बी.ए./बी.ए्स्सी. बी.एड प्रवेशासाठी विद्यार्थ्याना २९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार | Admission | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

admission
बी.ए./बी.ए्स्सी. बी.एड प्रवेशासाठी विद्यार्थ्याना २९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार

बी.ए./बी.ए्स्सी. बी.एड प्रवेशासाठी विद्यार्थ्याना २९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार

पुणे - बी.ए/बी.एस्सी बी.एड इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी ६ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे, तर अंतिम गुणवत्ता यादी १० डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) १५ सप्टेंबर रोजी सीईटी परीक्षा घेण्यात आली आणि परीक्षेचा निकाल १४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर सीईटी सेलने या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे, महाविद्यालयांचा पर्याय निवडणे यासाठी २९ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, ई-स्क्रुटनीसाठी १० डिसेंबरपर्यंत मुदत आहे. तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी ६ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. या यादीबाबत हरकती, सूचना नोंदविण्यासाठी ७ ते ८ डिसेंबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी १० डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.

हेही वाचा: DRDO मध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो पदांसाठी होतेय भरती!

प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिली फेरी १४ डिसेंबरपासून सुरू होईल. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १८ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतरच प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल. दुसरी फेरी २२ डिसेंबरपासून सुरू होईल. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जवळपास दोन फेऱ्या होणार आहेत. त्यानंतर संस्थास्तरावरील प्रवेश, कोट्यांतर्गंत प्रवेशाच्या स्वतंत्र फेऱ्या होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत संस्था स्तरावरील प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील १४ जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. या अभ्यासक्रमाची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया २८ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही ‘सीईटी सेल’ने दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरताना, तसेच कागदपत्रे अपलोड करताना विशेष काळजी घ्यावी, असा सल्लाही सीईटी सेलने दिला आहे.

*प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.mahacet.org

loading image
go to top