

From Panini’s Ashtadhyayi to sustainable development: exploring the relevance of India’s knowledge traditions in the modern world
Sakal
डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
‘भाषाशास्त्र’ हे भारतीय ज्ञानपरंपरेचे वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्र आहे. पाणिनींचे ‘अष्टाध्यायी’ हे जगातील सर्वश्रेष्ठ व्याकरण ग्रंथांपैकी एक मानले जाते. विविध भाषांतील शब्दरूपे, ध्वनी बदल आणि व्याकरणरचनेचा अभ्यास करण्यासाठी पाणिनींची प्रणाली आजही उपयुक्त मानली जाते. आधुनिक भाषाविज्ञान आणि संगणकीय भाषाविज्ञानातही त्याच्या नियमाधारित रचनेचा अभ्यास केला जातो. भर्तृहरींनी वाक्यपदीय या ग्रंथातून ‘शब्द’, ‘अर्थ’ आणि ‘संज्ञा’ यांतील संबंध स्पष्ट करून भाषा अर्थनिर्मिती कशी करते याचे सखोल विवेचन केले. भारत प्राचीन काळापासून आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि व्यापारीदृष्ट्या सक्षम देश होता. उत्तरपथ आणि दक्षिणपथ या व्यापारी मार्गांमुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणावर विकसित झाला होता. व्यापाऱ्यांमध्ये विश्वासार्ह वित्तीय व्यवहार, हुंडी आणि पतव्यवस्थेसारख्या संकल्पनांचा वापर होत असल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात. सद्यःकालीन इतिहासकार संजीव संन्याल यांनी त्यांच्या ‘द ओशन ऑफ चर्न’ या पुस्तकात भारतीय व्यापाऱ्यांच्या समुद्री परंपरेचा आणि कौंडिण्यांसारख्यांनी भारतीयांच्या आग्नेय आशियाशी असलेल्या संबंधांचा उल्लेख केला आहे. नालासोपारा, भडोच, मुजिरिस, दाभोळ आणि ताम्रलिप्ती यांसारखी बंदरे जागतिक व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. भारतीय कारागिरांनी तयार केलेले वूट्झ, पोलाद, ढाक्याची तलम मलमल, तसेच जस्त, पितळ आणि धातुशास्त्रातील प्रगत कौशल्य जगभर प्रसिद्ध होते. दमास्कसच्या तलवारींसाठी आवश्यक असलेले उच्च दर्जाचे पोलाद भारतातून निर्यात होत असे. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर यांत्रिक उत्पादनाचा विस्तार आणि वसाहतवादी आर्थिक धोरणांमुळे भारतीय पारंपरिक उद्योगांना मोठा फटका बसला.