भाषेवर मिळवा प्रभुत्व 

सुजाता कोळेकर 
Thursday, 23 April 2020

जपान नुसत्या उगवत्या सूर्याच्या नाही तर उगवत्या संधींचा देश म्हणता येईल. जपानी भाषा शिकण्यासाठी थोडा खर्च येतो, परंतु जपानमध्ये जॉब मिळवण्यासाठी कोणताही खर्च येत नाही.

प्रत्येक संकटाच्या वेळी देव आपल्याला एक मोठी संधी देत असतो; त्याचे सोने करता आले पाहिजे. कोरोनाच्या जगभरात झालेल्या प्रसारामुळे अनेक देशांनी मोठमोठे निर्णय घेतले. जपाननेही खूप महत्त्वाचा निर्णय घेतला; तो म्हणजे, त्यांचे चीनमध्ये असलेले सगळे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स दुसरीकडे स्थलांतरित करणे. यासाठी लागणारा बराचसा खर्च जपान सरकार करणार आहे. चीननंतर मोठी लोकसंख्या असणारा देश म्हणजे भारत आणि भारत तांत्रिकदृष्ट्या सबळ आहे, त्यामुळे त्यातील बरेच उद्योग भारतात येतील यात काहीच शंका नाही. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतामध्ये १३ जपानी इंडस्ट्रिअल इस्टेट्स आहेत. प्रत्येक इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये २००-४०० जपानी कंपन्यांचे प्रोजेक्ट्स सुरू आहेत. नवीन घडामोडीमुळे अजून खूप कंपन्या भारतामध्ये येण्यासाठी उत्सुक असतील. भारतीय लोकांना जपानमधील संधीही मोठ्या प्रमाणात वाढेल. मात्र, जपानमध्ये किंवा जपानी कंपनीमध्ये काम करायचे असल्यास शिक्षणाबरोबरच जपानी भाषा येणे अत्यावश्यक आहे. भारत आणि जपानचे ऐतिहासिक संबंध १४०० वर्ष जुने आहेत. भारतामध्ये १४४१ जपानी कंपन्या आहेत आणि भारतातून बऱ्याच जपानी कंपन्यांचे सॉफ्टवेअरचे काम केले जाते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांचे सरकारी पातळीवर खूप प्रयत्न सुरू आहेत. जपानला सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे ५ लाखांपेक्षा जास्त उमेदवार, तर साधारण तेवढेच इतर क्षेत्रात काम करणारे उमेदवार लागतील असे म्हटले जाते. आपण जपानमध्ये आणि जपानी भाषेमुळे मिळणाऱ्या करिअर मधल्या वेगवेगळ्या संधींविषयी माहिती करून घेऊया 

जपानी भाषेची परीक्षा जपान फाउंडेशन एकाच वेळी बऱ्याच देशात घेत असते. त्याला Japanese language proficiency test असे म्हणतात. यात ५ लेव्हल्स असतात. लेव्हल ५ ही बेसिक तर लेव्हल १ ही सगळ्यात उच्च असते. 

१) दहावी पास झालेल्या विद्यार्थ्याने ३ वर्ष जपानी भाषेचा अभ्यास केला आणि त्याबरोबर व्यावसायिक शिक्षण म्हणजे आयटीआय, टेक्निकल डिप्लोमा केल्यास जपानमध्ये संधी मिळू शकते किंवा आयटीआय आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्याने जपानी भाषा शिकली, तरी जपानमध्ये TIPI (Technical Intern Training Program) असा एक प्रोग्रॅम आहे. त्यामध्ये संधी मिळू शकते. हा तीन वर्षाचा प्रोग्रॅम असून यामध्ये चांगला अनुभव आणि स्टायपेंडही मिळतो. त्याशिवाय जपानमध्ये काम केल्याचा अनुभव महत्त्वाचा आहे. 

२) बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जपानी भाषेच्या ३ लेव्हल्स केल्यावर जपानमध्ये तसेच भारतामध्ये संधी मिळू शकते. माहिती-तंत्रज्ञान हे खूप संधी असणारे क्षेत्र आहे. त्याबरोबरच मेकॅनिकल सिव्हिल आणि इतर सगळ्या क्षेत्रात संधी आहेच. ज्यांना जपानला जायचे नाही, मात्र जास्त पगार मिळवायचा आहे त्यांना भारतामध्ये असलेल्या जपानी कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते आणि जपानी भाषा येत असल्यामुळे जास्त पगार मिळतो. जपानच्या बऱ्याच कंपन्या भारतामध्ये कार्यरत आहेत आणि नवीन कंपन्याही येत आहेत. 

३) नर्सेस - जपानमध्ये वय वर्ष ६० आणि त्यापुढील खूप लोक आहेत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सुसज्ज नर्सेस आणि केअरटेकरची आवश्यकता आहे. या क्षेत्रातील मुलांनी जपान भाषा शिकणे आवश्यक आहे. त्याशिवाय रुग्णाबरोबर संवाद साधता येत नाही. म्हणून कमीत कमी जपानी लेव्हल ३ असणे आवश्यक आहे. 

४) वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी जपान नेहमीच उत्सुक आहे. त्यासाठी त्यांचे नियम आणि पद्धत समजावून घेतली पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जपानी भाषा यायला पाहिजे. 

५) इंटरप्रेटेशन - जपान भारतामध्ये खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करत आहे. त्यामुळे जपानी लोक भारतात येतात किंवा भारतीय लोक जपानमध्ये जातात तेव्हा त्यांना इंटरप्रेटेर्सची गरज भासते. त्यावेळी फक्त जपानी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांना चांगला मोबदला मिळतो. 

६) ट्रान्सलेटर्स - जपानी भाषेवर प्रभुत्व असलेल्या लोकांना इंटरप्रेटेशनची कामे घरुनही करता येतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर जपान आणि भारतामध्ये देवाण घेवाण सुरू असल्यामुळे या क्षेत्रातही खूप काम सुरू असते. या क्षेत्रात प्रत्येक शब्दावर कामाचा मोबदला मिळतो. 

७) जपानी लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठीही येतात, तेव्हा त्यांचा उद्देश संस्कृत भाषेचा अभ्यास किंवा भरतनाट्यमसारख्या कलेचा अभ्यासाचाही असू शकतो. यासाठी लागणारी मदत रोजच्या जीवनातली असते, तेव्हा जपानी येणाऱ्यांना कामाची संधी मिळू शकते. अगदी लहानपणापासून जपानी शिकलेल्या मुलांना वेगवेगळ्या शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करता येतात आणि पुढे जपानी महाविद्यालयात जाऊन शिकता येते. 

जपान नुसत्या उगवत्या सूर्याच्या नाहीतर उगवत्या संधींचा देश म्हणता येईल. जपानी भाषा शिकण्यासाठी थोडा खर्च येतो, परंतु जपानमध्ये जॉब मिळवण्यासाठी कोणताही खर्च येत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sujata kolekar article fluency in the language