‘लक्ष्य’भेद : उजळणीसाठी नोट्स आवश्यकच!

नोट्सच्या महत्त्वाबाबत आपण मागील भागात माहिती घेतली. नोट्स काढायला सुरुवात करताना प्रत्येक विषयाचे एक मुख्य पुस्तक ठरवा. त्या विषयाशी संबंधित महत्त्वाच्या नोट्स त्या पुस्तकाच्या आधारेच काढा.
Study
StudySakal

- सोनल सोनकवडे

नोट्सच्या महत्त्वाबाबत आपण मागील भागात माहिती घेतली. नोट्स काढायला सुरुवात करताना प्रत्येक विषयाचे एक मुख्य पुस्तक ठरवा. त्या विषयाशी संबंधित महत्त्वाच्या नोट्स त्या पुस्तकाच्या आधारेच काढा. नोट्स या संक्षिप्त आणि नेमक्या भाषेत असाव्यात. नोट्स काढणं म्हणजे पुस्तकातील महत्त्वाची माहिती आहे तशी लिहिणे नव्हे.

शक्य असल्यास निवडलेल्या मुख्य पुस्तकात काही कोरी आणि सुटी पाने ठेवा. त्यात त्या विषयाशी, एखाद्या विशिष्ट प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती किंवा आकडेवारी इतर माध्यमांतून मिळाली (जसे की, सराव परीक्षा, चालू घडामोडींची पुस्तके, आधीच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका) तर ती कोऱ्या पानांवर छोट्या मुद्द्यांमध्ये लिहून ठेवा. त्यामुळे एखाद्या विषयाची सर्व माहिती एकत्रितरीत्या एकाच ठिकाणी राहते.

नोट्स मुख्य उद्देश

 • एखाद्या विषयाचा सगळा अभ्यास एका ठिकाणी राहिल्याने उजळणी होणे. कमी वेळात जास्त माहिती, संकल्पना, आकडेवारी वाचता, नजरेखालून घालता यावी. त्यामुळे विषय लक्षात ठेवायला सोपा जातो.

 • पूर्वपरीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न असल्याने त्यात जास्त लिहावे लागत नाही. अशा वेळी लक्षात न राहणाऱ्या गोष्टी एका कागदावर लिहून काढून त्याची उजळणी करा.

 • पुस्तक रंगवणे किंवा अधोरेखित करणं आवडत नसल्यास त्या-त्या विषयाची स्वतंत्र वही करून नोट्स काढाव्यात.

 • कोणत्या पद्धतीने नोट्स काढल्यास गोष्टी, माहिती, संकल्पना आकडेवारी अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहील हे ज्याचे त्याने ठरवावे.

नोट्स काढतानाची काळजी

 • आजच्या काळात पुस्तकांबरोबरच युट्युब चित्रफिती, ऑनलाइन, ध्वनिमुद्रित शिकवणी यांच्या मदतीनेही अभ्यास करतात. त्याच्यातील महत्त्वाच्या नोट्स काढाव्यात. आजकाल अनेक व्याख्याने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून होतात. अशा वेळी शिक्षकाने दिलेल्या पीपीटी किंवा पीडीएफद्वारे नोट्स काढू शकता.

 • नोट्स काढताना घाई करू नका. उजळणी करताना नेमकेपणाने वाचता आल्या पाहिजेत अशाच अक्षरात लिहा.

 • साधारणपणे ठळक मुद्द्यांच्या मदतीने त्या विषयाची रूपरेषा (आउटलाईन) काढली जाते. त्यानुसार त्या विषयाची माहिती थोडक्यात एका मुद्द्यामध्ये लिहिली जाते. काही वेळा केवळ महत्त्वाचे शब्द लिहूनही तुम्ही नोट्स काढू शकता.

 • अभ्यासाच्या नियोजनातील महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला फायद्याच्या ठरतील अशा नवीन पद्धती शोधायला शिका. केवळ वाचन आणि लिखाण यावर भर न देता तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त काही काम करत असताना अष्टावधानी राहून एका वेळी अनेक कामे करायला शिका.

 • नोट्स किंवा एखाद्या प्रकरणामधील काही महत्त्वाचा भाग स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग करा. इतर कामे करत असताना, म्हणजे उदाहरणार्थ व्यायाम करताना ते ऐकायचं.

 • दिवसातील अर्धा तास लिखाण-वाचन स्वरूपाचा अभ्यास बाजूला ठेवून काही महत्त्वाची व्याख्याने किंवा एखाद्या विषयाचे अधिक सखोल विश्लेषण ऐकावं

 • प्रभावी मल्टिटास्किंग प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर नक्कीच उपयोगी पडतं.

(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी, गीतकार, गायिका आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com