बोला, अधिक आत्मविश्‍वासाने!

दैनंदिन जीवनात विविध लोकांशी होणारा संवाद सामंजस्याने हाताळण्यासाठी लागणारे सर्वांत आवश्यक असलेले महत्त्वाचे कौशल्य म्हणजे आत्मविश्‍वासाने, ठामपणे बोलणे.
Speak up with more confidence
Speak up with more confidencesakal

- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

दैनंदिन जीवनात विविध लोकांशी होणारा संवाद सामंजस्याने हाताळण्यासाठी लागणारे सर्वांत आवश्यक असलेले महत्त्वाचे कौशल्य म्हणजे आत्मविश्‍वासाने, ठामपणे बोलणे. यामुळे स्वाभिमान आणि नातेसंबंध दोन्हीही वाढीस लागतात. ठामपणा म्हणजे आपल्या भावना स्पष्टपणे, पण समोरच्याचा आदर ठेवून व्यक्त करणे. यात तीन महत्त्वाचे घटक आहेत -

1) योग्य शब्द वापरणे : कौतुक, मूल्य, सूचना, कृपया, आम्ही हे करू शकतो यांसारखे शब्द वापरणे महत्त्वाचे ठरते.

2) तटस्थ आणि आदरयुक्त स्वर : जेव्हा आपण आवाज न वाढवता शांतपणे, पण आवाजात कोणत्याही प्रकारे लाचारी न ठेवता बोलतो, तेव्हा आपण अर्धी लढाई जिंकलेली असते.

3) हावभाव आणि देहबोलीमधील ठामपणा : लाजाळूपणे, गोंधळलेल्या किंवा रागावलेल्या स्वरात आपले मत मांडू नका. संयमित राहिल्याने परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची तुमची क्षमता दिसून येते.

विविध परिस्थितीतील काही उदाहरणे -

वर्ग/समूहात बोलणे : जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल, पण पुरेशी खात्री नसेल, तेव्हा त्या उत्तराआधी ‘माझ्या मते.../ मला असे म्हणायचे आहे...’ असे जोडा आणि आत्मविश्वासाने हात वर करून उत्तर द्या.

मित्रमंडळी : जर एखादा मित्र किंवा ओळखीची व्यक्ती सतत तुमच्या बोलण्यात व्यत्यय आणत असेल, तर तुम्ही त्यांना सांगा की, ‘मला आपल्या संभाषणाची कदर आहे, परंतु तुम्ही मला बोलणे पूर्ण करू दिल्यास मला अधिक आनंद होईल.’

सेल्समन : शॉपिंग मॉलमध्ये सतत तुमच्या मागे-पुढे सेल्समन फिरत असल्यास तुम्ही त्याला सांगा की, ‘मी आता केवळ सगळं बघतो/ते आहे. मला काही मदत लागली, तर मी तुम्हाला नक्की सांगेन! धन्यवाद!!’

गैरसमज दूर करा : जेव्हा एखादा सहकारी तुमच्या ई-मेलचा किंवा संदेशचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावतो, तेव्हा तुम्ही हे स्पष्ट करू शकता की, ‘इथे काही तरी गैरसमज होतो आहे. मला जे म्हणायचे होते ते असे आहे...’

मुलांच्या मर्यादा : मुलांना रात्री उशिरा झोपायचे असल्यास तुम्ही त्यांना प्रेमाने समजावू शकता की, ‘मला समजते आहे की, आज तुम्हाला उशिरा झोपायचे आहे. मात्र, आपल्या झोपेच्या वेळा बदलू नका. आपण हाच खेळ उद्याही खेळू शकतो.’

असभ्य वर्तणूक : जेव्हा कोणी तरी रांगेची शिस्त मोडतं, तेव्हा तुम्ही असे म्हणू शकता की, ‘माफ करा, परंतु मला खात्री आहे की, आता माझा नंबर आहे. त्यामुळे मी पुढे जातो. आपण सर्वांनी नियमांचे पालन केले, तर त्याचा फायदा होईल.’

मदतीची विनंती : काम खूप जास्त असल्यास, तुम्ही तुमच्या कुटुंबीयांशी प्रेमाने बोलून त्यांना विनंती करा की, ‘मला घरकामात मदत हवी आहे. आपण सर्वांनी कामांची विभागणी केली, तर काम लवकर संपेल.’

प्राधान्यक्रम : एखाद्या रेस्टॉरंटमध्ये तुमच्या मनासारखी ऑर्डर न आल्यास तुम्ही वेटरशी ठामपणे बोला. त्याला सांगा की, ‘मी माझ्या सलाडमध्ये कांदे टाकू नका असे सांगितले होते. तुम्ही कृपया पुढील ५ मिनिटांत माझ्यासाठी नवीन करून आणू शकता किंवा ही ऑर्डर रद्द करू शकता.’

अभिप्राय देणे : तुमच्या टीमच्या सदस्यांना वेळोवेळी अभिप्राय द्या. ‘मला तुमच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते, परंतु मला वाटते की, या प्रकल्पावर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी आपल्याला आपली संवादपद्धती सुधारण्याची गरज आहे. त्यासाठी तुमच्याकडे काही कल्पना/सूचना आहेत का?’ असे तुम्ही बोलू शकता.

अयोग्य वागणे : आपल्याला अन्यायकारक वागणूक मिळते असे तुम्हाला वाटत असेल, तर त्या व्यक्तीशी तुम्ही थेटपणे बोलायला हवे. तुम्ही असे म्हणायला हवे की, ‘मला वाटते की, मला योग्य प्रकारे वागणूक मिळत नाहीय. याबाबत काय करता येईल? यावर आपण काही बोलू शकतो का?’

कार्यक्रमांची निमंत्रणे :

आपल्याला एखाद्या सामाजिक कार्यक्रमाचे निमंत्रण आलेले असते, पण आपल्याला उपस्थित राहणे शक्य नसते, तेव्हा आपण नम्रपणे सांगावे की, ‘निमंत्रणाबद्दल धन्यवाद! मला यायला आवडले असते, आधीपासून काही गोष्टी ठरलेल्या आहेत. त्यामुळे क्षमस्व!’

वैयक्तिक गरज : तुम्हाला जर स्वतःचा वेळ हवा असेल, तर समोरच्याला तुम्ही नम्रपणे सांगू शकता की, ‘मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. उरलेले काम आपण उद्या करू.’

आत्मविश्‍वासाने संवाद साधून स्वतःला अधिक स्पष्टपणे व्यक्त होता येते आणि अशा बोलण्याचा सकारात्मक परिणामही दिसतो. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इंस्टाग्रामवर pranjal_gundesha या पेजला आणि यू-ट्यूबवर TheIntelligencePlus या चॅनेलला फॉलो करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com