कोरोनानंतर शिक्षण विभागाची पहिल्यांदाच आज महाबैठक! शिक्षक, पदवीधर आमदारांना निमंत्रण | Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षा गायकवाड
कोरोनानंतर शिक्षण विभागाची पहिल्यांदाच आज महाबैठक!

कोरोनानंतर शिक्षण विभागाची पहिल्यांदाच आज महाबैठक!

मुंबई : कोरोनानंतर (Covid-19) राज्यात शाळा (School) सुरू झाल्या असल्याने शाळा, शिक्षक आणि एकूणच राज्यातील शिक्षणाच्या विविध प्रश्नांवर मुंबईत विधानभवनात आज (बुधवारी) सकाळी 11 वाजता पहिल्यांदाच मोठी बैठक होत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत शिक्षक, पदवीधर आमदारांसोबत इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने ही बैठक मोठी वादळी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात अनुदानित आणि अनुदानावर आलेल्या असंख्य शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढीव पदे आणि त्यासाठी अनेक प्रकारच्या त्रुटींचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. त्यासोबत मागील काही वर्षात अनेक शाळा अडचणीत सापडलेल्या असताना संच मान्यता आणि त्यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकारी स्तरावर वेळोवेळी दिरंगाई केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या बैठकीत या विषयावर मोठी चर्चा होणार आहे. शिवाय शिक्षकांना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशत: अनुदानित जुनी पेन्शन लागू करण्यासाठी अनेकदा निर्णय होऊनही त्यावर आतापर्यंत अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यासोबत आयटी शिक्षक, अपंग एकात्म शिक्षक समायोजनाचा विषयही मार्गी लागत नसल्याने या बैठकीत तातडीने निर्णय जाहीर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा: NITI आयोगामध्ये विविध पदांची भरती! 30 नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

या बैठकीला नाना पटोले यांच्यासोबत शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार अभिजित बंजारी, आमदार कपिल पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार किरण सरनाईक, आमदार विक्रम काळे, आमदार बाळाराम पाटील, आमदार मनीषा कायदे, पदवीधर आमदार विलास पोतनीस हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला शिक्षण विभागाचे प्रधान सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्यासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याने अनेक विषय या बैठकीत घेतले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

loading image
go to top