esakal | ठाणे : २५ हजार बालकांना मोफत शिक्षणाचा लाभ | Education update
sakal

बोलून बातमी शोधा

ZP-thane

ठाणे : २५ हजार बालकांना मोफत शिक्षणाचा लाभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : दुर्बल घटकातील बालकांना मोफत उच्च प्रतीचे व दर्जेदार शिक्षण (Free education) मिळावे, यासाठी सरकारने (mva government) खासगी शाळेत आरटीई अंतर्गत २५ टक्के जागा गरीब विद्यार्थ्यांना राखीव ठेवल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील अनुदानित व खासगी अनुदानित शाळांमध्ये देखील ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार मागील पाच वर्षांत आरटीई प्रवेश (RTE admissions) प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील २५ हजार ४०१ मुलांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून (ZP education authorities) देण्यात आली.

हेही वाचा: नवी मुंबई : सिडकोकडून गुंतवणुकीची द्वारे खुली

विशेष म्हणजे मागील वर्षी कोरोनाचे गडद संकट उभे ठाकलेले असताना, देखील सर्वाधिक सहा हजार ९८१ विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश देण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे.
बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असते. ठाणे जिल्ह्यातील ६५२ अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि पाच तालुक्यांतील शाळांनी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून पटसंख्येच्या माहिती भरण्यात आली होती. तसेच पालकांनी देखील ऑनलाईन पद्धतीने आपल्या पाल्यांचे अर्ज दाखल करण्यात येत असते. सन २०१६ – २०१७ पासून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली.

त्यावेळी या प्रवेश प्रक्रियेची नागरिकांमध्ये जनजागृती व अर्ज करण्याची व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती नसल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, कालांतराने आरटीई प्रवेश प्रक्रियेची व्यापक प्रमाणात करण्यात आलेली जनजागृती यामुळे दिवसेंदिवस या प्रक्रियेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात मागील चार वर्षांत २५ हजार ४०१ बालकांना उच्च प्रतीच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला आहे. यामध्ये सन २०१९ -२०२० मध्ये सर्वाधिक ५ हजार ८६६ बालकांना उच्च प्रतीच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळाला आहे; तर सन २०१६ – २०१७ मध्ये सर्वात कमी दोन हजार ५५४ बालकांनीच प्रवेश घेतला होता. त्यात मागील वर्षी कोरोना सारखी भीषण परिस्थिती असताना देखील सहा हजार ९८१ बालकांना प्रवेश मिळाला होता.


वर्ष शाळांची संख्या रिक्त जागा दाखल अर्ज प्रवेश मिळालेली संख्या
२०१६ - २०१७ ५६० १४,२५४ ३,९४२ २,५५४
२०१७- २०१८ ६१३ १६,४५६ ८,४०९ ४,३२४
२०१८- २०१९ ६४० १६,५४९ १३,१७० ५,६७६
२०१९- २०२० ६५२ १३,४०१ १६,००७ ५,८६६
२०२०- २०२१ ६६९ १२,३४९ २०,३४० ६,९८१

loading image
go to top