जपान आणि संधी  : कौशल्याधारितांना प्राधान्य

सुजाता कोळेकर
Thursday, 28 May 2020

जपानीभाषा शिकून प्राविण्य मिळवल्यास भारतातातील जपानी कंपनीमध्ये किंवा जपानमधील जपानी कंपनीमध्ये लगेच उच्चपदस्थ नोकरी मिळू शकते आणि  उमेदवार कमी असल्यामुळे पगारही घसघशीत मिळतो.

शिक्षणाला वयाची अट नसते, हे जपानी भाषेच्या बाबतीत अगदी खरे आहे. मला बरेच जण विचारतात की, जपानी भाषा शिकायला कधी सुरुवात करू? त्यांच्यासाठी काही माहिती – 

जपानी भाषेचे व्याकरण हे भारतीय भाषेसारखे आहे. म्हणजे आपल्या मराठी भाषेसारखे आहे. मग मराठी लिहिता वाचता येऊ लागले की, जपानी भाषा शिकायला सुरुवात करू शकतो. साधारण १० वर्षाची मुले जपानी शिकायला सुरुवात करू शकतात. लहान मुले लवकर भाषा अवगत करतात. मुलांनी दहावीपर्यंत जपानी भाषेवर प्रभुत्व मिळवले, तर त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते किंवा जपानमधल्या विद्यापीठांमध्ये प्रवेशही मिळू शकतो. अगदी जपानला गेले नाही, तरी बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या विषयांमध्ये जपानी हा विषय घेऊन विशेष प्राविण्य मिळवता येऊ शकते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दहावी पास झालेल्या विद्यार्थ्याने ३ वर्ष जपानी भाषेचा अभ्यास केला आणि त्याबरोबर व्यावसायिक शिक्षण, म्हणजे आयटीआय, टेक्निकल डिप्लोमा केल्यास जपानमध्ये संधी मिळू शकते. आयटीआयआणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्याने जपानी भाषा शिकली तरी जपानमध्ये TIPI (Technical Intern Training Program ) असा एक प्रोग्राम आहे. त्यामध्ये संधी मिळू शकते. हा ३ वर्षाचा प्रोग्राम असून, यामध्ये चांगला अनुभव आणि स्टायपेंडही मिळतो. त्याशिवाय जपानमध्ये काम केल्याचा अनुभव फार महत्त्वाचा आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

बॅचलर ऑफ इंजिनीरिंगच्या सर्व विद्यार्थ्यांना जपानी भाषेच्या ३ लेव्हल्स केल्यावर जपानमध्ये तसेच भारतामध्ये संधी मिळू शकते. माहिती व तंत्रज्ञान हे खूप संधी असणारे क्षेत्र आहे, त्याबरोबरच मेकॅनिकल, सिव्हिल आणि इतर सगळ्या क्षेत्रात संधी आहेतच. ज्यांना जपानला जायचे नाही, पण जास्त पगार मिळवायचा आहे त्यांना भारतामध्ये असलेल्या जपानी कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते आणि जपानी भाषा येत असल्यामुळे जास्त पगार मिळतो. जपानच्या बऱ्याच कंपन्या भारतामध्ये कार्यरत आहेत आणि नवीन कंपन्याही येत आहेत. जपानमध्ये वय वर्ष ६० आणि त्यापुढील लोक अधिक आहेत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी नर्सेस आणि केअरटेकरची आवश्यकता आहे. या क्षेत्रातील मुलांनी जपान भाषा शिकणे आवश्यक आहे. त्याशिवाय रुग्णाबरोबर संवाद साधता येत नाही, त्यासाठी कमीत कमी जपानी लेवल ३पर्यंत येत असणे आवश्यक आहे. 

जपानमध्ये कुशल मनुष्यबळ (स्किल्ड मॅनपॉवर) कमी असल्यामुळे त्यांना सगळ्याच क्षेत्रात जपानी भाषा येणारे अनुभवी लोक हवे असतात. म्हणजे समजा तुम्हाला १० वर्षाचा सिव्हिल, मेकानिकल, आयटी किंवा तशा कुठल्याही क्षेत्रातला अनुभव असेल, तर एका ठराविक मर्यादेनंतर भारतामध्ये प्रमोशन मिळत नाही; कारण स्पर्धा खूप असते. अशावेळी जपानी भाषा शिकून प्राविण्य मिळवल्यास भारतातातील जपानी कंपनीमध्ये किंवा जपानमधील जपानी कंपनीमध्ये लगेच उच्चपदस्थ नोकरी मिळू शकते आणि असे उमेदवार कमी असल्यामुळे पगारही घसघशीत मिळतो. तसेच, सगळ्याच अनुभवी भारतीयांना इंग्लिशही चांगले येते, त्याचा खूप फायदा जपानमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करताना होतो. क्षेत्र कुठलेही असो, भारतातील अनुभव आणि जपानी भाषेवर प्रभुत्व असल्यास उमेदवार कमी असल्यामुळे नोकरी नक्की मिळतेच आणि पगारही अधिक मिळतो. 

सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया 
कौशल्याधारितांना प्राधान्य 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sutaja kolekar article about japan language and Opportunity