
उच्च शिक्षण संस्थेत ‘विद्यार्थी सेवा केंद्र’ स्थापन होणार
पुणे : देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य निरोगी राहावे, या हेतूने त्यांना मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्तीसह उच्च शिक्षण संस्थेत विद्यार्थी सेवा केंद्र स्थापन करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. याबाबत आयोगाने नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यातूनच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत आता देश पातळीवर गांभीर्याने विचार होत असल्याचे निदर्शनास येते.
आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘विद्यार्थी सेवा केंद्रा’ची स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे. या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांमधील ताणतणाव आणि नैराश्य दूर करणे, विद्यार्थ्यांची शिक्षणातील गळती रोखणे, तसेच त्याचे प्रश्न सोडविणे यासाठी ‘विद्यार्थी सेवा केंद्र’ ही सुविधा एक खिडकी पद्धतीने काम करणार आहे. उच्च शिक्षण संस्थेतील कॅम्पस, वसतिगृह, मैदाने, कॅन्टीन, ग्रंथालय अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची शारीरिक सुरक्षितता लक्षात घेऊन आयोगाने मार्गदर्शक सूचना कार्यान्वित केल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य उत्तम राहण्याबाबत उच्च शिक्षण संस्थांमध्ये समुपदेशक आणि करिअर मार्गदर्शक उपलब्ध करून देण्याची तरतूद नवीन शैक्षणिक धोरणात आहे. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ नये आणि विद्यार्थ्यांवर शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, भाषिक ताण येऊ नये, तसेच विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे हित लक्षात घेऊन शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करणे हे उच्च शिक्षण संस्थांची जबाबदारी असल्याचेही आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.
विद्यार्थ्यांचा मानसिक, भावनिक, शारीरिक सुरक्षितता लक्षात घेऊन सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी आयोगाने तज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरूस्तीसह उत्तम मानसिक आरोग्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना अनुदान आयोगाने अधिकृत संकेतस्थळाद्वारे जाहीर केल्या आहेत. देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, असे यात आयोगाने स्पष्ट केले आहे.
असे असेल विद्यार्थी सेवा केंद्र
प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेमध्ये केंद्राची स्थापना करण्याचे आदेश
विद्यार्थ्यांमधील ताणतणाव, भावनिक प्रश्नांच्या व्यवस्थापनासाठी केंद्र जबाबदार असेल
ग्रामीण, वेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना सेवा देण्याची व्यवस्था
केंद्राचे काम संचालक किंवा अधिष्ठाता पदाशी समकक्ष असलेल्या मानसशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा, सामाजिक शास्त्र अशा विषयांतील प्राध्यापक करतील.
एखाद्या उच्च शिक्षण संस्थेत संबंधित विषय उपलब्ध नसल्यास अन्य संस्था किंवा विद्यापीठांचे सहाकार्य घेता येईल
Web Title: Student Service Center Will Set Up At Institute Of Higher Education University Grants Commission Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..