- गणेश म्हात्रे, चित्रकार
लहानपणापासून आपल्यापैकी प्रत्येक जण विविध प्रकारची, रंगबेरंगी चित्रे पाहत असतो. शाळेत चित्रकला हा विषयही अभ्यासाला असतो. मात्र, करिअर म्हणून फारच कमी विद्यार्थी या क्षेत्राचा विचार करतात. मूलतः अंगात असलेली कला ओळखून तिला योग्य तो आकार देणं मोजक्यांनाच जमतं. कलेच्या या वाटेवर अविरत चालण्यासाठी हवं संवेदनशील मन, प्रयोगशीलता आणि नावीन्याची ओढ!
चित्रकार होण्याचा प्रवास कसा सुरू झाला?
- मी लहानपणापासून चित्रे काढत होतो. मात्र, शास्त्रशुद्ध शिक्षण असं घेतलं नव्हतं. शालेय जीवनात एलिमेंटरी या चित्रकलेच्या परीक्षेत मला चांगली श्रेणी मिळाली व बक्षीसही मिळाले. त्यातून हुरूप आला. मग पनवेलमधून आर्ट टीचर डिप्लोमाचे शिक्षण घेतले. त्यानंतर एका मासिकात ग्राफिक डिझायनर म्हणून काम सुरू केलं, परंतु ते करताना नवीन काही तरी शिकण्याची आस स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आणि माझा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. आजही अनेक मुलांना मनापासून चित्रकलेची आवड असते. ती त्यांनी व त्यांच्या पालकांनी वेळीच ओळखून तसे प्रशिक्षण द्यायला हवे.
तुमच्या कामाचे स्वरूप कसे आहे?
- मी पूर्ण वेळ आर्टिस्ट म्हणूनच काम करतो. आठवड्यातून दोन दिवस चित्रकलेचे क्लास घेतो. त्याशिवाय विविध प्रकारची कामे करतो. प्रदर्शनांमध्ये चित्रे ठेवली जातात. याशिवाय रेखाटने, फिगर स्टडी ही कामे तर सुरू असतातच. जहाँगीर आर्ट गॅलरीपासून विविध ठिकाणी माझ्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. ‘लॅन्डस्केप’मध्ये मी अधिक काम करतो आणि ‘नाइफ पेन्टिंग’ हे माझं वैशिष्ट्य आहे. सुमारे १५ वर्षांपासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे.
तंत्रज्ञानाचा कलेवर कसा परिणाम होतो आहे?
- तंत्रज्ञानाचा परिणाम विविध प्रकारे होतो आहे. आज डिजिटल स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं जातं. ए.आय.चा शिरकाव याही क्षेत्रात झाला आहे. त्यामुळे तंत्रज्ञान आत्मसात करण्याला पर्याय नाही. त्याकडे फार नकारात्मकतेने पाहू नये. त्याची योग्य तेवढी मदत नक्कीच घ्यावी. जसं की, कोरोनाकाळाच्या पूर्वी अनेक चित्रकार केवळ प्रदर्शनांवरच अवलंबून होते. मात्र, आज कोणताही चित्रकार सोशल मीडियाद्वारे त्याचं काम जगभरातील रसिकांसमोर ठेवू शकतो. इतरांचं काम पाहू शकतो. यामुळे त्याला नवीन माहिती व कामाच्या नवीन संधीही मिळू शकतात. सध्याचा काळ कलाकारांसाठी खूप चांगला आहे, असंच मी म्हणेन!
रंग-रेषांच्या दुनियेत...
1) तुमचा आवडता प्रकार, शैली, माध्यम ओळखा. त्यासाठी विविध प्रकारांची माहिती घ्या. स्वतःचा आतला आवाज ओळखा.
2) काम करण्याचा प्रकार ठरल्यावर त्याची संपूर्ण माहिती घ्या.
3) तुम्ही ज्या विषयावर काम करत आहात त्याच विषयात आणखी कोण, कशा प्रकारे काम करतं आहे? याचं डोळस निरीक्षण करा.
4) स्वतःच्या कामात तोच तोचपणा येणार नाही यासाठी नवनवीन प्रयोग करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.