छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीची निवड यादी तत्काळ प्रसिद्ध करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship

राज्य सरकारडून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील ७५ विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती राबविली जाते.

छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीची निवड यादी तत्काळ प्रसिद्ध करावी

पुणे - परदेशी विद्यापीठातून पदव्युत्तर पदविकेची प्रवेश परीक्षा खूप मोठ्या मेहनतीने परीक्षा पास केली आहे. न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये प्रवेश देखील मिळाला आहे. मात्र, राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीची निवड यादी अद्यापही जाहीर झाली नाही. त्यामुळे १ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमाला मुकावे लागणार असल्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी आकांक्षा पाटील या विद्यार्थिनीने केली आहे.

राज्य सरकारडून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील ७५ विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती राबविली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत परदेशी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या, तिथल्या विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभागाकडून मे महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाते. मात्र, या विभागाच्या उदासीन कारभारामुळे ऑगस्टचा शेवटच्या आठवड्यातही यादी प्रसिद्ध झाली नाही. मेहनतीने अमेरिकेतील विद्यापीठात मिळालेला प्रवेश रद्द करण्याची वेळ येणार आहे, अशी खंत द प्लॅटफॉर्म या संघटनेचे राजीव खोब्रागडे यांनी व्यक्त केली.

विद्यार्थी म्हणतात...

  • परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती निवड यादीला होणारा उशीर ही गंभीर बाब आहे

  • अभ्यासक्रमाचे सुरवातीचे काही आठवडे, महिने गमवावे लागणार

  • विलंबामुळे शेवटी काही विषयांमध्ये अपयश आले तर शिष्यवृत्ती येणे विभागाच्या नियमाप्रमाणे थांबते

  • परदेशात पैसे नसल्यामुळे उपासमारीची वेळ येऊ शकते

  • शिष्यवृत्तीने फी न भरल्याबद्दल त्यांना विद्यापीठाकडून दिवाळखोर देखील घोषित केले जाऊ शकते

  • मुख्यमंत्र्यांना ट्विट केले आहे

  • सरकारने या गोष्टींची गंभीर दखल घेत यादी प्रसिद्ध करावी

यादी लागण्याच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना व्हिसा प्रक्रिया, विमानाच्या प्रवास तिकिटाचे बुकिंग करण्यास उशीर होत आहे. तसेच अमेरिका येथील अनेक महाविद्यालये १ सप्टेंबरपासून तर युकेतील १५ सप्टेंबर पासून सुरू होत आहेत. उशीर झाला तर विद्यार्थ्यांना इंडक्शन प्रोग्रॅम व क्लासेस करता येणार नाहीत. यामुळे बरेच विद्यार्थी हताश झाले आहेत. शिष्यवृत्ती यादी लवकरात लवकर लागावी.

- सुनील जाधव, विद्यार्थी

दोन वर्ष अभ्यास करून अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. या प्रवेशासाठी ४० हजार रुपये अनामत रक्कम भरली आहे. आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपये खर्च झाला आहे. मुळचा बीड जिल्ह्यातील असून वडील मजुरी काम करतात. सध्या एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत आहे. यादीला उशिरा होत असल्याने प्रवेश रद्द होण्याची भीती आहे.

- प्रतीक तांगडे, विद्यार्थी

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

विभागाचे आयुक्त नागपूर दौऱ्यावर असल्याने त्यांच्याशी बोलता येणार नाही, असे कार्यालयातून सांगितले जाते. ज्यांना या शिष्यवृत्ती बाबत माहिती आहे, असे सहआयुक्त भारत केंद्रे ही त्यांच्या सोबत असल्याने त्यांचा फोन बंद लागतो. कार्यालयातील सहआयुक्त (शिक्षण) विजय गायकवाड याबाबत सांगतात की, ‘शिष्यवृत्तीची फाइल मंजुरीसाठी पाठवली आहे. आता लवकरच निर्णय होईल’. मात्र नेमकी कधी लागेल, असे विचारले असता, याची सर्व माहिती केंद्रे यांच्याकडेच आहे, असे त्यांनी सांगितले. यामुळे नेमकी जबाबदारी कोणाकडे आहे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Web Title: Selection List Of Chhatrapati Shahu Maharaj Foreign Scholarship Published Immediately Students High Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..