
Railway Recruitment : रेल्वे भरती परीक्षा UPSC घेणार
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) २०२३ पासून पुढे रेल्वे भरतीसाठीची देखील परीक्षा घेणार आहे. भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेसाठी एका वेगळ्या परीक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ही परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येईल. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारेच पुढे मुलाखतीसाठी पात्र ठरतील.
मुख्य परीक्षेमध्ये चार पेपरचा समावेश असेल त्यात निबंधस्वरूपाचे दीर्घ प्रश्न विचारण्यात येतील. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी तीनशे गुणांचे दोन पेपर असतील. त्यात ‘अ’ गटातील प्रश्नपत्रिका ही भाषांशी संबंधित असेल. त्याची निवड उमेदवाराला करावी लागेल तर ‘ब’ गटातील प्रश्नपत्रिका ही इंग्रजी विषयाची असेल. त्याचबरोबर ऐच्छिक विषयांचा २५० गुणांच्या दोन पेपरचाही त्यामध्ये समावेश असेल त्याचबरोबर शंभर गुणांची क्षमता चाचणीही घेण्यात येईल.
ऐच्छिक विषयांमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी व वाणिज्य व लेखाकर्म यांचा समावेश असेल. हेच विषय सनदी सेवा परीक्षेसाठी देखील असतील. सनदी सेवा परीक्षा व रेल्वे व्यवस्थापन सेवा (मुख्य) परीक्षेला बसलेले उमेदवार हे या दोन्ही परीक्षांसाठी वर उल्लेख केलेल्या विषयांची ऐच्छिक म्हणून निवड करू शकतात.
भाषा माध्यम
पात्रता परीक्षा आणि ऐच्छिक विषयांचे भाषा माध्यम एकसारखेच असेल. सनदी सेवा परीक्षा (मुख्य) देणाऱ्या उमेदवारांनाही त्याच भाषेतून उत्तर लिहावे लागेल. सनदी सेवांसाठी विविध श्रेणींसाठी जी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे किंवा जितके प्रयत्न निश्चित केले आहे तेच येथेही लागू असतील.