मानसशास्त्रातील  संधी 

प्रा. संजीव सोनवणे
Thursday, 30 January 2020

मानसशास्त्रीय अभ्यास व उपचार पद्धती एक मोठा व्यवसाय व नोकरीच्या संधी देणारा ठरला आहे. 

वाटा करिअरच्या  
स्पर्धात्मक जीवनात ताण व चिंता यांनी मानवी जीवन व्यापले आहे. जीवन स्तर उंचावणे म्हणजे ताणाची सोबत आलीच. शालेय जीवन व त्यानंतर नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जीवन, वृद्धापकाळातील ताण व चिंता जगण्यात बाधा आणतात. अनेकदा त्याचे स्वरूप गंभीर बनते व जीवन हवे की नको येथपर्यंत मजल जाते. त्यामुळेत मानसशास्त्रीय अभ्यास व उपचार पद्धती एक मोठा व्यवसाय व नोकरीच्या संधी देणारा ठरला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मानसशास्त्रातील क्षेत्रे 
मानसोपचार तज्ज्ञ 

मानसिक आजारावर उपचार करणारे, मानसशास्त्राचे उपयोजन करणारे, उच्चशिक्षित तज्ज्ञांना मोठी मागणी असणारे व आर्थिक लाभ देणारे हे आव्हानात्मक क्षेत्र आहे. 

औद्योगिक संस्थात्मक मानसशास्त्रज्ञ 
औद्योगिक क्षेत्रातील स्पर्धात्मक जीवनामध्ये मानसिक स्वास्थ्य राखणे व कामगारांना प्रेरणा देत राहणे आवश्‍यक बनले आहे. मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवी व त्याचबरोबर औद्योगिक संस्था मानशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना औद्योगिक संस्थांमध्ये मोठ्या संधी आहेत. 

मज्जामानसशास्त्र 
मेंदू व संज्ञात्मक विज्ञान क्षेत्रामध्ये आवड असणाऱ्यांसाठी व डॉक्‍टरेट मिळवलेल्यांना मेंदूचे आजार व मज्जासंस्थांसंबंधित क्षेत्रातील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे चांगली मागणी आहे. संशोधन, अध्यापन, औषधांचा मज्जासंस्थेवर होणारा परिणाम अभ्यासणाऱ्या औषध कंपन्या, हॉस्पिटल, मानसिक स्वास्थ्य केंद्रे अशा तज्ज्ञांची वाट पाहत असतात. 

नैदानिक मानसशास्त्र 
नैराश्‍य व मानसिक आजारामध्ये तपासण्या, निदान, उपचार व प्रतिबंधात्मक उपचारांसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मागणी वाढत आहे. यासाठी मानसशास्त्रातील डॉक्‍टरेटसह नैदानिक मानसशास्त्रामधील अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. 

न्यायवैद्यक मानसशास्त्रज्ञ 
गुन्हे विश्‍लेषणासाठी, गुन्हेगारांची मानसिकता अभ्यासण्यासाठी व तपासशास्त्रात मानसोपचार तज्ज्ञांची आवश्‍यकता असते. कायद्याच्या पदवीनंतर न्याय वैद्यकशास्त्रातील अभ्यासक्रम गरजेचा असतो. 

शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ 
शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या वर्तन व अध्ययन समस्या सोडविण्यासाठी, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी, व्यवसाय निवड, समुपदेशन या मानसशास्त्राशी निगडित गरजांमुळे या क्षेत्राला मागणी आहे. मानसशास्त्राच्या पदव्युत्तर पदवीबरोबर शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना नोकरी अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे उत्तम क्षेत्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjeev sonawane article Opportunities in Psychology