esakal | बारावीच्या विद्यार्थ्यांनो, टेन्शन घेऊ नका! 'असा' करा अभ्यास
sakal

बोलून बातमी शोधा

Tips for how to prepare for study of 12th std

महाविद्यालयातील शिक्षक, जर एखादा कोचिंग क्लास लावला असेल तर त्या क्लासचे शिक्षक, पालक सगळे मिळून विद्यार्थ्याच्या मागे अभ्यास कर, अभ्यास कर असा तगादा लावतात. पण अभ्यास कसा करावा हे मात्र कोणीच समजावून सांगत नाही. आज आपण नक्की अभ्यास कसा करायचा, हे समजून घेऊया. 

बारावीच्या विद्यार्थ्यांनो, टेन्शन घेऊ नका! 'असा' करा अभ्यास

sakal_logo
By
- प्रा. उल्हास अरुण माळवदे

पुणे : बारावीच्या वर्षांमध्ये प्रवेश करतानाच अचानकपणे आजूबाजूला सल्लागार मंडळी प्रगट होतात. घरी येणारे, भेटणारे असे जवळपास सगळेच नातेवाईक आणि मित्रमंडळी विद्यार्थ्यांना अभ्यास करा महत्त्वाचे वर्ष आहे असे सल्ले देतात. महाविद्यालयातील शिक्षक, जर एखादा कोचिंग क्लास लावला असेल तर त्या क्लासचे शिक्षक, पालक सगळे मिळून विद्यार्थ्याच्या मागे अभ्यास कर, अभ्यास कर असा तगादा लावतात. पण अभ्यास कसा करावा हे मात्र कोणीच समजावून सांगत नाही. आज आपण नक्की अभ्यास कसा करायचा, हे समजून घेऊया. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

१.पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन

सर्वप्रथम अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने नेमून दिलेल्या क्रमिक पुस्तकांचे सखोल वाचन. विद्यार्थ्यांनी गोष्टीचे पुस्तक वाचल्यासारखे टेक्स्ट बुक वाचणे गरजेचे आहे. कोणत्याही विषयाच्या पुस्तकामध्ये प्रत्येक चॅप्टर किंवा टॉपिक (धडा) नंतर सारांश दिला असतो, त्याच्या नंतर प्रश्न दिलेले असतात. सर्वप्रथम प्रश्न वाचून काढावे. उत्तर माहीत नसतील, तरी चालेल. त्यानंतर संपूर्ण चाप्टर वाचून काढावा. वाचत असताना आपला मेंदू वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतो. यामुळे आपल्याला सखोल वाचन करता येते व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात. नंतर सारांश वाचावा म्हणजे तो धडा कायमस्वरूपी लक्षात राहतो. अशा पद्धतीने पुस्तकाचे वाचन केले, तर ते जास्त परिणामकारक असते. परीक्षेच्या वेळी सारांश वाचन उजळणी करण्यासाठी महत्वाचे ठरते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२.दररोज उजळणी
वाचनाची सवय लागल्यानंतर रोज शिकवलेल्या अभ्यासक्रमाची रोजच्या रोज उजळणी करणे खूप गरजेचे असते. एखाद्या दिवशी उजळणी करायची विसरलो, तर दुसऱ्या दिवशी लगेच त्याची भरपाई करणे गरजेचे आहे. पण परीक्षा येत नाही, तोपर्यंत बरेचसे विद्यार्थी उजळणी करत नाहीत. त्यामुळे त्यांना सतत भीती वाटत असते. ही माझा खूप अभ्यास बाकी आहे, यावर सोपा उपाय हा एकच दररोज उजळणी करणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकदा सखोल वाचन केल्यानंतरच उजळणी शक्य असते. त्यामुळे आधी सखोल वाचन करावे आणि त्यानंतर रोजच्यारोज उजळणी. तुम्हाला शिक्षकांनी एक तास शिकवला असेल, तर या गोष्टींचे वाचन करण्यासाठी अर्धा तास पुरेसा असतो आणि उजळणी करण्यासाठी पंधरा मिनिटेसुद्धा पुरेशी असतात. ह्या गोष्टीचा सराव केला, तर कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करता येतो. 

३.कठीण आणि सोपे असे वर्गीकरण
अभ्यास सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात येते की काही गोष्टी मला समजायला कठीण आहेत. काही बाबी अत्यंत सोप्या आहेत. त्यामुळे सुरवात करताना सोप्या गोष्टींपासून सुरवात करावी. आत्मविश्वास वाढला की मग कठीण विषय किंवा टॉपिक अभ्यास करण्यासाठी घ्यावा आणि त्याला सुद्धा सोपे करून घ्यावे. याउलट तुम्ही कठीण विषयापासून सुरवात केली, तर तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. एकदा कंटाळा आला की झोप यायला वेळ लागत नाही. त्यामुळे सोप्या विषयापासून सुरवात केली, तर इंटरेस्ट वाढतो आणि अभ्यासात मजा येते. त्यामुळे कोणत्याही विषयामध्ये कठीण आणि सोपे असे वर्गीकरण करावे.

४.दररोज दोन तास स्वतःसाठी
बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की नेमके किती तास अभ्यास करायचा. खरंतर गृहपाठ करणे, प्रयोगवही पूर्ण करणे अशा प्रकारच्या लेखनाच्या कामामुळे अभ्यासाला मदत मिळतेच. परंतु हे सगळे करून झाल्यानंतर किमान दोन तास दररोज अभ्यासासाठी (सेल्फ स्टडी) राखीव ठेवावेत. या दोन तासांमध्ये उपरोक्त सांगितल्यानुसार वाचन गरजेचे आहे. वाचलेला अभ्यास सहज लक्षात राहत नसेल, तर वाचल्या वाचल्या आपल्या शब्दांत लिखाण करण्याची सवय ठेवावी. यामुळे वाचलेले कायमस्वरूपी लक्षात राहते. त्यामुळे वाचन व लेखन करण्यासाठी दररोज दोन तास आपण उपयोगात आणले पाहिजेत. परीक्षा काळामध्ये रात्रभर जागून अभ्यास करण्याची वेळ कधीच येणार नाही. त्यामुळे दररोज दोन तास याची सवय सुरवातीपासूनच लावून घ्या. 

५.प्रश्नोत्तरांचा सराव
आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये परीक्षेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक विषयाच्या संभाव्य प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे तयार हवीत आणि ही प्रश्न उत्तरे लिखाण करून कायमस्वरूपी लक्षात ठेवता येतात. त्यामुळे प्रश्नोत्तरांचा सराव करावा यासाठी पाठ्यपुस्तक तसेच इतर उपलब्ध प्रश्नसंच यांचा वापर करावा. 

६.सराव परीक्षा
आपण प्रत्यक्ष परीक्षा देतो,  अगदी त्याप्रकारे आपण सराव परीक्षासुद्धा दिल्या पाहिजेत. सुरवातीला प्रत्येक चॅप्टरनुसार परीक्षा द्याव्या. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव परीक्षा द्याव्यात. अडचण असते प्रश्नपत्रिकांची; पण थोडे प्रयत्न केले, तर खूप प्रश्न संच तयार स्वरूपात मिळू शकतील. यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांची मदत घेऊ शकता. सराव परीक्षांचे मूल्यमापन झाल्यानंतर झालेल्या चुका लक्षात येतात आणि ह्या चुका दुरुस्त केल्यानंतर आत्मविश्वास अजून वाढतो. त्यामुळे जास्तीत जास्त सराव परीक्षा द्याव्यात. भरपूर चुका कराव्यात त्या दुरुस्त पण कराव्यात. म्हणजे मुख्य परीक्षा येईपर्यंत जास्तीत जास्त चुका दुरुस्त झालेल्या असतील. या चुका आपल्याला शिकवत असतात

७.योग्य मार्गदर्शन
संपूर्ण बारावीच्या प्रवासात तुमच्या शिक्षकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते. मग ते महाविद्यालयातील शिक्षक असतील किंवा कोचिंग क्लासमधील असतील. मार्गदर्शन घेऊन आपल्या शिक्षकांवर विश्वास ठेवून अभ्यास केला, तर नक्की यश मिळते. बरेचसे विद्यार्थी शिक्षकांचा अनादर करत असतात. प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा फायदा करून घ्यावा. 

(- प्रा. उल्हास अरुण माळवदे,सहाय्यक प्राध्यापक, जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय, हडपसर)