एकेकाळच्या दहावी नापासांनी घडवला इतिहास; एक पद्मश्री तर दुसरा सिनेविश्वाचा अभिमान

‘साऱ्या आयुष्याची उभारी संपलेली. आपण पुढे फार शिकू, ही ऊर्मी गोठून गेली. जिथं तिथं इंग्रजीची भीती आडवी यायची. घुसमट वाढत चाललेली. नापास झाल्यावर करणार काय?....'
ssc result
ssc resultsakal

मुंबई : आज दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणाच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली असेल तर कोणाच्या पाठीत धपाटे बसले असतील. निकाल लागल्यानंतर पास की नापास असं विचारायचे दिवस केव्हाच सरले. त्यामुळे किती टक्के असाच थेट प्रश्न असतो; मात्र तरीही या ट्क्केवंतांच्या गर्दीत काही असे चेहरे असतात ज्यांना उत्तीर्णतेची किमान पातळीही गाठता आलेली नसते.

पास झालेल्या मुलांच्या जल्लोषात नापास विद्यार्थी मात्र बुजून जातात. पुढे काय हा प्रश्न असतोच पण समाजाला तोंड देण्याचं मोठं आव्हानही असतं. या अशा परिस्थितीला तोंड देणारी मुलं पुढे नक्की काय काय करू शकतात याची बरीच उदाहरणं आपल्याकडे आहेत. दहावी नापास होऊनही आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उदाहरणांपैकीच एक म्हणजे नागराज मंजुळे आणि दया पवार.

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांची कहाणी दहावीतील नापासांना प्रेरणा देणारी आहे. नागराज मंजुळे हे दहावी परीक्षेत दोनवेळा नापास झाले होते. त्यांच्या मार्कशीटवर (Nagraj Manjule SSC Marksheet) मोठ्या अक्षरात FAIL असे लिहिले आहे.

दरम्यान नागराज यांनी स्वत:ची दहावी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक २०१५ साली सोशल मीडियात शेअर केले होते. त्यानुसार त्यांना दहावीच्या परीक्षेत ३८.२८ टक्के गुण म्हणजेच ७०० पैकी २६८ गुण मिळाले होते. याच नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेविश्वाला १०० कोटींचे स्वप्नं दाखवणारा सैराट सिनेमा दिला.

दुसरे उदाहरण लेखक दया पवार यांचे. त्यांच्या ‘बलुतं’ या पुस्तकात त्यांनी आपला अनुभव सांगितला आहे. दया पवार एसएससीला असतानाची गोष्ट. निकाल लागला आणि त्यांना आपण नापास झाल्याचं कळलं. गुणपत्रक मिळाल्यावर समजलं की बाकी विषयांत फर्स्ट क्लासचे मार्कस् आहेत, पण इंग्रजीत दांडी गुल ! दया पवार लिहितात, ‘साऱ्या आयुष्याची उभारी संपलेली. आपण पुढे फार शिकू, ही ऊर्मी गोठून गेली. जिथं तिथं इंग्रजीची भीती आडवी यायची. घुसमट वाढत चाललेली. नापास झाल्यावर करणार काय?....'

पण दया पवार जिद्दीने पुन्हा अभ्यासाला लागले. नाटकाचे संवाद पाठ करण्याचं कसब त्यांनी इथे वापरलं आणि इंग्रजीचा पेपर पुन्हा दिला. मार्चमध्ये नापास झालेल्या या विद्यार्थ्याला ऑक्टोबरमध्ये फर्स्ट क्लासचे मार्क मिळाले. एवढ्या मार्कांची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. पुढे त्यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीसाठी पवार यांनी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

हे त्या काळात घडलं होतं जिथे नापास विद्यार्थ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणखीच संकुचित होता. आता परिस्थिती बऱ्यापैकी बदलली आहे. शैक्षणिक प्रगती करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आताच्या काळात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना खचून जाण्याची मुळीच गरज नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com