांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com