esakal | सीबीआयमध्ये अशी होते थेट भरती ! जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि पगार

बोलून बातमी शोधा

CBI}

सीबीआयमध्ये सहसा पदोन्नती किंवा प्रतिनियुक्ती तत्त्वावर काम करण्याची संधी मिळते, परंतु देशातील या प्रमुख तपास यंत्रणेत थेट भरतीद्वारे नोकरी मिळण्याची संधीही दिली जाते. थेट भरती प्रक्रियेद्वारे विहित पात्रतेचे निकष पूर्ण करणारे उमेदवारही सीबीआयमध्ये सरकारी नोकरी मिळवू शकतात. 

सीबीआयमध्ये अशी होते थेट भरती ! जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि पगार
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) अर्थात "सीबीआय'मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न जवळजवळ सर्वच तरुण बाळगतात. सीबीआयचे अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि करिअर करण्यासाठी लाखो तरुण दरवर्षी स्पर्धा परीक्षाही देतात. सीबीआयमध्ये सहसा पदोन्नती किंवा प्रतिनियुक्ती तत्त्वावर काम करण्याची संधी मिळते, परंतु देशातील या प्रमुख तपास यंत्रणेत थेट भरतीद्वारे नोकरी मिळण्याची संधीही दिली जाते. थेट भरती प्रक्रियेद्वारे विहित पात्रतेचे निकष पूर्ण करणारे उमेदवारही सीबीआयमध्ये सरकारी नोकरी मिळवू शकतात. 

सीबीआयमध्ये थेट भरतीसाठी पर्याय 
सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये थेट भरती करण्याचा सर्वांत प्रमुख पर्याय म्हणजे उपनिरीक्षक म्हणून भरती. भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व पेन्शन मंत्रालयांतर्गत सीबीआयमध्ये उपनिरीक्षकांच्या पदांवर भरती ही कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) ने घेतलेल्या संयुक्त स्नातक स्तरावरील (सीजीएल) परीक्षेतून केली जाते. एसएससी दरवर्षी सीजीएल परीक्षा घेते. सीजीएल परीक्षेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांमध्ये "गट बी' आणि "गट सी'च्या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांची निवड केली जाते. या पदांपैकी गट बी पातळीची श्रेणी देखील सीबीआयमधील उपनिरीक्षकाच्या पदांपैकी एक आहे. 

सीबीआयमध्ये उपनिरीक्षकाच्या थेट भरतीसाठी पात्रता 
सीबीआयमध्ये उपनिरीक्षकाच्या थेट भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या एसएससी सीजीएल परीक्षेत मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर डिग्री उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचाच समावेश असू शकतो. तसेच, परीक्षेच्या वर्षातील उमेदवारांचे वय कट-ऑफ तारखेपेक्षा 30 वर्षांपेक्षा जास्त नसावी. 

सीबीआयमध्ये थेट उपनिरीक्षक भरतीसाठी निवड प्रक्रिया 
सीबीआयमध्ये उपनिरीक्षकाच्या थेट भरतीसाठी सीजीएल परीक्षेत टियर 1, टियर 2, टियर 3 आणि टियर 4 असे चार टप्पे असतात. पहिल्या टप्प्यातील टियर 1 आणि टियर 2 च्या परीक्षांमध्ये सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती, जनरल नॉलेज, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, इंग्रजी, सांख्यिकी आदी विषयांसंबंधी प्रश्न विचारले जातात. या टप्प्यातील यशस्वी उमेदवारांना टियर 3 लेखी परीक्षेस हजेरी लावावी लागते, ज्यामध्ये उमेदवारांना तपशीलवार प्रश्न सोडवावे लागतात. यानंतरचा शेवटचा टप्पा म्हणजे टियर 4 एक संगणक प्रवीणता चाचणी / डेटा एंट्री स्किल टेस्ट असते. सीजीएल परीक्षेच्या विविध टप्प्यांसाठी निर्धारित अभ्यासक्रमाची माहिती अधिसूचनेवरून मिळू शकते. त्याचबरोबर सर्व टप्प्यांत यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांची यादी आयोगामार्फत संबंधित विभागांना नियुक्तीसाठी पाठविली जाते. 

सीबीआयमध्ये उपनिरीक्षकाचा पगार 
सीबाआयमध्ये ग्रुप बी स्तरावर उपनिरीक्षकपदांची भरती केली जाते. त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पे- मेट्रिक्‍स लेव्हल 7 (44,900 ते 1,42,400 रुपये) नुसार दरमहा पगार दिला जातो. याशिवाय इतर अनेक मासिक भत्ते व सुविधादेखील दिल्या जातात.