विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच मिळताहेत नोकरीच्या चांगल्या संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

City Taxi
विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच मिळताहेत नोकरीच्या चांगल्या संधी

विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच मिळताहेत नोकरीच्या चांगल्या संधी

पुणे - तुम्ही अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला आहात आणि तुमच्या ‘ई-मेल’वर दर महिना पाच लाख रुपये अशा नोकरीची संधी देणारे पत्र आले तर!! तुम्हाला जितका आनंद झाला असता, तितक्याच आनंदाची अनुभूती सध्या आदित्य (नाव बदलले आहे) घेत आहे. होय, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या आदित्य या विद्यार्थ्याला उबर कंपनीने तब्बल ६१ लाख रुपये वार्षिक पगाराची (पॅकेज) नोकरी देऊ केली आहे. कंपनीच्या बंगळूरमधील कार्यालयात तो ऑगस्ट महिन्यात रुजू होणार आहे.

आदित्य उच्च शिक्षणासाठी पुण्यात आला. वडील शिक्षक असल्याने त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्याने गावापासून ९० किलोमीटरवर असणाऱ्या शहराची निवड केली आणि तेथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीत ८३.२३ टक्के पडल्यानंतर मात्र उच्च शिक्षणासाठी त्याने विद्येच्या माहेरघराला निवडले. २०१८ पासून तो पुण्यात शिक्षण घेत आहे.

तर पीसीसीओई महाविद्यालयातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) शाखेत तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या राहुल बडगुजर या विद्यार्थ्याला ३६ लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी मिळाली आहे. ‘डेटा इनसाइट्‌स’ या जागतिक पातळीवरील नामांकित कंपनीमध्ये त्याची सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावर निवड झाली आहे. राहुल हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याच्या वडिलांचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे, तर आई एमआयडीसीमध्ये छोट्या कंपनीत काम करते. ‘अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या ऑनलाइन प्रोग्रामिंगच्या स्पर्धांमध्ये नियमित सहभाग घेत होतो. तसेच अभ्यासक्रमातील विषयांव्यतिरिक्त इंटर्नशिप केल्यामुळे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला. शिक्षण घेताना एका अमेरिकन कंपनीत गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाइन इंटर्नशिप केल्याचा फायदा झाला,’ असे राहुलने सांगितले. मे महिन्याच्या अखेरीस तो डेटा इनसाइट्‌स कंपनीत रुजू होत आहे. शिक्षण पूर्ण न झाल्याने सुरुवातीला त्याला एक वर्ष इंटर्नशिप करावी लागणार आहे, त्यानंतर त्याला ठरलेला वार्षिक पगार मिळणार आहे.

चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी हे करा

  • अभ्यासक्रमाशी निगडित प्रत्यक्ष/ऑनलाइन कोर्सेस

  • नोकरीसाठी सातत्याने ‘करिअर पोर्टल’वर बायोडेटा पाठवा

  • इंटर्नशिप गांभीर्याने करा

  • आपल्या करिअरबाबत अद्ययावत माहिती मिळवत रहा

  • प्रोग्रामिंग संदर्भातील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवा

कॉम्प्युटर अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असताना एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंटर्नशिप केली. परंतु शिक्षण घेत असतानाच ‘कॉम्पेटेटिव्ह कोडिंग’ शिक्षण घेतले आणि त्याचा उपयोग नोकरीनिमित्त मुलाखत देताना झाला. शेवटच्या वर्षाला असल्यापासूनच वेगवेगळ्या करिअर पोर्टलवर नोकरीसाठी अर्ज करत होतो. त्या वेळी उबर कंपनीने बायोडेटा निवडला आणि निवडीची पुढील प्रक्रिया पूर्ण झाली.

- आदित्य

विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळते. पुढे याच कंपन्यांमध्ये किंवा इंटर्नशिपच्या आधारे विद्यार्थ्यांसमोर चांगल्या पगाराच्या नोकरीचे पर्याय खुले होतात. गेल्या काही वर्षांपासून संस्थेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘पॅकेज’चा आलेख चढत्या क्रमाने जात आहे.

- डॉ. शीतलकुमार रवंदळे, अधिष्ठाता, सेंट्रल प्लेसमेंट सेल, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट

Web Title: Students Get Better Job Opportunities While Studying

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top