
Succes Story : अन्न नव्हते, छत नव्हते, पण आत्मविश्वास होता म्हणून झाले पोलिस
औरंगाबाद : वडील व्यसनाने गेले,आईने अनाथाश्रमात टाकले, लग्नानंतर पतीनेही सोडून दिले. खायला अन्न नाही, राहायला छत नाही, अशा संकटांच्या मालिकेतही तीला आत्मविश्वासाने तारले. आता ती औरंगाबाद पोलिस दलात सन्मानाने कार्यरत आहे. कविता भाऊलाल साळूंखे असे या जिद्दी महिलेचे नाव आहे.
कविता मूळची जळगाव जिल्ह्यातली. घरात चार भावंडं. दोन मोठ्या बहिणी, तिसरा भाऊ तर कविता ही तिसऱ्या क्रमांकाची मुलगी. घरात खायची तोंडं जास्त पण कमावता एकटा पिता. तेही व्यसन करीत. अल्पावधीच चार लेकरं पदरात टाकून त्यांनीही जगाचा निरोप घेतला, मात्र चौथाही मुलगाच हवा असा हव्यास असलेल्या जवळच्या नातलगानेच कविताला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र कविताच्या आईने मुलींना अनाथाश्रमात घातलं अन् कविताच्या जीवनाला कलाटणीच मिळाली. तिसरी ते अकरावी असे नऊ वर्षे अनाथाश्रमात राहून शिक्षण घेतल्यानंतर तिचे हात पिवळे झाले.
कालांतराने पतीनेही हिणवत त्रास द्यायला सुरवात केली, एक दिवस तोही दोन लेकलं पदरात टाकून ‘तु मला नको’ म्हणून सोडूनही गेला. त्याकाळात अनेकदा आत्महत्येचे विचार मनात आले. तसा प्रयत्नही केला, मात्र त्यातूनही वाचल्याने आता मरायचं नाही हिमतीने जगायचं या निश्चयाने तीने पहाटे चार ते सहा या दोन तासात वर्क आऊट करुन पोलिस भरतीची तयारी सुरु केली.
अन् तिच्या आयुष्यात सोन्याचा दिवस आला
औरंगाबादसारख्या ठिकाणी नात्यातील कोणी नाही, अशा अवस्थेत तीने रुग्णालयात काम, घरी जाऊन दोन महिला रुग्णांना सेवा दिली. आधीच दोन लेकरं, त्यात रहायला छत नाही, खायला अन्न नाही, प्रसंगी मुलांसह स्वतःही उष्ट्यावरही दिवस काढले. पण सोबत होता आत्मविश्वास. याच जोरावर कविताने पोलिस भरतीची तयारी केली अन् पहिल्याच प्रयत्नात अवघ्या सहा महिन्यात पोलिस दलात भरती झाली. स्वतःच्या हिमतीवर तीने घर, कार घेतली. तिच्या आयुष्यात जसे दिवस आले तसे मुलांच्या आयुष्यात येऊन नये म्हणून तीने चांगल्या शाळेत मुलांना टाकले. पोलिस भरती झाल्यानंतर आयुष्यात सोन्याचा दिवस आल्याचे कविता नमूद करते.
डोक्यावर छत नव्हते, खायला अन्नही नव्हते. पण स्वतःजवळ आत्मविश्वास होता. खरेतर स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी मानून संकटाला समोरे गेले, यातून आज सुखाने जगत आहे.
- कविता साळूंखे, पोलिस कर्मचारी, शहर पोलिस दल, औरंगाबाद