
मृदुला अडावदकर - सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
“अगं मी नाही येऊ शकणार. अथर्वच्या शाळेतून प्रोजेक्ट आलाय. त्याचा प्रोजेक्ट दरवर्षी ‘बेस्ट प्रोजेक्ट’ म्हणून सिलेक्ट होतो. केवढं काम असतं अगं त्याच्या प्रोजेक्टचं!’’ नेहा फोनवर सांगत होती. अथर्वला ‘बेस्ट प्रोजेक्ट’चं बक्षीस मिळवून देणे हाच जणू तिच्यासाठी एक प्रोजेक्ट होता. नेहासारखे कितीतरी पालक आहेत की जे मन लावून स्वतःच मुलांचे शाळेचे प्रोजेक्ट करत असतात. दुसरीकडे साहिलकडे मात्र शाळेचा प्रोजेक्ट आला की घराचं रणांगणच होतं. पालकांची प्रचंड चिडचिड, वैताग यातच तो प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करून दिला की तो शीण घालवायला म्हणून ते छोटीशी ट्रीप करून येतात.