हवाहवासा ‘वनवास’

आता परीक्षा संपून सुट्टी सुरू झाली आहे. त्यामुळे शाळा-क्लास आणि अभ्यास या आवश्यक, परंतु काहीशा चाकोरीबद्ध वेळापत्रकातून मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही थोडी उसंत मिळत आहे.
Vanvas Book
Vanvas Booksakal

आता परीक्षा संपून सुट्टी सुरू झाली आहे. त्यामुळे शाळा-क्लास आणि अभ्यास या आवश्यक, परंतु काहीशा चाकोरीबद्ध वेळापत्रकातून मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही थोडी उसंत मिळत आहे. त्यामुळेच याच काळात आपणही आपल्याला स्व-विकसनच्या पारंपरिक संकल्पनांच्या चाकोरी बाहेर घेऊन जात, निसर्गाशी मैत्री करायला शिकवणाऱ्या, निरागस मनाची घडण उलगडून दाखवणाऱ्या; आई-बाबा, मित्र-मैत्रिणी, आजी-आजोबा आणि शिक्षक या नात्यांची नव्याने ओळख करून देणाऱ्या पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहोत. हे पुस्तक म्हणजे प्रकाश नारायण संत लिखित वनवास!

लंपन या शाळकरी मुलाला त्याचे आई-बाबा शिक्षणासाठी बेळगावात - त्याच्या आजी-आजोबांकडे ठेवतात आणि इथूनच या पुस्तकाचा प्रवास सुरू होतो. कमालीचा संवेदनशील असणारा लंपन आजी-आजोबांबरोबर त्यांच्या गावी राहू लागतो अन् तिथल्या वातावरणाशी, तिथल्या संस्कृतीशी अगदी नकळतपणे समरस होऊन जातो.

पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर उभा असणारा लंपन गावातील वातावरणाशी जुळवून घेत असताना घडणारे विविध प्रसंग; शाळकरी वयाला शोभतील असे काही ‘ओढवून’ घेतलेले प्रसंग आणि त्यातून करून घेतलेली सुटका; संस्कारक्षम मनाला नकळत शिकवून जाणारे प्रसंग अन् निरागस मनाला त्याच्या भावविश्वातून हळुवारपणे वास्तवाची जाण करून देणारे प्रसंग या साऱ्यांची सुरेख गुंफण लेखकाने या पुस्तकात केली आहे.

त्यामुळेच हे पुस्तक वाचताना आपण त्यातील पात्रांशी अगदी सहज समरस होऊन जातो. लेखकाने केलेले निसर्गाचे, परिस्थितीचे आणि त्या-त्या प्रसंगांतील वातावरणाचे वर्णन इतके चपखल आणि रसभरीत आहे की तो प्रसंग आपणच अनुभवत आहोत अशी अनुभूती पानापानावर येते.

लंपन हे या पुस्तकातील मध्यवर्ती पात्र, परंतु तो काही कोणी सुपरहिरो किंवा कथानायक ठरावा अशा कोणत्याही अतिविशेष गुणांनी युक्त नाही. त्यामुळेच या लंपनमध्ये आपण स्वतःला पाहू शकतो. कठीण प्रसंगी पोटात गोळा येणारा, कधी मनसोक्त आळस करणारा अन् कधी नको ते धाडस करणारा लंपन हा आपल्याला आरशातील आपलेच प्रतिबिंब भासतो.

प्रत्येक वेळी आयुष्यात काही तरी उत्कट केलं तरच ते यशस्वी ठरतं या चाकोरीबद्ध संकल्पनेतून अलगद बाहेर काढतं, आयुष्यातला प्रत्येक प्रसंग भरभरून जगायला शिकवणारं; यशाबरोबर अपयशाची अनुभूती कोणत्याही कमीपणाशिवाय स्वीकारायला लावणारं, भीती, आकर्षण, मोह यांसारख्या भावनांना त्याज्य न ठरवता आयुष्यातील त्यांचंही स्थान नेमकेपणानं अधोरेखित करणारं हे पुस्तक आपल्याला खरोखरच समृद्ध करतं.

त्यामुळेच लंपनच्या आई-बाबांनी त्यांच्या आनंदाचा ठेवा असणारा लंपन जसा आजी-आजोबांकडे दिला आणि त्यांचं जीवन आनंदानं भरून गेलं, तसंच वाचकांचंही भावविश्व आनंदानं भरून जातं आणि हा ‘वनवास’ एकदा वाचल्यावर सतत हवाहवासा वाटू लागतो.

(संकलन : रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com