UPSC 2019 : प्रदीप सिंहच्या वडिलांनी घर-जमिन विकली; मुलगा झाला IAS

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

सध्या आयआरएस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रदीपने वयाच्या 22 व्या वर्षी CSE 2018 परीक्षा पास केली होती. 

इंदौर - केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यात प्रदीप सिंहने देशात पहिली रँक मिळवली आहे. दरम्यान, या यादीत आणखी एक प्रदीप सिंह असून त्याने 26 वी रँक मिळवली आहे. मध्य प्रदेशाचा असलेला हा प्रदीप सिंह इंदौरमध्ये राहतो.  सध्या तो आयआरएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. CSE 2018 मध्ये त्याने 93 वी रँक मिळवली होती. 

वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात प्रदीपने CSE परीक्षा पास केली होती. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत प्रदीप म्हणाला होता की, मी जितके प्रयत्न केले त्यापेक्षा जास्त संघर्ष आई वडिलांनी केला. वडील पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांच स्वप्न होतं की मुलाने काहीतरी करावं. प्रदीपने दिल्लीला पुढच्या शिक्षणासाठी येण्याचा निर्णय़ घेतला. 2017 च्या जूनमध्ये दिल्लीत क्लास लावले होते. 

प्रदीपने तेव्हा सांगितलं होतं की, सुरुवातीला आर्थिक अडचणी आल्या. मात्र आई वडिलांनी कधीच अभ्यासाच्या आड येऊ दिल्या नाहीत. घरी पैशांची अडचण होती पण कुटुंबियांनी माझ्या अभ्यासासाठी सर्व प्रकारची तडजोड केली. प्रदीपच्या वडिलांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, इंदौरमधील पेट्रोल पंपावर मी काम करतो. मुलांनी काहीतरी चांगलं करावं यासाठी त्यांना शिकवण्याची इच्छा होती. 

हे वाचा - पोरगं कलेक्टर झाल्याची बातमी आली तेव्हा आई शेतात खुरपण करत होती

CSE मध्ये पास झाल्यानंतर प्रदीप म्हणाला होता की, युपीएससीची परीक्षा देण्याची इच्छा होती पण पैसे नव्हते. तेव्हा वडिलांनी घर विकलं. त्याकाळात कुटुंबाला बराच संघर्ष करावा लागला. क्लासची फी आणि घर खर्च यामुळे अनेक समस्या होत्या. मात्र शिक्षणात कधीच अडथळा आला नाही. 

प्रदीप म्हणाला होता की, इंदौरमधील घर ही वडिलांची आयुष्यभराची कमाई होती. पण अभ्यासासाठी ते विकलं. तेव्हा एक क्षणही त्यांनी विचार केला नाही. वडिलांच्या या त्यागाने मला आणखी बळ दिलं आणि युपीएससी परिक्षेसाठी जोराने अभ्यास सुरू केला. वडिलांनी फक्त घरच नाही तर बिहारमध्ये गोपालगंज इथं असलेली वडिलोपार्जित जमीनही विकली. त्यामुळे दिल्लीत अभ्यासासाठी अडचण आली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: upsc result 2019 pradip singh air 26 rank success story